चीनला गंभीर परिणाम भोगावे लागतील - डोनाल्ड ट्रम्प

पीटीआय
Tuesday, 21 April 2020

चीन बरोबर झालेल्या व्यापारविषयक करारामुळे मी त्या देशावर खूष होतो. मात्र, त्यानंतर कोरोनाच्या विषाणूचा उद्रेक झाल्याचे आपण पाहिले. त्यामुळे मी आता चीनबाबत समाधानी नाही.
- डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे अध्यक्ष

वॉशिंग्टन - कोरोनाचा विषाणू चीनने जाणीवपूर्वक पसरवला असल्याचे सिद्ध झाले तर चीनला त्यांचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिल्यानंतर अमेरिकेने आज पुन्हा चीनबाबत नवी घोषणा केली. कोरोनाच्या विषाणूचा प्रसार कसा झाला याचा शोध घेण्यासाठी तज्ज्ञांचे एक पथक चीनला पाठविण्याची अमेरिकेची इच्छा आहे, अशी माहिती अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चीनमध्ये उगम झालेल्या कोरोनाच्या विषाणूने जगभरात थैमान घातले असून, एक लाख ६५ हजारांहून अधिक जणांचे बळी घेतले आहेत. एकट्या अमेरिकेत आत्तापर्यंत ४१ हजारहून अधिक जण मृत्युमुखी पडले आहेत. कोरोनाच्या विषाणूचा उगम नेमका कसा झाला याचा शोध घेण्यासाठी तज्ज्ञांचे पथक चीनमध्ये पाठविण्याची अमेरिकेची इच्छा आहे. त्याबाबत आम्ही चीनशी संपर्कही साधला आहे. मात्र, चीनकडून अद्याप आम्हाला परवानगी देण्यात आलेली नाही, असे ट्रम्प म्हणाले. ''व्हाइट हाउस''मधील दैनंदिन वार्तालापावेळी ट्रम्प बोलत होते. 

चीनबाबत मी समाधानी नाही. चीनमध्ये कोरोनाच्या विषाणूचा उद्रेक झाल्यानंतर त्याला त्याच ठिकाणी रोखणे आवश्यक होते. या बाबत खूप आधी आमचे चीनशी बोलणे झाले आहे. चीनमध्ये नेमकी काय परिस्थिती होती, तेथे काय चालले आहे, याची माहिती आम्हाला घ्यायची आहे. मात्र, चीनकडून त्याबाबत अद्याप सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही, असे ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले . वुहानमधील प्रयोगशाळेतून कोरोनाचा विषाणू चुकून किंवा जाणीवपूर्वक बाहेर पडला का, याची अमेरिकेने चौकशी सुरू केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: China will have serious consequences donald trump