अमेरिकन्सचे दिवस फिरले; आलिशान जगणारे, अन्नाची पाकिटे घेण्यासाठी रांगेत

टीम ई-सकाळ
Sunday, 19 April 2020

काही दिवसांपूर्वी अलिशान जीवनशैली असलेले अनेक लोक अन्नाची पाकिटे घेण्यासाठी आणि सरकारकडून भत्ता मिळविण्यासाठी तासन्‌ तास रांगेत उभे रहात असल्याचे चित्र आहे. 

न्यूयॉर्क Coronavirus : कोरोनाबरोबरच त्यामुळे येऊ घातलेल्या आर्थिक महामंदीचाही फटका अमेरिकेला मोठ्या प्रमाणात बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अमेरिकेतील बेरोजगार भत्त्यासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या सव्वा दोन कोटींवर गेली आहे. रोजगार नसल्याने अवघ्या काही दिवसांपूर्वी अलिशान जीवनशैली असलेले अनेक लोक अन्नाची पाकिटे घेण्यासाठी आणि सरकारकडून भत्ता मिळविण्यासाठी तासन्‌ तास रांगेत उभे रहात असल्याचे चित्र आहे. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बेकारीची कुऱ्हाड
काही दिवसांपूर्वी पेनसिल्वानिया येथील एका अन्न वितरण केंद्राबाहेर सुमारे एक हजार मोटार गाड्या रांग लावून उभ्या होत्या. सध्या सरकारबरोबरच अनेक सामाजिक संस्था मदतकार्यात गुंतल्या आहेत. मात्र, आगामी काळात मागणीची सुनामी आल्यास पुरवठा करता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. अन्न पाकिटांची मागणी मार्च महिन्यात ४० टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या आठवड्यात टेक्सास प्रांतातील सॅन अँटोनिओ येथे एकाच अन्न वितरण केंद्राबाहेर दहा हजार मोटार गाड्या उभ्या होत्या. यातील अनेक जण आदल्या रात्रीपासूनच रांगेत उभे होते. अमेरिकेत ‘फिडींग अमेरिका’ ही संघटना अन्न वितरणाचे मोठे काम करत आहे. अमेरिकेत लॉकडाऊनच्या काळात अनेकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळलीय. लॉकडाऊन संपल्यानंतरही अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर कॉस्ट कटिंग होण्याची शक्यता आहे. त्यातही अनेकांना आपल्या नोकरीवर पाणी सोडवं लागणार आहे. अमेरिकेतील अनेक कंपन्यांनी भारत, चीन, फिलिपिन्स सारख्या देशांमध्ये आऊससोर्स केलेले प्रोजेक्ट यापूर्वीच रद्द केले आहेत. त्याचबरोबर या कंपन्यांची अमेरिकेतील ऑफिसेसही बंद होण्याची शक्यता आहे. 

आणखी वाचा - ट्रम्प भडकले, चीनविषयी काय म्हणाले?

घरात थांबणार नाही 
कॉनकॉर्ड : अमेरिकेत अनेक ठिकाणी शेकडो नागरिकांनी घराबाहेर पडत घरीच थांबण्याची सरकारची सूचना धुडकावून लावली. लॉकडाउनची आता गरज नसल्याने बाहेर पडण्याची परवानगी द्यावी, अशी या नागरिकांचे म्हणणे आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राज्यांमधील लॉकडाउन शिथील करण्याचे अधिकार राज्यपालांना दिले आहेत. लॉकडाउनची आवश्‍यकता नसल्याचे खुद्द ट्रम्प यांचेच म्हणणे असल्याने अनेक लोक बाहेर येत आहेत. टेक्सासमध्ये शेकडो लोक रस्त्यांवर येत ‘आम्हाला काम करू द्या’ असा नारा देत आहेत. इंडियानापोलिस येथेही सुमारे दोनशे जणांनी राज्यपालांच्या घराबाहेर निदर्शने केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus usa rich persons are waiting food distribution que