ट्रम्प पुन्हा भडकले; म्हणाले, 'चीनला लाज वाटली असावी'

टीम ई-सकाळ
Sunday, 19 April 2020

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज पत्रकार परिषद घेत चीनला इशारा दिला.

वॉशिंग्टन Coronavirus : कोरोना विषाणूचा चीनने जाणूनबुजून जगभरात फैलाव केला असल्यास त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा अमेरिकचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज दिला. कोरोना विषाणूच्या उद्रेकाबाबत चीनने लपवून ठेवलेली माहिती आणि नंतर दाखविलेले असहकार्य यावरून ट्रम्प यांनी चीनवर वारंवार टीका केली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

ट्रम्प यांनी आज पत्रकार परिषद घेत चीनला इशारा दिला. ‘त्यांनी हे सर्व जाणूनबुजून केले असले तर त्यांना निश्‍चितच परिणाम भोगावे लागतील. कोरोना विषाणूचा संसर्ग होईपर्यंत आमचे चीनबरोबर खूप चांगले संबंध होते. मात्र, अचानक काही गोष्टी आम्हाला समजल्या. आता संबंध बदलले आहेत. एखादी गोष्ट चुकून होणे आणि मुद्दामहून चूक करणे, यात फरक आहे. आम्ही त्यांना फार सुरवातीला याबाबत विचारले होते. मात्र, त्यांना कदाचित सांगायला लाज वाटली असावी. संसर्गाचा फैलाव करण्यास ते जबाबदार असतील तर मग त्यांना परिणाम भोगावेच लागतील,’ असे ट्रम्प म्हणाले. 

आणखी वाचा - वाचा जगात कोठे काय घडले?

मृतांच्या संख्येत चीनच पहिला : ट्रम्प 
कोरोनाबळींच्या आणि रुग्णांच्या संख्येबाबत चीनने जाहीर केलेली आकडेवारी अवास्तव असून जगातील सर्वाधिक मृत्यू चीनमध्येच झाले असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी आज केला. चीनने दोनच दिवसांपूर्वी वुहानमधील मृतांच्या संख्येत १३०० मृत्यूंची अधिकृतरित्या वाढ केली. या मृत्यूंची नोंद आधी झालीच नव्हती, असे त्यांनी सांगितले. यावरून चीन सरकारच्या पारदर्शकतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. यावरूनच ट्रम्प यांनी आज त्यांच्यावर टीका केली. ‘कोरोनाबळींच्या संख्येत आम्ही पहिल्या क्रमांकावर नाहीत. चीन पहिला आहे. ते सांगत असलेल्या संख्येपेक्षा कितीतरी अधिक जणांचा मृत्यू त्यांच्याकडे झाला आहे. अत्यंत प्रगत आरोग्य यंत्रणा असलेल्या युरोपीय देशांमध्येही मृतांचे प्रमाण अधिक असताना चीनमध्ये रुग्णांच्या तुलनेत मृतांचे प्रमाण केवळ ०.३३ टक्के असावे, हे अवास्तव आहे,’ असा दावा ट्रम्प यांनी आज केला. 

आणखी वाचा - ऑनलाईन शॉपिंग संदर्भात महत्त्वाची बातमी

मुस्लिमांनीही नियम पाळावेत 
ईस्टर संडेच्या काळात ख्रिस्ती धर्मियांनी ज्याप्रमाणे सामाजिक अंतर आणि मास्कचे नियम पाळले, त्याचप्रमाणे रमजानच्या काळातही मुस्लिम धर्मियांनी हे नियम पाळावेत, अशी अपेक्षा डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली. इस्टरच्या काळात नियमभंग केल्याबद्दल काही ख्रिस्ती नागरिकांवर कडक कारवाई झाली होती. अशीच कारवाई मुलिस्मांवरही होणार का, असा प्रश्‍न विरोधकांनी विचारल्यानंतर ट्रम्प यांनी वरील प्रतिक्रिया दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus usa donald trump statement against china