Coronavirus : कोरोनासोबत वाढतोय वर्णद्वेषाचा विषाणू

पीटीआय
Tuesday, 7 April 2020

कुंग-फु नव्हे कुंग-फ्लू
मार्च महिन्यात फक्त ट्विटरवर दहा हजारांहून जास्त पोस्टमध्ये ‘कुंग-फु’ ऐवजी ‘कुंग-फ्लू’ या शब्दाचा समावेश होता. या शब्दाचा वेगवेगळ्या पद्धतीने होणारा उच्चार पाहता हे प्रमाण कितीतरी पटीने जास्त असण्याची शक्‍यता आहे. व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्यानेच हा शब्दप्रयोग केल्याचे वृत्त होते. त्यानंतर याचा वापर वाढला. हा शब्द ज्यांना अवमानकारक वाटतो त्यांना आणखी चीड यावी म्हणून हजारो यूजर त्याचा वापर करू लागले. याशिवाय वर्णभेदासाठी ‘चॉप फ्लूई’ आणि ‘राईस बेबीज’ असे अवमानकारक शब्दप्रयोगही वापरण्यात येत आहेत.

दोहा (कतार) - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव तीव्र होत असताना अमेरिकेसह काही देशांत आशियाई नागरिकांच्या विरोधात सोशल मीडियावरील वर्णभेद वाढला आहे. यात प्रामुख्याने चीनच्या नागरिकांना लक्ष्य केले जात आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

फेसबुक, ट्विटर आणि टिकटॉक या सोशल मीडिया माध्यमांनी हे रोखण्याची ग्वाही दिली असली तरी हे प्रमाण वाढत आहे. त्यातच अफवा तसेच खोट्या बातम्यांमुळे यात आणखी भर पडली आहे.

जिंग ही या शांघायमधील विद्यार्थिनीने मार्च महिन्याच्या प्रारंभी फेसबुकवर व्हिडिओ डायरी पोस्ट करण्यास सुरूवात केली. कोरोनाचे जागतिक साथीत रुपांतर होत असताना आपल्या शहरातील जीवन कसे आहे हे दाखविण्याचा तिचा उद्देश होता. तिचा व्हिडिओ साठ हजारांहून अधिक यूजरनी पाहिला. अनेकांनी तिचे आभार मानले आणि पाठिंबा दर्शविला. त्यानंतर मात्र शिवीगाळ, अवमान करणाऱ्या पोस्ट पडण्यास सुरूवात झाली.

‘चायना मिनिट्‌स’ या फेसबुक पेजवरील एका कमेंटमध्ये ‘मिचमिच्या डोळ्यांच्या तिरस्करणीय व्यक्ती’ असा उल्लेख होता. आणखी एका कमेंटमध्ये चीनने लोकसंख्या नियंत्रणासाठी विषाणू तयार केल्याचा आरोप होता. अशा कमेंट नंतर डिलीट करण्यात आल्या, पण जिंग त्याआधीच दुखावली होती.

अमेरिका, ऑस्ट्रेलिया, भारत आणि ब्रिटन या देशांत भर रस्त्यांवर अनेक आशियाई नागरिकांना वर्णभेदाला सामोरे जावे लागले आहे. 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चायनीज व्हायरस असे ट्‌वीट केल्यामुळे चीनने तीव्र नापसंती व्यक्त केली होती. आता कोरोना संसर्गाचे अनेक देशांतील संशयित रुग्ण वाढत असताना वर्णभेदाचे प्रमाण वाढले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Growing racism with Corona