जगात मृतांचे प्रमाण घटले, चिंता कायम; जाणून घ्या कोठे काय घडले?

टीम ई-सकाळ
Friday, 10 April 2020

जगातील मृतांची संख्या ९४ हजारांच्या पुढे गेली आहे. एकूण बळींपैकी निम्मे बळी फक्त गेल्या आठवड्यातील आहेत.

ब्रुसेल्स Coronavrius : रुग्णसंख्येत वाढ होण्याचे प्रमाण काही अंशी कमी झाले असले तरी कोरोना विषाणूने अद्यापही जगाला दिलासा दिलेला नाही. या विषाणूमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ९४ हजारांच्या पुढे गेली आहे. संसर्गामुळे मृत्यू होण्याचा वेग पाहता लवकरच ही संख्या एक लाखांपर्यंत जाण्याची स्पष्ट चिन्हे आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कठीण काळ संपल्याची चिन्हे!
अमेरिकेत गुरुवारी (ता. ९) १७०० जणांचा झालेला मृत्यू आणि युरोपातही सुरु असलेले थैमान यामुळे जगातील मृतांची संख्या ९४ हजारांच्या पुढे गेली आहे. एकूण बळींपैकी निम्मे बळी फक्त गेल्या आठवड्यातील आहेत. कोरोना विषाणूने अमेरिका आणि युरोपवर सर्वांत मोठा घाव घातला आहे. आता मात्र येथील दररोज होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे सर्वांत कठिण काळ सरला असल्याची आशा या देशांमध्ये निर्माण झाली आहे. इटली आणि स्पेनमध्येही दररोज सरासरी ८०० जणांचा मृत्यू होत होता, हे प्रमाण आता ७०० पर्यंत खाली आले आहे. फ्रान्समध्येही रुग्णसंख्या घटली आहे. अमेरिकेतही अपेक्षित असलेला सर्वांत कठीण काळ लवकर संपल्याची चिन्हे दिसत आहेत. येथेही मृतांचे प्रमाण घटले आहे. अमेरिकेत बळींची संख्या १७ हजारांच्या जवळ गेली आहे. 

आणखी वाचा - मुंबईत धारावीमध्ये आणखी पाच कोरोना रुग्ण; काय आहे कनेक्शन?

आणखी वाचा - भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा झटका; आरबीआयचाच अहवाल

कोठे काय घडले?

  • लंडन : भारतात अडकलेल्या ब्रिटिश नागरिकांना आणण्यासाठी ब्रिटनची बारा विमाने उड्डाण करणार. 
  • बीजिंग : चीनमध्ये ४२ नवीन रुग्ण. बरे झालेल्या रुग्णांची नव्याने चाचणी घेणार. 
  • जोहान्सबर्ग : लॉकडाउन दोन आठवड्यांनी वाढवला; वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या वेतनात ३० टक्के कपात. 
  • पॅरिस : फ्रान्समध्ये प्रथमच नवीन रुग्णांच्या संख्येत घट. 
  • ब्रुसेल्स : बेल्जियममध्ये मृतांची संख्या तीन हजारांच्यावर. 
  • माद्रीद : स्पेनमध्ये गेल्या चोवीस तासांमध्ये ६०५ जणांचा मृत्यू. गेल्या १७ दिवसांतील ही सर्वांत कमी संख्या.
  • ढाका : रोहिंग्या निर्वासितांची मोठी संख्या असलेल्या कॉक्सबझार जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाउन. 
  • इस्लामाबाद : पाकमध्ये बाधितांची संख्या ४,५००, मृतांची संख्या ६६ वर. विमान उड्डाणांवरील बंदी २१ एप्रिलपर्यंत वाढविली. 
  • साना : येमेनमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus death toll reduced worldwide