वुहानमध्ये नोव्हेंबरमध्येच आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 मार्च 2020

५५ वर्षांचा पहिला रुग्ण
साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’च्या वृत्तानुसार कोरोना व्हायरसचा जो पहिला रुग्ण १७ नोव्हेंबरला हुबेईत आढळला त्याचे वय ५५ वर्षे होते. यानंतर दररोज एक ते पाच घटना पुढे येऊ लागल्या. बाधित रुग्णांची संख्या १५ डिसेंबरपर्यंत २७ झाली होती. १७ डिसेंबरला प्रथमच १० पेक्षा जास्त घटना समोर आल्या. यानंतर २० डिसेंबरपर्यंत संसर्ग झालेल्यांची संख्या ६० पर्यंत पोचली. हुबेईतील रुग्णालयातील डॉक्टर जँग जिक्सियन यांनी २७ डिसेंबरला सांगितले की, कोरोना नावाच्या व्हायरस (विषाणू)चा संसर्ग लोकांना होत आहे. २७ डिसेंबरपर्यंत चीनमधील १८० लोकांना या विषाणूंची लागण झाली होती, पण डॉक्टरांना या व्हायरसबाबत काही माहिती नव्हती.

फैलाव कसा झाला?
कोरोना व्हायरसचा फैलाव कसा झाला, याविषयी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न शास्रज्ञ करीत आहेत. या विषाणूची लक्षणे दिसलेल्या पहिल्या रुग्णाची माहिती ते घेत आहे. यावरून कोरोना व्हायरस कोठून आला हे समजणे शक्य होणार आहे. नोव्हेंबरमधील पहिल्या नऊ रुग्णांमध्ये चार पुरुष आणि ५ महिला होत्या. मात्र यातील एकही रुग्ण असा नव्हता की ज्यात सर्वांत आधी या विषाणूंची लक्षणे दिसली होती.

बीजिंग - सध्या जगभरात फैलावलेल्या कोरोना व्हायरसचे उगमस्थान हे चीनमधील हुबेई प्रांतातील वुहान हे शहर आहे. वुहानमध्ये गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रथमच कोरोनाचे रुग्ण आढळून आले. मात्र तेथील प्रसारमाध्यमांमध्ये वेगळा दावा करण्यात येत आहे. हुबेई प्रांतात गेल्या वर्षी १७ नोव्हेंबर रोजी या घातक विषाणूंचा पहिला रुग्ण आढळला होता, असे वृत्त ‘साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’ या चिनी संकेतस्थळाने सरकारी कागदपत्रांचा हवाला देत प्रसिद्ध केले आहे.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर चीनने २१ दिवसांनी म्हणजे ८ डिसेंबर २०१९ रोजी या बाबतची माहिती जाहीर केली होती. डिसेंबर २०१९ पर्यंत चीनच्या अधिकाऱ्यांनी ‘कोरोना’ची लागण झालेले २६६ रुग्णांची ओळख पटविली होती. १ जानेवारी २०२० पर्यंत ‘कोरोना’च्या ३८१ घटना उघडकीस आल्या होत्या. 

Coronavirus : दहशतवाद्यांनाही दहशत

पहिल्या ‘पॉझिटिव्ह’ रुग्णाच्या तारखेवरून गोंधळ
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिलेल्या माहितीनुसार, चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या (कोविड- १९) पहिल्या ‘पॉझिटिव्ह’ रुग्णाची नोंद ८ डिसेंबरला झाली. ‘द लँन्सेट’ या वैद्यकीय मासिकातील माहितीनुसार वुहानच्या झियिंतान रुग्णालयात कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण १ डिसेंबरला आढळून आला. मात्र संसर्ग झालेल्या घटना याआधीच लक्षात आल्या असल्या तरी त्या वेगवेगळ्या तारखेने नोंदविण्यात आल्या आहेत. 

