जपान संतापला; कंपन्यांना चीनमधून बाहेर पडण्याचे आदेश, भारताला संधी

पीटीआय
Saturday, 11 April 2020

का संतापला जपान? 
टोकिओ ऑलिंम्पिक्स पुढे ढकलण्याची वेळ आल्याने जपानमधील राज्यकर्त्यांची तळपायाची आग मस्तकाला गेली आहे. कोरोनाव्हायरसच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर ऑलिंम्पिक एक वर्षांसाठी पुढे ढकलावे लागले आहे. ऑलिंम्पिकचे आयोजन निर्धारित वेळेनुसार करण्याबाबत जपान अतिशय आग्रही होता. मात्र, कोरोनाच्या संक्रमणाच्या धोक्यामुळे त्यावर पाणी फेरले गेले. कोरोनाचे संकट चीनकडून अतिशय बेजाबदारपणे हाताळण्यात आल्याने ही स्थिती उद्भवली असा जपानचा दावा आहे.

टोकिओ - कोरोनाच्या विषाणूचे उगमस्थान मानल्या जात असलेल्या चीनवर जगभरातील अनेक देशांची सध्या खप्पामर्जी झालेली दिसून येते आहे. या यादीत आता जपानची भर पडली आहे. चीन बरोबरचे व्यावसायिक संबंध संपुष्टात आणण्याचा जपान सरकारचा विचार असून, जपानी कंपन्यांनी चीनमधून बाहेर पडण्याची सूचना शिंजो अॅबे यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून देण्यात आली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जपानी कंपन्यांना चीनमधून बाहेर काढण्यासाठी २.२ अब्ज ऐवढा प्रचंड खर्च करण्याची तयारी जपानकडून दर्शविली जात आहे. यावरून जपानचा चीनवरील संताप दिसून येतो असे मानले जाते. या परिस्थितीचा फायदा उठविण्याचे प्रयत्न भारताकडून सुरू आहेत.

डब्लूएचओ नव्हे सीएचओ म्हणा!
चीन बरोबरच जपानचा जागतिक आरोग्य संघटनेवर (डब्लूएचओ) ही प्रचंड राग आहे. जपानच्या संसदेत बोलताना उपपंतप्रधान तारो असे म्हणाले की, जागतिक आरोग्य संघटनेचे नाव बदलून ते चीन आरोग्य संघटना करायला हवे. त्याचबरोबर डब्लूएचओच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळण्यात विद्यमान अध्यक्ष कमी पडत असल्याबाबतच्या याचिकेलाही आमचा पाठिंबा असेल अशी घोषणाच असो यांनी या वेळी केली.

चीनमधील मुक्काम इतरत्र हालवा...
जपानी कंपन्यांनी चीनमधून बाहेर पडून आपले प्रकल्प इतर देशांमध्ये हलविण्याची सूचना जपान सरकारने केली आहे. या संधीचा फायदा उठविण्याचा प्रयत्न भारताबरोबरच तैवान आणि बांगलादेश सारख्या देशांनी सुरू केला आहे. जपानसाठी भारत हा चांगला पर्याय ठरू शकतो. स्वस्तःतील कामगारवर्ग आणि निर्मितीप्रक्रियेला वेग देणारी चांगली इकोसिस्टिम ही भारताची उजवी बाजू ठरते. त्याचबरोबर भारतातील अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये जपान हा मोठा भागिदारही आहे.

मोदी कनेक्शन...
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जपानचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. मोदींच्या मेक इन इंडिया, स्किल इंडिया आणि क्लिन इंडिया मिशनला जपानचा पाठिंबा आहे. त्यामुळे येथील आपल्या विस्तारासाठी जपानी कंपन्यांसमोर भारताचा चांगला पर्याय उपलब्ध आहे. 

भारताला मिळू शकते संधी

  • १४०० वर्षे भारत-जपान संबंधांचा इतिहास
  • १४४१ भारतातील जपानी कंपन्या
  • ५३० एकट्या कर्नाटकातील जपानी कंपन्यांची संख्या

धडा शिकविण्याची इच्छा
चीनला चांगला धडा शिकविण्याची जपानची इच्छा आहे. चीनने अनेक मोठ्या चुका केल्या असल्याने त्याची शिक्षा त्या देशाला द्यायला हवीच या जागतीक पातळीवरील अनेक देशांच्या मतांशी जपानही सहमत आहे. त्यामुळे काहीही झाले तरी ड्रॉगनला धडा शिकविल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, अशा मनसिकतेत जपान सध्या पोहचला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus japan breaking trade relations with china