इटलीतही लॉकडाऊन वाढला; जाणून घ्या जगात कोठे काय घडले!

पीटीआय
Sunday, 12 April 2020

फ्रान्समध्ये तीव्रता कायम
फ्रान्समध्ये कोरोना संसर्गामुळे शुक्रवारी चोवीस तासात ९८७ जणांचे बळी गेले आहेत. आयसीयूमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत चालल्याचे आरोग्य खात्याने म्हटले आहे. ९८७ पैकी ५५४ बळी रुग्णालयात तर ४३३ जणांचे बळी नर्सिंग होममध्ये गेले. त्यामुळे आतापर्यंत फ्रान्समध्ये मृतांची संख्या १३,१९७ वर पोचली आहे. दहा वर्षाच्या मुलाचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. मात्र त्याला अनेक प्रकारचे आजार होते, असे आरोग्य खात्याने म्हटले आहे.

रोम - इटलीमध्ये कोरोना संसर्गाने हाहाकार माजवला असल्याने इटलीचे पंतप्रधान ग्युसेपे कोंटे यांनी उद्योगपतींचा दबाव झुगारत लॉकडाउन तीन महिन्यांपर्यंत वाढविला आहे. इटलीत कोरोनामुळे आणखी ५७० जणांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत १८,८४९ जण मृत्युमुखी पडले आहेत. ही संख्या अन्य देशाच्या तुलनेत अधिक आहे. लॉकडाउनमुळे देशात उद्योग सुरू झाले नाही, तर कर्मचाऱ्यांना वेतन देता येणार नाही, असे उद्योग संघटनेने म्हटले होते. परंतु, या मागणीकडे साफ दुर्लक्ष करत देशाच्या स्थितीची जबाबदारी घेत कोंटे यांनी लॉकडाउचा काळ वाढविला. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इटलीत कोरोना व्हायरस बाधितांची संख्या १ लाख ४७ हजार ५७७ वर पोचली आहे. काल इटलीत नव्याने ३,९५१ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. देशात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या जगात सर्वाधिक आहे. इटलीत आतापर्यंत १९ हजाराच्या आसपास नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या पाश्‍र्वभूमीवर कोंटे पत्रकार परिषदेत म्हणाले की, सध्याची स्थिती पाहता देशात तीन मे पर्यंत लॉकडाउन ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यादरम्यान सर्व नागरिक आपल्याच घरात राहतील. हा निर्णय कठिण असला तरी आवश्‍यक आहे. यासाठी मी संपूर्णपणे राजनैतिक जबाबदारी घेण्यास तयार असल्याचे कोंटे म्हणाले.

मंत्रिमंडळ, स्थानिक अधिकारी, कामगार संघटना, उद्योगपती यांच्याशी चर्चा केल्यानंतरच लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे कोंटे म्हणाले. पंतप्रधान कोंटे म्हणाले, की देशातील स्थिती चांगली होण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. जर तीन मेच्या पूर्वीच देशातील स्थितीत बदल झाला तर निश्‍चित निर्णय घेऊ. लॉकडाउनच्या काळात अत्यावश्‍यक सेवा सुरू राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्याची आकडेवारी पाहिल्यास मृतांच्या संख्येत घट झाली आहे. २७ मार्च रोजी इटलीत कोरोनामुळे एकाच दिवशी ९१९ जणांचे बळी गेले होते. त्याचवेळी ९ एप्रिल रोजी हा आकडा ६१० वर आला. इटलीत आतापर्यंत ३० हजाराहून अधिक बाधित नागरिकांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.

अमेरिकेत मृतांमध्ये ४० भारतीय
न्यूयॉर्क -
 कोरोनामुळे अमेरिकेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये ४० भारतीय वंशाच्या नागरिकांचा समावेश आहे. अमेरिकेतील पाच लाख कोरोनाग्रस्तांमध्ये १५०० भारतीय आहेत. न्यूयॉर्क आणि न्यूजर्सी भागांत सर्वाधिक संसर्ग असून याच भागांमध्ये भारतीयांची संख्याही अधिक आहे.

ब्रिटनला पुरविणार पॅरासिटेमॉल
लंडन -
 ब्रिटनला आवश्यक असणाऱ्या पॅरासिटेमॉल औषधाच्या ३० लाख पाकिटांचा पुरवठा भारत करणार असून त्याबद्दल ब्रिटनने भारताचे आभार मानले आहेत. उद्यापर्यंत  हे औषध पाठवले जाणार आहे. कोरोनाविरोधात ब्रिटन आणि भारत एकत्र असल्याचे यावेळी ब्रिटनने सांगितले. 

सिंगापूरने मानले आभार
सिंगापूर -
 भारतात अडकलेल्या सिंगापूरच्या ६९९ नागरिकांना परत आणण्याची परवानगी दिल्याबद्दल या देशाने भारताचे आभार मानले आहेत. देशात विविध ठिकाणी असलेल्या या नागरिकांना मुंबई, दिल्ली आणि चेन्नई येथून खासगी विमानांनी परत नेण्यात आले. सिंगापूरमध्येही अनेक भारतीय असून त्यांची योग्य काळजी घेत असल्याचे या देशाचे पंतप्रधान ली सिन यांनी सांगितले आहे.

फ्रान्समध्ये तीव्रता कायम
पॅरिस -
फ्रान्समध्ये कोरोना संसर्गामुळे शुक्रवारी चोवीस तासात ९८७ जणांचे बळी गेले आहेत. आयसीयूमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत चालल्याचे आरोग्य खात्याने म्हटले आहे. ९८७ पैकी ५५४ बळी रुग्णालयात तर ४३३ जणांचे बळी नर्सिंग होममध्ये गेले. त्यामुळे आतापर्यंत फ्रान्समध्ये मृतांची संख्या १३,१९७ वर पोचली आहे. दहा वर्षाच्या मुलाचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. मात्र त्याला अनेक प्रकारचे आजार होते, असे आरोग्य खात्याने म्हटले आहे. 

फ्रान्समध्ये १७ मार्चपासून लॉकडाउन असून तेथे सध्या अत्यावश्‍यक सेवा सुरू आहेत. फ्रान्सचे अध्यक्ष इम्यानूएअल मॅक्रॉन यांनी याही आठवड्यात देशाला उद्देशून मार्गदर्शन केले. लॉकडाउन सुरू झाल्यानंतर हे त्यांचे तिसरे भाषण होते. फ्रान्सची स्थिती अजूनही आटोक्यात आली नसल्याने लॉकडाउनचा कालावधी वाढविला जावू शकतो. सध्या फ्रान्समध्ये १५ एप्रिलपर्यंत लॉकडाउन आहे. यादम्यान अध्यक्ष मॅक्रॉन यांनी काल फ्रान्समधील उद्योगपती आणि संघटनेच्या नेत्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरसिंगने चर्चा केली. तसेच यापुढील स्थितीचा निपटारा करण्याबाबत चर्चा केली. 

पॅरिसमधील रुग्णालयात रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता फ्रान्सने शहरातील आणखी ४५ कोरोनाबाधित रुग्णांना रेल्वेने अन्य शहरात स्थानांतरित केले. याअगोदर एक एप्रिलपासून दोनशेहून अधिक रुग्णांना रस्ते, रेल्वे आणि हवाईमार्गाने पॅरिस प्रांतातून  हलविले आहे. तसेच फ्रान्सची मालवाहू हवाई कंपनी चार्ल्स डे गॉलच्या ५० हून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus worldwide update italy lockdown extended