जपाननं खूप उशीर केला; 91 जणांच्या मृत्यूनंतर घेतला निर्णय 

टीम ई-सकाळ
Tuesday, 7 April 2020

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी पत्रकार परिषद घेऊन, टोकियोसह ओसाका आणि इतर प्रांतांमध्ये आणीबाणी जाहीर केली.

टोकियो Coronavirus:संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या विळख्यात असताना, जपानसारखा देश अतिशय गाफील राहिल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू होती. जवळपास चार हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्यानंतर जपान सरकारने टोकियोसह पाच राज्यांत आणीबाणी जाहीर केली आहे. जपानमधील आणीबाणी वेगळी आहे. जपानमध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली नाही. सूपर मार्केट्स सुरू राहणार आहेत. केवळ पंतप्रधानांनी सोशल डिस्टंसिंगचा नियम पाळण्याच्या सूचना केल्या आहेत. मुळात जपान हा अत्यंत शिस्तप्रिय देश आहे. त्यामुळं संचारबंदीसारखी कठोर पावलं इथं उचलण्यात आलेली नाहीत. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आणखी वाचा - सोशल व्हायरसपासून सावधान, कोरोनापेक्षाही जास्त धोका

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी पत्रकार परिषद घेऊन, टोकियोसह ओसाका आणि इतर प्रांतांमध्ये आणीबाणी जाहीर केली. जपानमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळं आबे यांनी हा निर्णय घेतलाय. परंतु, जपानमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर तब्बल एक महिन्यानंतर सरकारने हा निर्णय घेतलाय. त्यामुळं आबे यांना मोठ्या टिकेला सामोरं जावं लागत होतं. आता जपानमध्ये 4 हजार कोरोना रुग्ण आहेत तर, 91 जणांचा मृत्यू झालाय. सर्वाधिक फटका राजधानी टोकियोला बसला असून, ओसाका, ह्योगो, फुकुओका, शिबास, सैतामा या प्रांतातही कोरोनाचे मोठ्याप्रमाणावर रुग्ण आढळले आहेत. सोमवारी या कोरोनाग्रस्त प्रांतात एका दिवसांत 250 रुग्ण आढळले आणि त्याच काळात 7 जणांचा मृत्यू झालाय. भारत आणि इतर आशियाई देशांप्रमाणे जपानमध्ये कोरोनाचे निदान करणाऱ्या चाचण्या कमी झाल्याचा आरोप होत आहे. त्यामुळेच जपानमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी दिसत असल्याचा आरोप आहे. यावरूनही आबे यांना टिका सहन करावी लागत आहे. 

आणखी वाचा - फडणवीसांकडून मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे तीन मागण्या

जपानमध्ये ही बेडची कमतरता
जापनसारख्या देशातही आरोग्य सुविधांची स्थिती फारशी समाधानकारक नसल्याचं समोर येत आहे. सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण असलेल्या टोकियोच्या टोकियो मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष ओझाकी हारुओ यांनी सध्याच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केलीय. कोरोनाचा संसर्ग होण्याचा वेग मोठा आहे आणि त्यामुळं शहरात कोरोनाग्रस्तांसाठी बेड कमी पडण्याची शक्यता आहे. अमेरिकेत एक लाख लोकांच्या मागे 35 व्हेंटिलेटर आहेत तर, जपानमध्ये केवळ सात आहेत, अशी माहिती सीएनएनच्या एका बातमीत देण्यात आलीय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus japan declare state emergency tokyo and five other states