चीनमधील स्थिती (‘डब्ल्यूएचओ’ व चीनच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार)
८०,८६० - रुग्णांची संख्या
३,२१२ - मृतांची संख्या
३,०९९ - हुबेई प्रांतातील मृत

म्हणून, युरोपमध्ये वाढतायत कोरोनाचे बळी; इटली, फ्रान्समध्ये चिंताजनक स्थिती

दिवसभरात...
    इराणमध्ये १२९ जणांचा मृत्यू
    पश्‍चिम बंगाल, बिहारमध्ये अर्थसंकल्पी अधिवेशन गुंडाळले
    बेलूर मठात प्रसाद वाटप बंद
    श्रीनगरातील उद्यान बंद
    आसाममध्ये अभयारण्ये बंद
    ओडिशात पहिला रुग्ण
    दिल्ली उच्च न्यायालय सूचना जारी करणार
    कोचीत रिॲलिटी शोचे आयोजन, ७९ जणांविरुद्ध गुन्हे
    कर्नाटकात वैद्यकीय कॉलेज ‘वॉररुम’ म्हणून वापरणार
    मेघालयात शाळा, महाविद्यालय बंद
    राजस्थानमध्ये अफवा; आरोग्य कर्मचारी अटकेत
    सुप्रीम कोर्टात थर्मल चाचणी यंत्रणा उभारण्याची मागणी
    मुंबईतील भायखळा बगिचा बंद

कोरोनाचा विळखा...
अमेरिकेत भारतीयांसाठी हेल्पलाइन

वॉशिंग्टन - अमेरिकेतील भारतीयांची संख्या पाहता कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर भारत- अमेरिकी संघटनेने अमेरिकेत हेल्पलाइन कार्यान्वित केली आहे. यासाठी काही आली आहे. हेल्पलाइनवर भारतीय पालक संपर्क साधत असून शिक्षणासाठी अमेरिकेत असलेल्या मुलांना आर्थिक आणि मानसिक आधार देण्याचे काम केले जात आहे. अमेरिकेत आतापर्यंत ३,७७७ जणांना बाधा झाली असून, ६९ जणांचा बळी गेला आहे. अमेरिकेत कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रवासावर बंदी घालण्यात आली असून शाळा, रेस्टॉरंट आणि बार बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, मनोरंजनाचे कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत.

दैनंदिन वस्तूंची टंचाई भासणार नाही - ट्रम्प
वॉशिंग्टन -
 कोरोनाच्या फैलावामुळे मॉलमधून जीवनावश्‍यक आणि दैनंदिन वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिक गर्दी करत आहेत, त्यामुळे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशातील पुरवठा यंत्रणा सक्षम असून दैनंदिन वस्तूंची टंचाई देशवासीयांना भासणार नाही, असे आश्‍वासन दिले आहे. अमेरिकच्या अनेक वृत्तपत्रांतून आणि वृत्तवाहिन्यांवरून ग्रोसरी स्टोअर रिकामे होत असल्याचे दृश्य प्रसारित झाले होते. या पा‍र्श्वभूमीवर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रोसरी स्टोअर्स मालकांची बैठक बोलावली होती. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, की खरेदीला माझा आक्षेप नाही, परंतु गरजेपेक्षा अधिक खरेदी करू नका. 

संसदेत येणाऱ्या प्रत्येकाची थर्मल तपासणी
नवी दिल्ली -
 कोरोनाच्या दहशतीने ग्रासलेल्या राजधानीत संसद भवनाच्या सुरक्षा यंत्रणेत आता वैद्यकीय पैलूचाही समावेश करण्यात आला असून, संसदेत येणाऱ्या प्रत्येकाची थर्मल चाचणी करण्यास आजपासून प्रारंभ झाला. राजधानी दिल्लीतील मॉल, सिनेमागृहे, पब, जिम आदी सार्वजनिक ठिकाणांवर ३१ मार्चपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. संसदेच्या काही प्रवेशद्वारांवर हात स्वच्छ करणारे सॅनिटायझरही ठेवण्यात आले आहेत. कोरोनाचा उद्रेक झाल्यावर संसदेच्या अभ्यागतांसाठीचा सरसकट प्रवेश बंद करण्यात आला आहे. ज्यांना प्रवेश अनिवार्य आहे, त्यांच्याही वैद्यकीय चाचणीला प्रारंभ झाला आहे. 

कॅनडात बाधितांची संख्या ३१३ वर
ओटावा -
 कॅनडामध्ये दहा प्रांतांत कोरोनाबाधितांची संख्या ३१३ वर पोचली आहे. टोरँटो, माँट्रियल आणि व्हॅन्कूअर येथे कोरोना व्हायरसचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रमुख थेरेसा टाम यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक सूचना दिल्या असल्याचे म्हटले आहे. कॅनडा येथील आतापर्यंत सुमारे २५ हजार नागरिकांची चाचणी करण्यात आली आहे. 

