Coronavirus : सलाम! डॉक्टरांचे फोटो बघून अंगावर काटा येईल...

वृत्तसंस्था
Tuesday, 24 March 2020

रूग्णांच्या सेवेसाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या या डॉक्टर-नर्सच्या चेहऱ्यावर मास्क व गॉगलमुळे वळ उठले आहेत. काहींच्या चेहऱ्यावर तर सूज आली आहे. काही डॉक्टर स्वतःच आजारी पडले आहेत, तर काहींची मानसिक अवस्था विचित्र झाली आहे. यापेक्षाही वाईट म्हणजे काही डॉक्टरांना चक्क कोरोनाची लागण झाली आहे. 

इस्लामाबाद : कोरोनाची भिती सर्वसामान्यांपासून ते अगदी सेलिब्रेटींपर्यंत सर्वांनाच असल्याचे सध्या चित्र आहे. कोणीही या कोरोनाच्या कचाट्यातून वाचलेला नाही. पण या सगळ्या भयंकर काळात सर्वात हाल आहेत, ते म्हणजे डॉक्टरांचे! डॉक्टरांना त्यांची सेवा अविरतपणे देणे भाग आहे. कोरोना व्हायरस असलेल्या रूग्णाची तपासणी करून त्याला उपचार देऊन, आयसोलेशमध्ये देखरेखीखाली ठेवणे अशी असंख्य कामं डॉक्टर व नर्स अविरतपणे करत आहेत... अशाच एका डॉक्टरने तिचा फोटो शेअर केला, मात्र हा फोटो बघून तुम्हालाही धक्का बसेल...

कोरोनाबाधित रूग्णांची सेवा करण्यासाठी सर्व डॉक्टर्स व रूग्णालयातील कर्मचारी अहोरात्र झटत आहेत. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सर्वांना उपचार देणे हेच त्यांचे प्राधान्य आहे. डॉक्टरांना तपासणीपूर्वी इतरांचा संसर्ग होऊ नये यासाठी मास्क, गॉगल व संपूर्ण शरीर झाकण्यासाठी वेगळ्या प्रकारचा ड्रेस घालणे अनिवार्य आहे. जेणेकरून डॉक्टरांना संसर्ग होणार नाही. मात्र, जेव्हा ते हे सर्व काढतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्याची झालेली अवस्था बघून तुम्हालाही वाईट वाटेल...

रूग्णांच्या सेवेसाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या या डॉक्टर-नर्सच्या चेहऱ्यावर मास्क व गॉगलमुळे वळ उठले आहेत. काहींच्या चेहऱ्यावर तर सूज आली आहे. काही डॉक्टर स्वतःच आजारी पडले आहेत, तर काहींची मानसिक अवस्था विचित्र झाली आहे. यापेक्षाही वाईट म्हणजे काही डॉक्टरांना चक्क कोरोनाची लागण झाली आहे. 

पाकिस्तानातील खासदार नाज बलोच यांनी आपल्या ट्विटरवरून काही डॉक्टरांचे फोटो ट्विट केले आहेत. ज्यात सर्व डॉक्टरांचे चेहरे काळे-पांढरे पडले आहेत, काहींच्या चेहऱ्यावर वळ, तर काहींच्या चेहऱ्यावर सूज आहे. त्यांनी या फोटोला 'Scars for humanity in the line of duty!' असे कॅप्शन दिले आहे. या डॉक्टरांचे फोटो बघून तुमच्याही अंगावर काटा येईल...

पाकिस्तानात आतापर्यंत 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 800 हून अधिक जणांवर उपचार सुरू आहेत. पाकिस्ताननेही आपल्या देशातील अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन केलं आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर युझर्सनेही डॉक्टरांना सलाम केला आहे. आपला जीव धोक्यात घालून रात्रंदिवस मेहनत करून या रुग्णांना बर करण्यासाठी हे डॉक्टर आणि परिचारिका प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या कार्याला सलाम.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus in pakistan mask spoiled face photo viral on social media