युरोपमधल्या 'या' देशात 24 तासांत जगातील सर्वाधिक कोरोनाबळी!

टीम ई-सकाळ
Thursday, 2 April 2020

स्पेनमध्ये कोरोनाची लागण झालेल्यांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. देशात 1 लाख 2 हजार जणांना कोरोनाची लागण झाली होता.

मद्रिद Coronavirus:युरोपमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. इटलीपाठोपाठ जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन सगळ्याच देशांना कोरोनानं गाठलंय आणि या देशांमध्ये हजारांवर कोरोना रुग्णांचे बळी जात आहेत. इटलीनंतर सर्वाधिक बळी सध्या स्पेनमध्ये गेले आहेत. स्पेनमधील बळींची संख्या 10 हजारांच्या पलिकडे गेली असून, एका दिवसात सर्वाधिक बळी जाण्याची घटना ही स्पेनमध्ये घटली आहे. स्पेनमध्ये बुधवारी 1 एप्रिलला मिळालेल्या आकडेवारीनुसार त्यादिवशी 24 तासांत सर्वाधिक 950 बळी गेले आहेत. एखाद्या देशात 24 तासांत इतके बळी जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय घडलं स्पेनमध्ये?
स्पेनमध्ये कोरोनाची लागण झालेल्यांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. देशात 1 लाख 2 हजार जणांना कोरोनाची लागण झाली होता. हा आकडाही झपाट्याने वाढला असून, आता एक लाख 10 हजार 238 जण कोरोना बाधित झाले आहेत. युरोपमध्ये कोरोनाचे सर्वाधिक बळी असलेल्यांमध्ये इटलीच आघाडीवर आहे. तेथे आतापर्यंत 13 हजार जणांना कोरोनामुळं प्राण गमवावे लागले आहेत. स्पेनमध्ये अजूनही 6 हजार जणांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. तर, 27 हजार रुग्ण सध्या कोरोनातून बरे झाले आहेत. स्पेनमध्ये मद्रीदला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला असून, 4 हजार 174 मृत्यू फक्त मद्रीदमध्ये झाले आहेत. तर, 32 हजार 155 जणांना लागण झाली आहे. कोरोनाची लागण होण्याची टक्केवारी गेल्या आठवड्यात 20 टक्के होती ती, या आठवड्यात 8 टक्क्यांवर आली असली तरी, आगामी काळात कोरोनामुळं मृत्यू होण्याचं प्रमाण जास्तच राहणार असल्याचं तेथील आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत ब्रिटनमधील इंडिपेंडंट या वृत्त समूहाने वेबसाईटवर माहिती दिली आहे.

आणखी वाचा - सावधान भारतात कोरोना रुग्ण वाढतायत!

लॉकडाऊनचा तिसरा आठवडा
स्पेनमध्ये लॉकडाऊनचा तिसरा आठवडा आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना घराबाहेर पडण्याची अनुमती आहे. त्यात पोलिस, आरोग्य खात्यातील कर्मचारी, अग्निशमन दलाचे कर्मचारी यांचा सामावेश आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, औषध दुकाने सुरू आहेत. त्यांच्या खरेदीसाठी केवळ नागरिकांना बाहेर पडता येते. त्यामुळं कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण या आठवड्यात घटल्याची चर्चा आहे. पण, नागरिकांच्या मृत्यूचा आकडा धडकी भरवणारा आहे.

आणखी वाचा - मौलवी म्हणतात, 'सरकारच्या सूचनांचे पालन करू नका!'

अर्थव्यवस्था खिळखिळी होण्याचा धोका
स्पेनची अर्थव्यवस्था मुळातच कठीण परिस्थितीतून जात होती. कोरोनाच्या संकटानं त्यात भर टाकली आहे. सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी कामावर रुजू आहेत. तर, तब्बल 8 लाख 98 हजार 822 लोकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्याची प्राथमिक माहिती आहे. मार्च महिन्यात नोकरी गेलेल्यांचा आकडा झपाट्यानं वाढला असून, बेरोजगारांमध्ये 3 लाख 2 हजार जणांची वाढ झालीय. स्पेनमध्ये बेरोजगारांना भत्ता दिला जातो. सध्या 23 लाख लोक या सुविधेचा लाभ घेत असल्याचे स्पेनच्या श्रममंत्रालयानं स्पष्ट केलंय. त्यावर 12 कोटी 20 लाख युरो महिन्याला खर्च होत असल्याची माहिती आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus spain records highest death numbers within 24 hours crossed 10 thousand remark