लहान मुलं आणि कोरोना; ‘युनीसेफ’ने काय दिला इशारा? सविस्तर वाचा

वृत्तसंस्था
Sunday, 3 May 2020

कोरोनामुळे लॉकडाउन लागू करण्यात आल्यामुळे दक्षिण आशियामधील असंख्य बालकांना लस टोचता आलेली नाही.  भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील अशा मुलांची संख्या सुमारे ४५ लाख इतकी आहे.

न्यूयॉर्क - कोरोनामुळे लॉकडाउन लागू करण्यात आल्यामुळे दक्षिण आशियामधील असंख्य बालकांना लस टोचता आलेली नाही. अजिबात लस न मिळालेल्या किंवा निर्धारीत प्रमाण निम्मेच असलेल्या मुलांच्या आरोग्याबाबत आणीबाणीची परिस्थिती निर्माण होऊ शकते असा इशारा ‘युनीसेफ’ने दिला आहे. भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील अशा मुलांची संख्या सुमारे ४५ लाख इतकी आहे.

जगभरातील कोरोनाच्या घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दृष्टिक्षेपात

  • लस न टोचलेल्या किंवा प्रमाण कमी असलेल्या जगातील मुलांत एक चतुर्थांश प्रमाण दक्षिण आशियाचे
  • भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तानमधील मुलांचे प्रमाण ९७ टक्के
  • पोलिओची साथ अजूनही असलेले जगात शेवटचे दोन देश ः अफगाणिस्तान, पाकिस्तान
  • बांगलादेश, पाकिस्तान आणि नेपाळमध्ये गोवर, घटसर्प अशा लशींनी प्रतिबंध होणाऱ्या रोगांच्या प्रसाराची उदाहरणे यापूर्वीच दिसली
  • लॉकडानमुळे मुलांना नियमीत लस टोचण्यासाठी आरोग्य केंद्रांवर नेण्यास पालकांची तयारी नाही
  • मुलांना लस टोचली जाते अशी अनेक केंद्र बंद
  • घरोघरी जाऊन लस टोचण्याच्या मोहिमा ठप्प

युनीसेफचा इशारा
प्रामुख्याने हात धुण्यासह इतर खबरदारी घेतली तर आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात काहीहीच अडथळा असण्याचे कारण नाही. वास्तविक लसीकरण सुरु ठेवणे महत्त्वाचे आहे. कोरोनामुळे मुले गंभीर आजारी पडत नाहीत असे असले तरी नियमीत लस टोचली नाही तर त्यांची प्रकृती धोक्‍यात येऊ शकते. अशावेळी लवकर कृती करणे महत्त्वाचे ठरेल. लसीकरण मोहीम जेथे लांबणीवर टाकली आहे तेथे कोरोना साथ आटोक्‍यात येताच हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबवावा. बालकांना लस न देण्याच्या परिणामांची आम्हाला तीव्र चिंता वाटते.
- जीन गॉफ, संचालक, विभागीय संचालक

जगभरातील कोरोनाच्या घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कडाउनमुळे प्रवासावर निर्बंध असून विमानेही रद्द झाली आहेत. परिणामी लशींची पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. मुळात उत्पादनही विस्कळीत झाले आहे. त्यामुळे लशींच्या तुटवड्याचे प्रमाण वाढले आहे.
- पॉल रुटर, युनिसेफचे विभागीय आरोग्य सल्लागार

कुठे काय ठप्प
1) दक्षिण आशियामध्ये अनेक ठिकाणी राष्ट्रीय सामुहिक लसीकरण मोहिम लांबणीवर
2) बांगलादेश, नेपाळमध्ये गोवर आणि रुबेला लसीकरण पुढे ढकलले
3) पाकिस्तान, अफगाणिस्तानमध्ये पोलिओ निर्मुलन मोहिम लांबणीवर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus UNICEF warned in the case of children