युरोपमधून आणखी एक वाईट बातमी; जर्मनीतील अर्थमंत्र्यांची आत्महत्या

टीम ई-सकाळ
रविवार, 29 मार्च 2020

अर्थमंत्र्यांनी आत्महत्या केल्यामुळं जर्मनीच नव्हे तर, संपूर्ण युरोपला धक्का बसला आहे.

फ्रॅंकफर्ट - जर्मनी - Coronavrius:युरोप सध्या अभूतपूर्व संकटात सापडला आहे. जगातील 30 हजार कोरोनाग्रस्त मृतांमध्ये सर्वाधिक युरोपमध्ये आहेत. कोरोनाची साथ तेथे आटोक्यात आलेली नाही. इटलीनंतर, स्पेन, फ्रान्स, ब्रिटन एका पाठोपाठ एका देशात कोरोनाची साथ पसरत आहे. त्यातच जर्मनीमधून एक वाईट बातमी आहे. आधीच आर्थिक संकटात असलेल्या अर्थव्यवस्थेला कोरोनामुळं खूप मोठा दणका बसणार आहे. त्या संकटातून सावरायचं कसं? असा प्रश्न असल्यामुळं जर्मनीच्या हेस्सा प्रांताच्या अर्थमंत्र्यांनी आत्महत्याच केल्याचं स्पष्ट झालंय. थॉमस शैफर हे जर्मनीचे अर्थमंत्री होते. त्यांचा मृतदेह एका रेल्वे स्थानकाच्या बाहेर आढळला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोण होते शैफर?
अर्थमंत्र्यांनी आत्महत्या केल्यामुळं जर्मनीच नव्हे तर, संपूर्ण युरोपला धक्का बसला आहे. जर्मनीतील फ्रँकफर्ट ही आर्थिक राजधानी आहे. दॉइश बँकेसह दी युरोपियन सेंट्रल बँकेच कार्यालयही फ्रँकफर्टमध्ये आहे. फ्रँकफर्टमध्ये शैफर यांच्या आत्महत्येची घटना घडली आहे. शैफर जवळपास 20 वर्षे राजकीय जीवनात सक्रीय होते. तर त्यांनी गेली दहा वर्षे जर्मनीच्या अर्थ खात्याची धुरा सांभाळली आहे. जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेल मर्केल यांचे अतिशय विश्वासू सहकारी म्हणून त्यांची संपूर्ण युरोपला ओळख होती. जर्मनी आर्थिक आणि कोरोना अशा दुहेरी संकटात सापडला असताना, शैफर यांच्यासारख्या बड्या नेत्याची आत्महत्या जर्मनीसाठी खूप मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. या घटनेमुळं कोरोनाच्या चिंतेत असलेला संपूर्ण युरोप खंड हादरला आहे.

आणखी वाचा - ब्रिटनमध्ये जूनपर्यंत राहणार लॉक डाऊन स्थिती

हत्या नव्हे, आत्महत्याच
शैफर यांचा मृतदेह रेल्वे रुळावर सापडला होता. मृतदेह छिन्नविछिन्न झाल्यामुळं त्यांची ओळख पटलेले नव्हती. पण, पोलिस तपासाअंती तो शैफर यांचाच मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले आहे. शैफर यांची हत्या झाल्याचा संशयही सुरुवातीला व्यक्त केला होता. परंतु, स्थानिक पोलिसांनी हत्या नव्हे, आत्महत्याच असल्याचे स्पष्ट केले आहे. शैफर यांनी टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी एक पत्र लिहिले आहे. ते पोलिसांच्या हाती लागले असून, त्यावरून त्यांनी आत्महत्याच केल्याचे स्पष्ट झाले आहे. शैफर कोरोनाच्या संकटामुळं चिंतेत होते. त्यांनी गेल्या काही दिवसांत कोरोना व्हायरसच्या काळातील आर्थिक संकटासंदर्भात देशाच्या जनतेला संबोधित केले होते. ते सातत्याने नागरिकांच्या समोर येत होते. सध्या जर्मनीच्या चँसेलर अँजेला मर्केल क्वारंटाइन आहेत. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्यामुळं त्यांना 14 दिवसांसाठी क्वारंटाइन राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus German finance minister thomas schaefer commits suicide