WHO ने केले भारताचे कौतुक, लढाऊ वृत्तीला सलाम!

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 मार्च 2020

चीनसारखाच भारतही सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव होण्यापूर्वीच भारताने योग्य ती खबरदारी घेतली आहे. नागरिकांचे आरोग्य जपण्याच्या आणि त्यांचा जीव वाचवण्यासाठी भारताने उचललेली पाऊलं ही अगदी योग्य आहेत.

न्यूयॉर्क : कोरोना व्हायरस चीन आणि इटली सारख्या देशांवर भारी पडलेला असतानाच भारताने मात्र कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खबरदारी घेतली आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी भारताने पूर्णपणे सतर्कता पाळली आहे. देशातील ५४८ जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन जाहीर केले आहे. ही कठोर पाऊलं भारत उचलत आहे, त्यांनी ही कामगिरी अशीच सुरू ठेवावी असं म्हणत जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्ल्यूएचओचे कार्यकारी संचालक जे रेयान यांनी भारताच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. 

चीनसारखाच भारतही सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव होण्यापूर्वीच भारताने योग्य ती खबरदारी घेतली आहे. नागरिकांचे आरोग्य जपण्याच्या आणि त्यांचा जीव वाचवण्यासाठी भारताने उचललेली पाऊलं ही अगदी योग्य आहेत. त्यांनी ही उपाययोजना अशाच प्रकारे सुरू ठेवावी. भारताने देवी व पोलिओ या दोन्ही रोगांशी अशाच प्रकारे लढा दिला होता, त्यामुळे भारतीयांची लढा देण्याची वृत्तीही दिसून येत आहे, असे रेयान यांनी स्पष्ट केले.

भारतात ७ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला असून जवळपास ५०० कोरोनाग्रस्त रूग्ण आढळून आले आहेत. तर महाराष्ट्रात तीन बळी गेले असून कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या ९० हून अधिक झाली आहे. तर महाराष्ट्र व पंजाब ही दोन्ही राज्ये तर दिल्लीही लॉकडाऊन करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India has tremendous capacities says WHO Executive Director Dr Michael J Ryan