कोरोनाग्रस्त व्यक्ती शोधण्यासाठी कुत्र्यांना ट्रेनिंग? संशोधनाला सुरुवात

टीम ई-सकाळ
Sunday, 19 April 2020

पहिल्या टप्प्यात विषाणूंना गंध आहे का?, याचा शोध घेतला जाईल, असे ‘एलएसएचटीएम’च्या रोग नियंत्रण विभागाचे प्रमुख जेम्स लोगन यांनी सांगितले. 

लंडन Coronavirus : कुत्रा हा माणसाचा जवळचा मित्र असल्याचे म्हटले जाते. सध्याच्या कोरोनाव्हायरसच्या जागतिक साथीतून हाच मित्र आपली सुटका करू शकेल. ही गोष्ट विचित्र वाटत असली तरी कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीला शोधण्याचे प्रशिक्षण श्‍वानांना देता येईल का?, यावर संशोधन सुरू होणार आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाचा गंध शोधणार 
‘मेडिकल डिटेक्शन डॉग्ज’ आणि डरहॅम विद्यापीठाच्या सहकार्याने ‘लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिन’ (एलएसएचटीएम) या संदर्भातील संशोधनाला सुरुवात करणार आहे. कोरेनाच्या विषाणूंचा वास घेण्याचे प्रशिक्षण श्‍वानांना देणे हा याचा उद्देश आहे. पहिल्या टप्प्यात विषाणूंना गंध आहे का?, याचा शोध घेतला जाईल, असे ‘एलएसएचटीएम’च्या रोग नियंत्रण विभागाचे प्रमुख जेम्स लोगन यांनी सांगितले. 

रोगांमुळे शरीराच्या गंधात बदल 
कोरोनोला विशिष्ट गंध आहे की नाही याची माहिती आपल्याला नाही, पण अन्य श्‍वसनविषयक रोगांमुळे आपल्या शरीराच्या गंधात बदल होते, हे सिद्ध झाले आहे. कोरोनाबाबत ही शक्यता पडताळून पाहिली जाणार आहे. त्यात यश मिळाले तर त्याचा शोध घेणे श्‍वानाला शक्य होईल, असेही ते म्हणाले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

श्‍वानांच्या निदानात अचूकता 
‘‘मलेरिया झालेल्या व्यक्तीला त्याच्या शरीराच्या गंधाद्वारे श्‍वानाने शोधल्याचे आमच्या या पूर्वीच्या संशोधनात आढळले आहे. निदानासाठी जागितक आरोग्य संघटनेची जी मानके आहेत, त्यापेक्षा जास्त अचूकता श्‍वानांद्वारे केलेल्या निदानात ९७ टक्के अचूकता होती,’’ असा दावा लोगन यांनी केला. 

आणखी वाचा - जगभरात कोरोनाग्रस्त 23 लाखांवर; वाचा कोठे काय घडले!

असे देणार प्रशिक्षण 
एखादी वस्तू, व्यक्ती, जागा हुंगल्यानंतर श्‍वान माग काढू शकतात. त्यानुसार प्रशिक्षण केंद्रात ठेवलेल्या नमुन्यांचा वास त्यांना देऊन ओळख पटविण्याचे प्रशिक्षण देणार आहे. यात काही नमुन्यांमध्ये कोरोनाचे विषाणू असतील. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

अन्य रोगांच्या निदानासाठी वापर 
कर्करोग, कंपवात (पार्किनसन्स) आणि काही जीवाणूंपासून होणाऱ्या संसर्गजन्य आजारांचे निदान करण्यासाठी प्रशिक्षित श्‍वानांचा वापर केला जातो. यानुसार कोरोनाच्या विषाणूंमुळेही गंध निर्माण होत असतील, तर त्याची जाणीव श्‍वानांना होऊ शकेल, असा विश्‍वास संशोधकांना वाटत आहे. 

जर हे संशोधन यशस्वी ठरले तर विमानतळावर व अन्य सार्वजनिक ठिकाणी श्‍वानांच्या मदतीने कोरोनाचे निदान होऊ शकेल. अशा प्रकारे एका तासात २५० नागरिकांच्या चाचण्या करणे शक्य होईल. यामुळे संसर्ग झालेल्या व्यक्तींची ओळख लवकरात लवकर पटेल. 
प्रा. स्टिव्ह लिंडसे, डरहॅम विद्यापीठ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus dog training research london durham university