पाकिस्तान- बांगलादेश मालिका लांबणीवर
कराची -
 कोरोना व्हायरसमुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने आगामी पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील एकदिवसीय आणि कसोटी मालिका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशचा संघ येत्या २९ मार्चला कराचीला येणार होता आणि १ एप्रिल रोजी एकदिवसीय सामना खेळविण्यात येणार होता.

कोरोनाचे सावट...
फ्रान्समध्ये २९ जणांचा बळी; ९०० जणांना बाधा
पॅरिस -
 युरोपीय देशांत कोरोनाचा प्रसार वाढत चालला असून, फ्रान्समध्ये चोवीस तासांत २९ जणांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे मृतांची संख्या १२० वर पोचली आहे. त्याचबरोबर नव्याने ९०० रुग्ण आढळून आले असून जानेवारीपासून एकूण बाधितांची संख्या ५४०० वर पोचली आहे. फ्रान्समध्ये एकाच दिवसात २९ जणांचा मृत्यू झाला आहे.   फ्रान्सचे आरोग्यमंत्री ऑलिव्हर वेरन यांनी म्हटले, की येत्या काही दिवसांत फ्रान्स सरकारकडून कन्फाइन्मंट ऑर्डर दिली जाऊ शकते. म्हणजेच नागरिकांना घरातच थांबण्याच्या सूचना दिल्या जातील. 

ऑस्ट्रेलियात ३५० जणांना बाधा
मेलबॉर्न -
 ऑस्ट्रेलियातही कोरोनाचा प्रसार होत असून आतापर्यंत ३५० जणांना बाधा झाली आहे. देशातील काही राज्यांत आणीबाणी जाहीर केली असून कोरोना व्हायरससाठी प्रतिबंधात्मक उपाय केले जात आहेत. पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी म्हटले, की परदेशातून ऑस्ट्रेलियात परतणाऱ्या नागरिकास दोन आठवडे विलगीकरण कक्षात राहावे लागणार आहे. तसेच, परदेशातील क्रूझ येण्यावरही बंदी घातली असून त्यांना ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर थांबता येणार नाही. न्यू साऊथ वेल्स येथे रविवारपासून ३७ नवीन प्रकरणे आढळून आली आहेत.

श्रीलंकेत प्रार्थना सभेचे आयोजन
कोलंबो -
 जीवघेण्या कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी श्रीलंकेत बौद्ध धर्मीयांच्या वतीने प्रार्थना सभेचे आयोजन आले आहे. श्रीलंकेत १३७ जणांना कोरोनाची बाधा झाली असून ११ जणांचा मृत्यू झाला आहे. ही प्रार्थना सभा आठवडाभर चालणार असून रथना सुथरया असे त्याचे नाव आहे. केवळ श्रीलंकेतच नाही, तर जगभरातून कोरोनाचा नायनाट व्हावा, यासाठी प्रार्थना केली जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. 

जर्मनीकडून सीमेवर दक्षता
बर्लिन -
 कोरोनामुळे जर्मनीने ऑस्ट्रिया, फ्रान्स, डेन्मार्क आणि स्वीत्झर्लंड सीमेवर अतिदक्षता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. आपत्कालीन स्थितीतच सीमा ओलांडता येणार आहे, असे जर्मनीने म्हटले आहे. जर्मनी आणि ऑस्ट्रिया सीमेवर पोलिसांकडून ट्रकची चौकशी केली जात आहे. तसेच खासगी वाहनचालकांना प्रवासाचे कारणही विचारले जात आहे. 

पॉम्पिओ-जयशंकर यांच्यात चर्चा
वॉशिंग्टन -
 कोरोना व्हायरससंदर्भात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॅम्पिओ आणि भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यात फोनवरून चर्चा झाली. कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी एकत्रितरीत्या कसे काम करता येईल यावर चर्चा झाल्याचे म्हटले आहे. उभयंतात चौदा मार्च रोजी दूरध्वनीवरून चर्चा झाल्याचे परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याने सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronas first patient was found in Wuhan in November