न्यूयॉर्कमध्ये जीवनदायी व्हेंटिलेटरच करतोय जीवाचा घात!

वृत्तसंस्था
Monday, 13 April 2020

अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण असून याठिकाणी व्हेंटिलेटरवर असलेल्या 10 पैकी 8 जणांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. 

चीनच्या वुहानमधून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसने इटलीनंतर आता अमेरिकेत तांडव सुरु केले आहे. अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा मोठ्या प्रमाणात वाढत असून कोरोना व्हायरसचा सामना करताना अमेरिकेची तारांबळी उडाल्याचे पाहायला मिळत आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण असून याठिकाणी व्हेंटिलेटरवर असलेल्या 10 पैकी 8 जणांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. स्थानिक डॉक्टरांच्या मतानुसार, कोरोनाच्या रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवल्यामुळे मृतांचा आकडा अधिक वाढत आहे. विशेषतज्ज्ञाच्या मते साधारणता श्वसनाची समस्या असणाऱ्या 40 ते 50 टक्के रुग्णांचा मृत्यू हा व्हेंटिलेटरवर उपचार सुरु असताना होत आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

न्यूयॉर्कमध्ये व्हेंटिलेटरवर असलेल्या 80 टक्के कोरोनाग्रस्त रुग्णांनी व्हेंटिलेटरवर आपला जीव गमावलाय. काही डॉक्टरांचे म्हणने आहे की, व्हेंटिलेटरच्या माध्यमातून रुग्णाला उच्च दाबाने ऑक्सिजन दिले जात असल्यामुळेच व्हेंटिलेटरवरील मृतांच्या आकड्यात वाढ होत असल्याचा दावा काही डॉक्टरांनी केलाय.

अमेरिकन लंग असोसिएशनचे प्रमुख चिकित्सक अधिकारी डॉक्टर अलबर्ट रोजो म्हणाले की, अमेरिकेमध्ये व्हेंटिलेटरवर उपचार करण्यात येणाऱ्या मृत्यू दराचे प्रमाण हे अधिक आहे. टोरंटो सामान्य हॉस्पिटलमधील श्वसन विशेषतज्ज्ञ डॉक्टर ऐडी फान यांनीही यासंबंधी प्रतिक्रिया दिली आहे. 'व्हेटिलेटर फुफ्फुसाला इजा करु शकतात आणि त्यामध्ये बिघाड होऊन रुग्णाच्या जीवाला अधिक धोका पोहचू शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

आणखी वाचा - सोशल डिस्टंसिंग जर्मनीकडून शिका!

जगभरात संकट बनून घोंगावणाऱ्या कोरोना व्हायरसने चीन, इटलीनंतर आता अमेरिकेत मृत्यू तांडव सुरु केले आहे. मागील 24 तासांत अमेरिकेत 1514 लोकांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत याठिकाणी 22 हजार 115 लोकांनी आपला जीव गमावला आहे. महाशक्ती म्हणून दबदबा असणाऱ्या अमेरिकेला चीमधून उत्पन झालेल्या व्हायरसने हतबल केले आहे. याला रोखण्यासाठी अमेरिकेकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मलेरियावर प्रभावीपणे काम करणारे हायड्रोक्लोरोक्वीन हे औषध सध्या कोरोनावर उपयुक्त ठरत आहे. अमेरिकेने भारताकडे या औषधांची मागणी केल्यानंतर भारताने या औषधाच्या निर्यातीवरील बंधने उठवल्याचे पाहायला मिळाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus 80 percent patients dying ventilator usa new york

Tags
टॉपिकस
Topic Tags: