तुम्हाला माहितीये चीन आता मास्कची विक्री करून किती कमावतोय...

वृत्तसंस्था
शनिवार, 28 मार्च 2020

चीनमधील हुबेई प्रांतातील वुहान शहरातून सर्वप्रथम कोरोना विषाणूच्या संसर्गास सुरवात झाली. त्यानंतर अन्य भागातही या विषाणूचा संसर्ग झाल्याचे पाहायला मिळाले. आता जगभर या विषाणूने थैमान घातले असून, हजारो नागरिकांचा बळी गेला आहे.

बीजिंग : चीनमधून जगभरात संसर्ग झालेल्या कोरोना विषाणूपासून वाचण्यासाठी मास्कचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. कोरोनाच्या संकटापासून सावरलेला चीन आता हेच मास्क बनवून जगभर याचा निर्यात करत आहे. यातून चीनला तब्बल कोट्यवधींचा फायदा होत आहे.

चीनमधील हुबेई प्रांतातील वुहान शहरातून सर्वप्रथम कोरोना विषाणूच्या संसर्गास सुरवात झाली. त्यानंतर अन्य भागातही या विषाणूचा संसर्ग झाल्याचे पाहायला मिळाले. आता जगभर या विषाणूने थैमान घातले असून, हजारो नागरिकांचा बळी गेला आहे. त्यामुळे जगभरात सुरक्षेसाठी सर्व उपकरणांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आता चीनने मास्क बनवून जगभर पोचविण्यासाठी पाऊल उचलले आहे. गुआन शुंजे नावाच्या कंपनीने अवघ्या 11 दिवसांत मास्क बनविण्यासाठी नवी फॅक्टरी उभी केली आहे. अन्य पाच कंपन्याही एन-95 मास्क बनवित आहेत. जगभर या मास्कची मोठी मागणी असून, युरोपातील देशांना निर्यातही सुरु केली आहे.

एका आकडेवारीनुसार, चीनमध्ये तब्बल 8950 कंपन्या मास्क बनविण्याचे काम करत आहेत. प्रत्येत कंपनीत दिवसाला 60 ते 70 हजार मास्क बनविण्यात येत आहेत. चीनमध्ये सध्या दररोज 11.6 कोटी मास्क बनविले जात आहेत. चीनमधून इटली, दक्षिण कोरिया या देशांमध्ये सर्वाधिक निर्यात होत आहे. इटलीमध्ये 10 लाख मास्कची निर्यात करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. चीन आता मास्क निर्यातीतून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल करत असून, अर्थव्यवस्थेसाठी याचा फायदा होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: china is now earning profits by selling masks by spreading corona in the world