स्पेनमध्ये लाखो कर्मचारी कामावर; लॉकडाऊनचे नियम बदलले!

टीम ई-सकाळ
Tuesday, 14 April 2020

स्पेनच्या केंद्रीय सरकारने देशभर दहा दशलक्ष टेस्टिंग किटचे वाटप केले असून पुढील काही दिवसांत आणखी पाच दशलक्ष किट वाटल्या जाणार आहेत.

माद्रिद Coronavirus : कोरोनाच्या संसर्गाचा मुकाबला करत स्पेनच्या माद्रिद भागातील तीन लाखांपेक्षाही अधिक कामगारांनी कामाला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे यांचा अत्यावश्यक सेवेशी काहीही संबंध नाही. स्पेनने देखील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउनचा मार्ग निवडला होता. आता येथील अनेक भागांतील संसर्ग ओसरू लागल्याने लोकांनी कामाला सुरवात केली आहे. स्पेनमधील जनता तब्बल दोन महिन्यांपासून लॉकडाऊनला सामोरे जात आहे. या भागांतील काही सेवा पूर्ववत करण्यात आल्या असल्या तरी देखील दुकाने, बार, हॉटेल, रेस्टॉरंट आणि अन्य अनावश्यक दुकाने बंदच ठेवण्यात आली आहेत. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इटलीपाठोपाठ स्पेनला कोरोनाचा जबरदस्त तडाखा बसला असून, येथील बाधितांची संख्या आता दोन लाखांच्या जवळ जाऊन पोचली आहे. युरोपातील ही सर्वाधिक संख्या मानली जाते. स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सॅनचेझ यांनी म्हटले आहे की, देशातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागेल. सगळ्या गोष्टी टप्याटप्याने सुरू होतील पण त्याचबरोबर स्वच्छतेचे उपाय देखील करण्यात येतील. नव्या बाधितांचा शोध घेणे आणि भविष्यातील संसर्ग रोखणे अशी दुहेरी आव्हाने यंत्रणेसमोर असतील.

आणखी वाचा - सर्वाधिक रुग्ण असलेल्या अमेरिकेत लॉकडाऊन रद्द करणार!

विविध मेट्रो स्थानके आणि अन्य वाहतूक केंद्रांवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून त्या सर्वांनाच मास्क घालणे आणि हात धुणे देखील अनिवार्य करण्यात आले आहे. स्पेनच्या केंद्रीय सरकारने देशभर दहा दशलक्ष टेस्टिंग किटचे वाटप केले असून पुढील काही दिवसांत आणखी पाच दशलक्ष किट वाटल्या जाणार आहेत. दरम्यान अनेक भागांतील निर्बंध सरकारने मागे घेतले असले तरीसुद्धा कामगार संघटना मात्र अद्याप नाराज असल्याचे दिसून येते. अनेक कारखान्यांत सुरक्षेच्या पुरेशा उपाय योजना करण्यात आल्या नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 

आणखी वाचा - कुठं चुकतंय युरोपचं?

राज्यांचा आक्षेप 
स्पेनमधील काही राज्य सरकारांनीदेखील निर्बंध शिथिल करण्याच्या केंद्रीय यंत्रणेच्या निर्णयास आक्षेप घेतला आहे. केंद्राने हा निर्णय घाईत घेतल्याचे त्यांचे म्हणणे आहे . तत्पूर्वी आरोग्य क्षेत्रातील आघाडीचे नियतकालिक लान्सेटने मात्र, यावर लस सापडत नाही तोवर लॉकडाउन कायम ठेवावे असे म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus spain changes lockdown rules factories working