धक्कादायक : ब्रिटनच्या पंतप्रधानांना कोरोनाची लागण; स्वतः ट्विटरवरून दिली माहिती 

टीम ई-सकाळ
Friday, 27 March 2020

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना कोठून हा संसर्ग झाला याविषयी अद्याप स्पष्टता झालेली नाही.

लंडन Coronavirus: कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. या व्हायरसच्या विळख्यात मोठ मोठ्या देशांचे नेते आणि सेलिब्रिटी आले आहेत. ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आता तर ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉनसन यांनाही कोरोनाची लागण झाल्यानं जगभरात कोरोनाविषयी चिंता वाढली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जॉनसनन यांनीच दिली माहिती 
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना कोठून हा संसर्ग झाला याविषयी अद्याप स्पष्टता झालेली नाही. पण, त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना कोरोनाची काही लक्षणे दिसत होती. त्यामुळं तातडीने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आणि ती पॉझिटिव्ह आली आहे. कोरोनाची लागण झाली असली आणि उपचार सुरू असले तरी, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मी ब्रिटनच्या जनतेच्या संपर्कात असेन, असे जॉन्सन यांनी स्पष्ट केले आहे. या संदर्भात स्वतः जॉनसन यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे. जॉनसन यांनी म्हटले आहे की, 'गेल्या 24 तासांत मला कोरोनाची थोडी लक्षणे दिसू लागली होती आणि माझी टेस्ट पॉझिटिव्ह आली. मी आता सेल्फ आयसोलेशनमध्ये जात आहे. पण, मी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सरकारचे नेतृत्व करणार आहे. आपण, एकत्र येऊन या व्हायरसला पराभूत करायचे आहे.' सध्या जगभरात साडे पाच लाख नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून, जवळपास 24 हजारहून अधिक जणांचा या व्हायरसने बळी घेतला आहे.

कोरोनाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, हॉलिवूड अभिनेते टॉम हॅक्स, बॉलिवूडची गायिका कानिका कपूर, यांच्यासह आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक सेलिब्रिटी आणि नेते कोरोना पॉझिटिव्ह आहेत. यात ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या पत्नी कर्नवॉलच्या डचेस कॅमी यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली असून, त्या निगेटिव्ह आढळल्या आहेत. सध्या प्रिन्स चार्ल्स यांचे स्कॉटलंडमधील निवासस्थानी विलगीकरण करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. युरोपमध्ये सध्या इटली आणि स्पेनला कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. त्यात स्पेनच्या उपपंतप्रधान पेड्रो सँचेझ यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. तसेच जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांच्या डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्यामुळं मर्केल यांना होम क्वारंटाईन करण्यात आलंय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus britain prime minister boris johnson tests positive