कोरोनाचा स्फोट झालेल्या चीनमधील वुहानची आता काय स्थिती?

टीम ई-सकाळ
बुधवार, 25 मार्च 2020

चीनमध्ये कोरोनानं थैमान घातलं. पण, या कोरोना व्हायरसची तीव्रता मध्य चीनमधील हुबेई प्रांतात सर्वाधिक होती. हुबेई प्रांतातील वुहान शहरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण होते.

वुहान (चीन Coronavirus):भारतात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 21 दिवसांचा लॉक डाऊन जाहीर करण्यात आलाय. युरोपमध्ये इटली, स्पेन, फ्रान्स, जर्मनीमध्ये चिंताजनक स्थिती आहे. पण, ज्या चीनमधून या कोरोना व्हायरसची सुरुवात झाली, त्या चीनमध्ये परिस्थिती सुधारत आहेत. मंगळवारी केवळ 47 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती होती. सोमवारी हा आकडा 78 होता. त्यामुळं नव्यानं कोरोनाची लागण होण्याची संख्या कमी होत आहे. सर्वाधिक फटका बसलेल्या हुबेई प्रांतातलं जनजीवन हळू हळू सुधारत आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय चाललं हुबेई प्रांतात
चीनमध्ये कोरोनानं थैमान घातलं. पण, या कोरोना व्हायरसची तीव्रता मध्य चीनमधील हुबेई प्रांतात सर्वाधिक होती. हुबेई प्रांतातील वुहान शहरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण होते. हुबेई प्रांताची लोकसंख्या 6 कोटी आहे. या सहा कोटी लोकसंख्येला आता मोकळा श्वास घेता येऊन लागलाय. हुबेई, वुहान शहरातील संचारबंदी आता शिथील करण्यात आली आहे. नागरिकांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळं संचारबंदीत अडकून पडलेले अनेकजण आता घरी परतू लागले आहेत. हुबेई राज्य सरकारने आता पुन्हा आपल्या कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे संकेत दिले आहेत. या कर्मचाऱ्यांना सरकारने होम क्वारंटाईन होण्याचे आदेश दिले होते. आता या कर्मचाऱ्यांना कोणत्याही क्षण कामावर हजर होण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळं वुहान शहरात नागरिकांची ये-जा दिसू लागली आहे. पण, त्याचे प्रमाण खूप कमी दिसत आहे.

कोरोनाशी संबंधित अपडेट्स वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चीनला चिंता वेगळीच!
चीनमधील आरोग्य कर्मचारी, डॉक्टर यांनी खूप मोठी लढाई जिंकली आहे. अथक परिश्रम होऊन त्यांनी अनेक कोरोनाग्रस्त रुग्णांना बरे केले आहे. तसेच अनेकांना लागण होण्यापासून वाचवलेही आहे. परंतु, आता चीनला वेगळीच चिंता जाणवत आहे. यामधल्या काळात चीनच्या बाहेर अनेक देशांमध्ये कोरोनाची लागण झाली होती. काम,व्यवसायाच्या निमित्ताने चीनच्या बाहेर असणाऱ्या अनेकांनी आता घरचा रस्ता धरला आहे. पण, या चाकरमान्यांनी आपल्या घरी येताना स्वतःची नीट तपासणी करून घेण्याची गरज असल्याचं मत स्थानिक नागरिकांकडून होत आहे. गेल्या काही दिवसांत चीनमधील नागरिकांनी कोरोनाची दहशत अनुभवली आहे. त्यामुळंच आता पुन्हा ते अनुभवण्याची त्यांची मानसिकता नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळं विदेशातून परतलेल्यांविषयी चीनमध्ये शंकेचे वातावरण आहे.

कोरोनाशी संबंधित अपडेट्स वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सरकारची सक्ती
पुन्हा कोरोना व्हायरस पसरू नये म्हणून हुबेई राज्य सरकारने विदेशातून आलेल्यांसाठी आरोग्य चाचणी सक्तीची केली आहे. तसेच त्यांची ट्रॅव्हल हिस्ट्रीही तपासण्यात येत आहे. तो कोणत्या देशातून आला आहे? तेथे तो कोणते काम करत होता? याची माहिती घेतली जात असून, त्याच्या प्रकृतीवर नजर ठेवण्यात येत आहे. विदेशातून येणाऱ्या नागरिकांची इतकी धास्ती आहे की, फुज्जन प्रांतातील क्वानझाहू शहरात येणाऱ्या इंटरनॅशनल फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत. ही सेवा 27 मार्चपासून सुरू होण्याची शक्यता आहे. बीजिंग विमानतळावर येणाऱ्या फ्लाईट्स यापूर्वीच इतर शहारांत वळवण्यात आल्या आहेत. ज्या शहरांत प्रवाशांना क्वारंटाईन करण्याची सोय आहे. त्या शहरांतच या फ्लाईट्स उतरवल्या जात आहेत. बीजिंगसह इतर तीन शहरातील कोरोना रुग्णांचे वृत्त चुकीचं असल्याचं सांगण्यात आलं असून, शांघायमध्ये मात्र 19 नवे रुग्ण सापडले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus wuhan hubei china release lockdown