अमेरिका 'या' तीन टप्प्यांत देणार अर्थव्यवस्थेला गती!

टीम ई-सकाळ
Saturday, 18 April 2020

अमेरिकेत रुग्णसंख्या वाढीचा दर कमी झाल्यानेच हा निर्णय घेतल्याचेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले. 

वॉशिंग्टन Coronavrius: कोरोनाविषाणूमुळे मंदीच्या गाळात अडकलेल्या जगातील सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्थेला पुन्हा गतिमान करण्याचा निश्‍चय व्यक्त करत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबतची योजना जाहीर केली. तीन टप्प्यांमध्ये अमेरिकेतील उद्योग-व्यवसाय सुरू होणार असून, प्रत्येक राज्यांच्या राज्यपालांना लॉकडाऊन शिथील करण्याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अमेरिकेत गेल्याच आठवड्यात ५२ लाख कामगारांनी सरकारकडे बेरोजगार भत्ता मिळण्यासाठी अर्ज केला आहे. एकट्या मार्च महिन्यात अमेरिकेत २.२ कोटी नोकऱ्यांवर गदा आली आहे. अर्थव्यवस्थाही ५.९ टक्क्यांनी आकुंचन पावण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केला आहे. महामंदीकडे नेणाऱ्या या परिस्थितीत अमेरिकेला पुन्हा जनजीवन आणि आर्थिक व्यवहार सुरु करणे आवश्‍यक वाटू लागले आहे. कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू आणि बाधितांची संख्या अमेरिकेच्या नावावर असली तरी लॉकडाउन हा अंतिम उपाय असू शकत नाही, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी आज पत्रकार परिषदेत केला. त्यामुळेच राज्यपालांना त्यांच्या राज्यातील परिस्थिती पाहून तीन टप्प्यांमध्ये लॉकडाउन शिथिल करण्याचे अधिकार दिल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. रुग्णसंख्या वाढीचा दर कमी झाल्यानेच हा निर्णय घेतल्याचेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले. 

आणखी वाचा - इटलीचे नागरिक म्हणतात, कोरोनानं मरतो पण, उपाशी मारू नका!

असे आहेत तीन टप्पे... 
पहिला टप्पा : सामाजिक अंतराचा नियम कडकपणे पाळून हॉटेल, जिम, चित्रपटगृहे, क्रीडा संकुले, प्रार्थनास्थळे सुरु करणार. शाळा बंदच राहणार, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना बाहेर पडण्यास मनाई. बार बंद. 

दुसरा टप्पा : शाळा आणि युवाशिबीरांना सुरवात, प्रवास करण्यास परवानगी, बागा आणि शॉपिंग मॉल उघडणार. वर्क फ्रॉम होमला प्राधान्य. पन्नासहून अधिक जणांना एकत्र येण्यास मनाई. बंद ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांना मनाई. बारमधील संख्येवर निर्बंध. 

तिसरा टप्पा : संसर्गाचा धोका असलेल्या व्यक्ती सामाजिक अंतराचे व इतर नियम पाळून बाहेर पडू शकणार. कंपन्या, संस्थांमध्ये पूर्ण संख्येने कामगारांना येण्यास परवानगी, सामाजिक अंतराचे काही नियम पाळून मोठ्या कार्यक्रमांना परवानगी, 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रुतलेले चाक 

  • बेरोजगारांची वाढती संख्या 
  • अर्थव्यवस्थेचे आकुंचन 
  • लॉकडाउनमुळे जनजीवन विस्कळीत 
  • जगातील सर्वाधिक बळी 
  • जगातील सर्वाधिक संसर्गग्रस्त 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus usa donald trump three step plan for economy