अमेरिकेत परिस्थिती हाताबाहेर; बळींचा उच्चांक

पीटीआय
Sunday, 12 April 2020

न्यूयॉर्कमध्ये परिस्थिती बिकट 
अमेरिकेतील कोरोनाचे केंद्र ठरलेल्या न्यूयॉर्क राज्यात हाहाकार माजला आहे. दररोज एक हजारहून अधिक लोकांचा मृत्यू होत असल्याने लोक धास्तावले आहेत. अमेरिकेची आर्थिक राजधानी असलेल्या या शहरात सळसळत्या उत्साहाची जागा स्मशान शांततेने घेतली आहे. केवळ रुग्णवाहिकांचे आवाज नागरिकांच्या कानी पडत आहेत. सामूहिक दफनविधी करण्यासाठी सरकार खड्डे खोदत आहे.

न्यूयॉर्क - कोरोना विषाणूमुळे एकाच दिवशी सर्वाधिक बळींचा उच्चांक अमेरिकेत गाठला गेला आहे. या देशात जक्या २४ तासांमध्ये २,१०८ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील बाधितांची संख्याही पाच लाखांच्या वर गेली आहे. कोरोनामुळे एकाच दिवशी दोन हजारांहून अधिक व्यक्तींचा मृत्यू होणारा अमेरिका हा जगातील पहिला देश ठरला आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना संसर्गाचे टोक
मृतांची संख्यावाढीचा वेग पाहता आज रात्रीतूनच हा देश इटलीला मागे टाकून पहिल्या क्रमांकावर येण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. आज सकाळपर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार, अमेरिकेतील मृतांची संख्या १८,६९३ असून इटलीत १८, ८८० बळी गेले आहेत. अमेरिकेतील तज्ज्ञांनी हा शुक्रवार कोरोना संसर्गाचे टोक ठरण्याचा अंदाज आधीच व्यक्त केला होता. यानंतर, हे प्रमाण कमी होऊन १ मे पर्यंत दररोज होणाऱ्या मृतांची संख्या ९७० पर्यंत कमी होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याच दिवशी सर्व आर्थिक व्यवहार पुन्हा सुरू करण्यास ट्रम्प प्रशासन उत्सुक आहे. सरकारने केलेल्या कठोर अंमलबजावणीमुळे अमेरिकेतील एकूण बळींची संख्याही एक लाखाच्या आतच असेल, असा दावा सरकार करत आहे. 

काही तज्ज्ञांच्या मते, अद्यापही अमेरिकेत कोरोनाच्या संसर्गाने टोक गाठलेले नाही. त्यामुळे सामाजिक अंतर पाळणे, मास्क घालणे असे नियम शिथिल करण्याची घाई करू नये, असे त्यांचे म्हणणे आहे. 

न्यूयॉर्कमध्ये परिस्थिती बिकट 
अमेरिकेतील कोरोनाचे केंद्र ठरलेल्या न्यूयॉर्क राज्यात हाहाकार माजला आहे. दररोज एक हजारहून अधिक लोकांचा मृत्यू होत असल्याने लोक धास्तावले आहेत. अमेरिकेची आर्थिक राजधानी असलेल्या या शहरात सळसळत्या उत्साहाची जागा स्मशान शांततेने घेतली आहे. केवळ रुग्णवाहिकांचे आवाज नागरिकांच्या कानी पडत आहेत. सामूहिक दफनविधी करण्यासाठी सरकार खड्डे खोदत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus usa maximum deaths within 24 hours new york city