Coronavirus : कोरोनामुळे चव अन्‌ वासाची बदलते जाणीव

पीटीआय
Wednesday, 29 April 2020

समान वैशिष्टे
न्यूयॉर्क आणि कॅलिफोर्नियातील रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या कोरोनाच्या रुग्णांमध्ये समान वैशिष्टे आढळल्याचे निरीक्षण दोन संशोधनात्मक अभ्यासात नोंदविले असल्याच् वृत्त गेल्या आठवड्यात ‘जामा नेटवर्क’ने प्रसिद्ध केले आहे. न्यूयॉर्कमधील १२ रुग्णालयांमधील मध्यम ते ६३ वर्षांच्या पाच हजार ७०० रुग्णांचा अभ्यास संशोधकांनी केला.

न्यूयॉर्क - कोरोनाव्हायरसमुळे रुग्णांच्या चवीत आणि गंध घेण्याच्या क्षमतेत बदल होत असल्याचे अभ्यासकांना दिसले आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे आढळलेल्या बाह्यरुग्णांना चवीत किंवा वास घेताना फरक जाणवतो का, असा प्रश्‍न विचारला होता. यासाठी इटलीतील २०२ रुग्णांचा सर्व्हे करण्यात आला. यापैकी ६४ टक्के रुग्णांनी चाचणीच्या दोन आठवड्यांपूर्वी वास व चवीत बदल झाल्याचा अनुवभ येत असल्याचे सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लक्षणांनंतर बदल
पाहणी केलेल्या सर्व रुग्णांपैकी निम्म्या रुग्णांमध्ये अन्य लक्षणे आढळण्याच्या वेळी किंवा त्यानंतर लगेचच एकाच वेळी जिभेची चव गेल्याचे किंव वासाची जाणीव बदल्याचे लक्षात आले. केवळ दहा टक्के रुग्णांना अन्य काही लक्षणे दिसण्याच्या आधीच चव व वास घेण्याची क्षमता बदलल्याचे जाणवले. 

महिलांची संख्या मोठी
वास व चवीतील बदल हा स्त्री-पुरुषांमध्ये कसा प्रकारे आढळला याचाही अभ्यास करण्यात आला आहे. त्यानुसार पुरुषांपेक्षा महिलांमध्ये हा बदल मोठ्या प्रमाणात दिसला. यात महिलांचे प्रमाण ७२ टक्के तर पुरुषांचे ५६ टक्के आहे. 

कोरोना असताना जगावर आस्मानी संकट?; अमेरिकेने शेअर केले उडत्या तबकड्याचे व्हिडिओ

कोरियात सर्वप्रथम संशोधन
कोरोनातच्या रुग्णांमध्ये चव व वास घेण्याची क्षमता बदलत असल्याचा निरीक्षण पूर्वी केवळ एकाच संशोधनात नोंदविले होते. या अभ्यासात हे प्रमाण ३४ टक्के असल्याचे म्हटले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला ‘सीएनएन’ने दक्षिण कोरियातील एका संशोधनाचा उल्लेख केला होता.कोरोनाच्या ३० टक्के रुग्णांची चव व वास घेण्याची जाणीव नष्ट होते, असा दावा या संशोधनात केला आहे.

लक्षणांची यादी वाढली
‘सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन’ (सीडीसी) या संस्थेने कोरोनाच्या लक्षणांची संख्या तिप्पट म्हणजे नऊ केली आहे. यात आता स्नायूदुखी, डोकेदुखी आणि चव व वास घेण्याची क्षमता नष्ट होणे या नव्या लक्षणांचा समावेश आहे. 

‘कोविड टोज’ ची चर्चा
काही रुग्णांमध्ये ‘कोविड टोज’ चे लक्षणही आढळले असून डॉक्टर व संशोधक त्याचा अभ्यास करीत असल्याचे वृत्त ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ने दिले होते. स्पेनमधील ‘जनरल कांउन्सिल ऑॅफ ऑफिशिअल कॉलेजेस ऑफ पोडियास्ट्रिस्ट’ने प्रसारमध्यांसमोर प्रथमच या लक्षणाचा उल्लेख केला होता. पादचिकित्सकांना आजारी व्यक्ती विशेषतः लहान मुले, युवक यांच्या पायांवरील त्वचेवर लहान जखमा आढळल्याचे प्रसिद्धपत्रकात म्हटले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona changes the sense of taste and smell