Coronavirus : लस निर्मितीच्या शर्यतीत कोण जिंकणार?

वृत्तसंस्था
Friday, 24 April 2020

७१० जणांवर होणार चाचणी
ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठात ५१० जणांना ही लस दिली जाणार असून, जर्मनीतील फेडरल इंस्टिट्यूटकडून २०० जणांना ही लस देण्यात येणार आहे. कोरोनाच्या लसीची चाचणी घेण्यासाठी निवडण्यात आलेले स्वयंसेवक १८ ते ५५ वर्षे वयोगटातील आहेत. लसीची वेगवेगळी मात्रा (डोस) वेगवेगळ्या गटांना दिली जाणार असून, त्याद्वारे संबंधित लस कोरोनाच्या विषाणूला रोखण्यासाठी किती प्रमाणात यशस्वी होते हे तपासले जाणार आहे.   

लंडन - कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी त्यावर प्रभावी लस शोधण्याचे प्रयत्न अनेक देशांमध्ये सुरू आहे. त्यासाठी जगभरातील औषधनिर्मितीच्या क्षेत्रातील बड्या कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा सुरू असल्याचे दिसते आहे. कोरोनावर लस शोधण्यासाठी सध्या जगभरात एकूण १५० प्रकल्प सुरू आहेत. लस शोधण्याचा कामात ब्रिटन आणि जर्मनीनेही आघाडी घेतल्याचे दिसते. कोरोनाच्या विरोधातील लसीच्या मानवावरील चाचण्यांना ब्रिटन आणि जर्मनीत आजपासून (ता. २३) सुरवात झाली आहे. कोरोनावरील लसीची मानवावरील चाचण्यांची परवानगी मिळालेल्या पाच देशांमध्ये आता ब्रिटन आणि जर्मनीचा समावेश झाला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी त्यावर तातडीने लस तयार करणे हा या लढाईतील सर्वांत प्रभावी मार्ग आहे. त्यामुळे अशा लसीच्या निर्मितीसाठी लंडनमधील इंपीरियल कॉलेजला ब्रिटीश सरकारकडून २.२५ कोटी पाउंडांचा निधी देण्यात आला आहे. 
- मॅट हॅनकॉक, ब्रिटनचे आरोग्यमंत्री 

दुष्परिणामांचीही स्वतंत्रपणे अभ्यास 
ब्रिटन आणि जर्मनीत लसीच्या मानवावरील चाचण्यांना सुरवात झाली असून, या अभ्यासात संबंधित लसीचे नेमके कुठले दुष्परिणाम दिसून येतात हेही तपासले जाणार आहे.

ब्रिटनमधील तज्ज्ञांना चिंता
कोरोनावरील लसीच्या निर्मितीसाठी संशोधकांना लागेल ती सर्व मदत तातडीने उपलब्ध करून देण्याची तयारी ब्रिटनच्या सरकारने दाखविली आहे. मात्र, याबाबत ब्रिटनमधील विषाणूतज्ज्ञांना एका चिंतेने ग्रासले आहे. लसीचे दुष्परिणाम झाल्यास त्याचा फटाक हजारो-लाखो नागरिकांना बसू शकतो. त्याच बरोबर लसची निर्मिती करणाऱ्या प्रयोगशाळांच्या सुरक्षेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. ब्रिटनचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार पॅट्रीक वालांसे यांनीही यासंदर्भात चिंता व्यक्त केली होती.  

ब्रिटन

  • कोरोनाविरोधातील लसीच्या मानवावरील चाचण्यांना गुरुवारपासून सुरवात
  • ऑक्सफर्ड विद्यापीठातील जेनर इंस्टिट्यूट सहभागी
  • ही लस प्रभावी ठरू शकेल याची ८० टक्के शक्यता वर्तविण्यात येत आहे
  • या लसीचे सुमारे दहा लाख डोस तयार 
  • लसीच्या निर्मितीसाठी ब्रिटन सरकारकडून संशोधकांना मोठे पाठबळ

जर्मनी 

  • बायोएनटेक या जर्मन कंपनीला कोरोनावरील लसीच्या मानवावरील चाचण्या घेण्यास परवानगी
  • अमेरिकेतील फायझर कंपनीबरोबर संयुक्त प्रकल्प
  • ‘बीएटी१६२’ नावच्या प्रकल्पांतर्गत चार प्रकारच्या लसींची निर्मिती केली जाणार
  • जर्मनीतील प्रयोग यशस्वी झाल्यास अमेरिकेतही या लसीच्या मानवावरील चाचण्यांना परवानगी
  • बायोएनटेकचा चीनमधील शांघाय फोसन फार्मास्युटीकल्सबरोबर मार्चमध्ये सहकार्य करार

जगभरातील प्रयोग
चीन -

१) सिनोव्हॅक बायोटेक
२) वुहान इंस्टिट्यूट ऑफ बायोलॉजीकल प्रॉडक्ट्स
३) अॅकाडमी ऑफ मिलिटरी मेडीकल सायन्सेस
४) कॅनसिनो बायो (हॉंगकॉंग)

अमेरिका -
१) मोडेर्ना इनकार्पोरेशन व यूएस नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हेल्थ
२) फायझर
३) इनोव्हो फार्मास्युटीकल्स

जर्मनी -
१) फेडरल इंस्टिट्यूट २) क्युअरव्हॅक

ब्रिटन -
१) जेनर इंस्टिट्यूय, ऑक्सफर्ड विद्यापीठ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus Who will win the race for vaccine production