Coronavirus : कोरोनापुढे विकसित देश सुद्धा झाले हतबल

पीटीआय
Saturday, 4 April 2020

वृद्धाश्रमांमधील बळींची संख्याही नऊशे
पॅरिस - फ्रान्समध्ये कोरोनाबळींची संख्या वेगाने वाढत असतानाच येथील वृद्धाश्रमांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये संसर्गामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्याही ८८४ असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी प्रथमच जाहीर केले आहे. आत्तापर्यंत येथे साडे चार हजार जणांचा मृत्यू झाल्याचा सरकारी आकडा असून ही केवळ रुग्णालयात मरण पावलेल्यांची संख्या आहे. यामध्ये वृद्धाश्रमातील मृतांची संख्या समाविष्ट केल्यास फ्रान्समध्येही कोरोनाबळींची संख्या पाच हजारांच्या वर जाते.

लंडन - लॉकडाउन जाहीर करून पंधरा दिवस उलटले असतानाही युरोप, अमेरिकेतील मृतांची संख्या धक्का बसावा, या वेगाने वाढत आहे. अमेरिका, ब्रिटन, इटली, स्पेन, नेदरलँड, फ्रान्स हे विकसीत देश हतबल झाले आहेत. जगभरातील एकूण संसर्गग्रस्तांपैकी एक चतुर्थांश जण एकट्या अमेरिकेत आहेत. या संसर्गात अमेरिकेतील एक लाख ते अडीच लाख लोकांचा मृत्यू होईल, असा अंदाज खुद्द ‘व्हाइट हाऊस’नेच व्यक्त केला आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अमेरिका सरकारने त्यांच्या लष्कराला शव झाकून ठेवणाऱ्या एक लाख बॉडीबॅग तयार ठेवण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून युरोप हाच संसर्गाचा केंद्रबिंदू राहिला आहे. जगातील एकूण मृतांपैकी निम्मे लोक फक्त इटली आणि स्पेनमधील आहेत. अर्थात, इटली आणि स्पेनमधील नव्या संसर्गग्रस्तांची संख्या घटत असल्याचा एकमात्र दिलासा मिळत आहे. 

No photo description available.

नवी  तात्पुरती रुग्णालये बांधण्याच्या कामास ब्रिटनमध्ये वेग आला असून रुग्णांची संख्या ३५०० पर्यंत गेल्याने रशियात सरकारने कर्मचाऱ्यांच्या पगारी सुटीमध्ये ३० एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.

जगभरातील घडामोडी -
अल्पसंख्यांकांना दोष नको
वॉशिंग्टन -
 कोरोना विषाणूच्या प्रसारासाठी अल्पसंख्याक समाजाला दोषी ठरविणे चुकीचे असल्याचे मत अमेरिकेने व्यक्त केले आहे. इराण आणि चीनमध्ये असे काही प्रकार घडल्यानंतर अमेरिकेने भूमिका मांडली आहे. सर्व धार्मिक गटांनी सुरक्षिततेचे आणि स्वच्छतेचे सर्व नियम पाळावेत, असे अमेरिकेने म्हटले आहे.

मेळाव्यांमुळे पाक त्रस्त
इस्लामाबाद -
 संसर्ग वाढत असल्याने पाकिस्तान सरकारने जमावबंदी लागू केली असतानाही येथे मोठ्या संख्येने धार्मिक मेळावे होत असल्याने सरकार हतबल झाले आहे. या मेळाव्यांना गर्दीही होत असल्याने संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. पाकिस्तानमध्ये कोरोनाबाधितांची संख्या २४५० झाली आहे.

चीनमध्ये आज दुखवटा
बीजिंग -
 कोरोना विषाणूमुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांबरोबरच या संसर्गापासून रुग्णांना मुक्त करताना मृत्युमुखी पडलेल्या डॉक्टरांना श्रद्धांजली म्हणून चीनमध्ये उद्या (ता. ४) राष्ट्रीय दुखवटा पाळला जाणार आहे. चीनमध्ये सकाळी दहा वाजता सर्व नागरिक तीन मिनीटे स्तब्ध उभे रहात शांतता पाळणार आहेत.

ट्रम्प यांची चाचणी निगेटिव्ह
वॉशिंग्टन -
 अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची दुसऱ्यांदा घेण्यात आलेली कोरोना चाचणीही निगेटिव्ह आली आहे. ट्रम्प हे पूर्णपणे निरोगी असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले आहे. संसर्गग्रस्त दोन व्यक्तींच्या संपर्कात आल्यामुळे ट्रम्प यांची गेल्या महिन्यात चाचणी घेतली होती. ती चाचणीही निगेटिव्ह आली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Developed countries were also desperate before Corona