कुरापतखोर पाकिस्तानने 'सार्क'समोर पसरले हात

टीम ई-सकाळ
Friday, 10 April 2020

देशांनीही सार्क ‘कोविड-१९’ निधीमध्ये योगदानाची घोषणा केली होती. प्रत्येक देशातील परिस्थितीचे गांभीर्य त्यांच्या वर्तनावरून कारवाईबाबत पाहावे, असेही भारताने सुचविले आहे. 

नवी दिल्ली Coronavirus : ‘कोविड-१९’ च्या मुकाबल्यासाठी बोलाविलेल्या दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटनेच्या (सार्क) बैठकीत काश्‍मीरच्या मुद्यावरून भारताची कुरापत काढणाऱ्या पाकिस्तानने आता ‘सार्क’ पुढे मदतीसाठी हात पसरले आहेत. ‘सार्क’च्या आपत्ती प्रतिसाद निधीतून ३० लाख डॉलरची मागणी पाकिस्ताने केली आहे. भारतानेही यावर कोणतीही हरकत न घेता वर्तनानुसार संबंधित देशाबाबत गांभीर्याने विचार व्हावा ', असे सुचविले आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारताकडून अडथळा नाही 
पाकिस्तानने मागितलेल्या निधीबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी म्हटले आहे, की वेळ, प्रकार आणि अंमलबजावणीनुसार सार्क ‘कोविड-१९’ निधीचा वापर कसा करायचा हे सदस्य देशांना ठरवायचे आहे. पंतप्रधान मोदींच्या मदतीच्या घोषणेची वेगाने अंमलबजावणी सुरू आहे. अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, मालदिव, नेपाळ आणि श्रीलंका या देशांना मदत साहित्य तसेच अन्य सेवांचा पुरवठा केला जात आहे. या देशांनीही सार्क ‘कोविड-१९’ निधीमध्ये योगदानाची घोषणा केली होती. प्रत्येक देशातील परिस्थितीचे गांभीर्य त्यांच्या वर्तनावरून कारवाईबाबत पाहावे, असेही भारताने सुचविले आहे. 

आणखी वाचा - चीनमध्ये वुहानचा लॉकडाऊन हटला; पण...

दुटप्पी भूमिका 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर १५ मार्चला सार्क देशांची बैठक बोलावून चर्चा केली होती. त्यात भारताने १ कोटी डॉलर (७६ कोटी रुपये) देऊन सार्कच्या कोरोना आपत्ती प्रतिसाद निधीची स्थापना केली होती. तर अन्य सदस्य देशांनीही यात योगदान दिले होते. मात्र, पाकिस्तानने या बैठकीबाबत फारशी अनुकूल भूमिका घेतली नव्हती. एवढेच नव्हे तर पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी बैठकीकडे पाठ फिरवली होती. 

आणखी वाचा - तबलिगीचे मौलाना साद, पोलिसांच्या चौकशीला समोरे जाणार?

जेवढी घोषणा, तेवढीच मदत 
आता कोरोनामुळे पाकिस्तानातील परिस्थिती गंभीर झाल्यानंतर पाकने सार्कच्या आपत्कालीन निधीत ३० लाख डॉलर देण्याची घोषणाही केली होती. परंतु एवढ्याच रकमेच्या मदतीसाठी त्यांनी सार्कला साकडे घातले आहे. सार्कचे सचिव एसला रुवान वेराकून यांच्याशी पाकिस्तानी परराष्ट्र सचिव सोहेल मेहमूद यांनी निधीबाबत दूरध्वनीवरून चर्चा केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus pakistan asks for aide from saarc