कोरोनाचा जन्म चिनी प्रयोगशाळेत? ब्रिटिश सरकारला संशय

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 April 2020

लॅबच्या कर्मचाऱ्यांना पहिली लागण 
ब्रिटनमधील काही तज्ज्ञांच्या मते वुहानमधील इन्स्टिट्यूट ऑफ व्हॉयरॉलॉजी लॅबमधील कर्मचाऱ्यांना सर्वप्रथम या विषाणूचा संसर्ग झाला. त्यानंतर तो परिसरातील नागरिकांमध्ये पसरला. चीनमधील प्रयोगशाळांमध्ये वटवाघळांवर देखील प्रयोग केल्याचे पुरावे मिळू लागले आहेत.

लंडन - जगभरातील कोरोना विषाणूच्या उद्रेकासाठी चीनला जबाबदार ठरविले जात असून चीनने मात्र वुहानमधील जनावरांचे मांस विक्री करणाऱ्या बाजारपेठेतून हा संसर्ग पसरल्याचा दावा केला आहे. प्रत्यक्षात तेथील स्थानिक जनावरांमध्ये हा विषाणू प्रयोगशाळेतूनच आल्याचे बोलले जाते. चीनच्या इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी या प्रयोगशाळेतून हा विषाणू बाहेर पडला आणि नंतर त्याचा जनावरांना संसर्ग झाल्याचे युरोपीयन देशांना वाटते. या संदर्भातील खात्रीशीर माहिती ब्रिटन सरकारला मिळाली असून त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नेमका कुठून झाला हे शोधण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चीनपासून सुरू झालेल्या कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. आतापर्यंत जगभरात हजारोंच्या संख्येने बळी गेले आहेत, तर लाखोंच्यावर नागरिक प्रभावित झाले आहेत. हा विषाणू रोखण्यासाठी सर्व पातळ्यांवर उपाय योजले जात असून अद्याप कोणत्याही देशाला यावर लस तयार करता आलेली नाही. या संसर्गाचा उगम नेमका कोठून झाला, याचा अद्याप शोध लागलेला नाही.  जागतिक आरोग्य संघटनेने चीनमधील वुहान शहरातील त्या बाजारपेठेची पाहणी करून शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.  चीनने कोरोनाच्या संसर्गाचे मूळ जनावरांच्या बाजारपेठेत असल्याचे सांगितले असले तरी ब्रिटन सरकारच्या हाती  वेगळी माहिती लागली आहे. ती खात्रीशीर असल्याचा दावा ब्रिटन सरकार करत आहे. या संसर्गाचा उगम वुहानमधील लॅबमधून झाला असून, नंतर तो लगतच्या जनावारांच्या बाजारपेठेत पसरला आहे त्यानंतर त्याने नागरिकांच्या शरीरात प्रवेश केला असे त्यांचे म्हणणे आहे.  "डेली मेल''च्या वृत्तानुसार, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन या संसर्गाचे मूळ शोधण्यासाठी एका समितीचीही स्थापना केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona born in Chinese lab suspect by british government