कोरोनाच्याबाबतीत जगात काय घडलंय? वाचा एका क्लिक वर

पीटीआय
Saturday, 11 April 2020

रुग्णसंख्येत वाढ होण्याचे प्रमाण काही अंशी कमी झाले असले तरी कोरोना विषाणूने अद्यापही जगाला दिलासा दिलेला नाही. या विषाणूमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ९४ हजारांच्या पुढे गेली आहे. संसर्गामुळे मृत्यू होण्याचा वेग पाहता लवकरच ही संख्या एक लाखांपर्यंत जाण्याची स्पष्ट चिन्हे आहेत.

ब्रुसेल्स - रुग्णसंख्येत वाढ होण्याचे प्रमाण काही अंशी कमी झाले असले तरी कोरोना विषाणूने अद्यापही जगाला दिलासा दिलेला नाही. या विषाणूमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ९४ हजारांच्या पुढे गेली आहे. संसर्गामुळे मृत्यू होण्याचा वेग पाहता लवकरच ही संख्या एक लाखांपर्यंत जाण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. अमेरिकेत गुरुवारी (ता. ९) १७०० जणांचा झालेला मृत्यू आणि युरोपातही सुरु असलेले थैमान यामुळे जगातील मृतांची संख्या ९४ हजारांच्या पुढे गेली आहे. एकूण बळींपैकी निम्मे बळी फक्त गेल्या आठवड्यातील आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना विषाणूने अमेरिका आणि युरोपवर सर्वांत मोठा घाव घातला आहे. आता मात्र येथील दररोज होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे सर्वांत कठिण काळ सरला असल्याची आशा या देशांमध्ये निर्माण झाली आहे. इटली आणि स्पेनमध्येही दररोज सरासरी ८०० जणांचा मृत्यू होत होता, हे प्रमाण आता ७०० पर्यंत खाली आले आहे. फ्रान्समध्येही रुग्णसंख्या घटली आहे. अमेरिकेतही अपेक्षित असलेला सर्वांत कठिण काळ लवकर संपल्याची चिन्हे दिसत आहेत. येथेही मृतांचे प्रमाण घटले आहे. अमेरिकेत बळींची संख्या १७ हजारांच्या जवळ गेली आहे.

‘ईयू’कडून निधी
ब्रुसेल्स -
 आर्थिक गर्तेत पडलेल्या युरोपीय देशांना आधार देण्यासाठी युरोपीय महासंघाच्या अर्थमंत्र्यांनी ५०० अब्ज युरोंची मदत या देशांना देण्यास मंजुरी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून या मुद्यावर चर्चा सुरु होती. मात्र, काही देशांच्या अटींमुळे मदतनिधी जाहीर होण्यास विलंब झाला.

इटलीचे प्रयत्न
रोम -
 इटलीमध्ये मे महिन्यापर्यंत लॉकडाउन वाढविण्याचा सरकारचा विचार आहे. रुग्णसंख्या आता थोडी कमी होत असली तरी या संसर्गाची दुसरी लाट रोखण्यासाठी सरकार नियमांची कडक अंमलबजावणी करणार आहे.

अडीचशे भारतीय बाधित
सिंगापूर -
 येथे सुमारे अडीचशे भारतीयांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे भारतीय उच्चायुक्तालयाने सांगितले. बाधित भारतीयांपैकी निम्मे जण कामगार छावणीमध्ये रहात आहेत. 

इटलीकडून भारताचे आभार  
जेरुसलेम -
 हायड्रॉक्सिक्लोरोक्विनसह सुमारे पाच टन औषधांचा साठा पाठविल्याबद्दल इस्राईलने भारताचे आभार मानले आहेत.

‘गुड फ्रायडे’ शांततेत
जेरुसलेम -
 लॉकडाउन असल्याने आजचा ‘गुड फ्रायडे’ कोणत्याही सामूहिक प्रार्थनेविना पार पडला.

ब्रिटनचे प्रयत्न
लंडन -
 भारतात अडकलेल्या ब्रिटिश नागरिकांना आणण्यासाठी ब्रिटनची बारा विमाने उड्डाण करणार.

जगभरातील घडामोडी

  • ढाका : रोहिंग्या निर्वासितांची मोठी संख्या असलेल्या कॉक्सबझार जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाउन. 
  • इस्लामाबाद : पाकमध्ये बाधितांची संख्या ४,५००, मृतांची संख्या ६६ वर. विमान उड्डाणांवरील बंदी २१ एप्रिलपर्यंत वाढविली. 
  • साना : येमेनमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. 
  • वॉशिंग्टन : तैवानने खूप आधी इशारा देऊनही जागतिक आरोग्य संघटनेने त्याकडे दुर्लक्ष केले आणि राजकारणाला अधिक महत्त्व दिले, असा आरोप अमेरिकेने आज केला आहे.
  • जोहान्सबर्ग : लॉकडाउन दोन आठवड्यांनी वाढवला; वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या वेतनात ३० टक्के कपात.
  • ब्रुसेल्स : बेल्जियममध्ये मृतांची संख्या तीन हजारांच्यावर.
  • माद्रीद : स्पेनमध्ये गेल्या चोवीस तासांमध्ये ६०५ जणांचा मृत्यू. गेल्या १७ दिवसांतील ही सर्वांत कमी संख्या.
  • दुबई :  कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या भारतीय नागरिकास अटक

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus worldwide update marathi