Coronavirus : ब्रिटनमध्ये संसर्गाचा वेग वाढतोय...

पीटीआय
सोमवार, 23 मार्च 2020

अमेरिकेची मदत इराणने नाकारली
तेहरान - कोरोना विषाणू ही अमेरिकेचीच निर्मिती असू शकते, अशी शंका उपस्थित करत इराणने आज अमेरिकेने देऊ केलेली मदत स्पष्टपणे नाकारली. इराणमध्ये कोरोनाचा संसर्ग अधिक असल्याने त्यांना औषधे देण्याची तयारी अमेरिकेने दर्शविली होती. मात्र, अमेरिका औषधांमार्फत विषाणूच आमच्याकडे पाठवेल. कारण, हा विषाणू इराणला नष्ट करण्यासाठीच तयार केला गेला आहे, असा संशय इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी व्यक्त केला.

तीन दिवसांनंतर पहिला रुग्ण
बीजिंग -
 कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविल्याचा चीनने दावा केला असून, त्यांच्याकडे तीन दिवसांच्या खंडानंतर आज कोरोनाचा संसर्ग झालेला स्थानिक रुग्ण आढळला आहे. तसेच, येथे ४५ विदेशी लोकांनाही संसर्ग झाल्याचे सिद्ध झाल्याने कोरोनाची ही दुसरी लाट थोपविण्यासाठी चीन सरकार अधिक कडक उपाययोजना राबविण्याची शक्यता आहे. चीनमध्ये आज सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. वुहानमध्ये मात्र कोणताही रुग्ण आढळलेला नाही.

लंडन - प्रगत म्हणून गणल्या गेलेल्या देशांना कोरोनाने भयग्रस्त केले असून, त्याचीच झलक आज ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या वक्तव्यातून दिसून आली. आपण इटलीपेक्षा केवळ दोन ते तीन आठवडेच मागे आहोत. त्यामुळे काळजी घ्या, असे आवाहन त्यांनी आज ब्रिटनवासीयांना केले आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘देशातील जवळपास १५ लाख लोकांना संसर्गाचा धोका असून, त्यांनी पुढील १२ आठवडे घरातच राहावे. आपल्या देशात संसर्गाचा वेग वाढतो आहे. इटलीमधील आरोग्य यंत्रणा उत्कृष्ट आहे आणि तरीही तिथे जनतेचे हाल होत आहेत. आपण त्यांच्यापेक्षा दोन ते तीन आठवडेच मागे आहोत. त्यामुळे नागरिकांनी घरीच बसून सहकार्य करावे,’ असे आवाहन जॉन्सन यांनी केले आहे. 

कोरोना सहा दिवसांत बरं करणारं औषध सापडल्याचा दावा

राणीच्या सहकाऱ्याला संसर्ग
बकिंगहॅम महालातील राजघराण्याच्या कर्मचारीवर्गातील एकाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सूत्रांनी सांगितले. राणी एलिझाबेथ सध्या त्यांच्या खासगी विंडरस महालात गेल्या असल्या, तरी त्या तेथे जाण्याआधीच या कर्मचाऱ्याला संसर्ग झाल्याचे बोलले जाते. संबंधित कर्मचाऱ्याचा ज्यांच्याशी संबंध आला, त्या सर्वांना एकांतवासात पाठविण्यात आले आहे. बकिंगहॅम महालात पाचशेहून अधिक कर्मचारी काम करतात.

चीनने माहिती लपविली : ट्रम्प 

आशियातील देशांमध्ये उपाययोजना
हाँगकाँग -
 कोरोनाचा केंद्रबिंदू आशियातून युरोपकडे सरकला असला, तरी आशियातील अनेक देशांनी संसर्ग रोखण्यासाठी अनेक उपाययोजना आखल्या आहेत. मलेशियाने लॉकडाऊन जाहीर केले असून, अंमलबजावणीसाठी सैन्याला उतरविले आहे. या देशात एकूण ९५ हजार जणांना संसर्ग झाला आहे. चीनमध्ये संसर्गग्रस्तांची संख्या आटोक्यात आली असली, तरी इतर देशांमध्ये मात्र आकडा वाढतच आहे. ऑस्ट्रेलियाने इतर देशांमधील नागरिकांना बंदी केली आहे. 

जगाचे व्यवहार ठप्प; इटलीने मृतांच्या संख्येत चीनला टाकले मागे; आता बोलवले लष्कर

दूतावासात मागितला आश्रय
युरोपातून येणाऱ्या विमानांना भारताने बंदी घातल्याने येथे अडकून पडलेल्या १९ भारतीय विद्यार्थ्यांनी भारतीय दूतावासाच्या परिसरात आश्रय देण्याची मागणी केली आहे. लंडनमध्ये एकूण ५९ विद्यार्थी अडकून पडले होते. मात्र, येथील भारतीय समुदायाच्या संघटनेने त्यांना मदतीचा हात पुढे करत त्यांच्या राहण्याची सोय घरांमध्ये करून दिली. चाळीस विद्यार्थ्यांनी याचा फायदा घेतला. मात्र, १९ जणांनी ही मदत नाकारली. आता त्यांनी दूतावासात आश्रय मागितला आहे. सध्या हे विद्यार्थी दूतावासातीलच विलगीकरण कक्षात राहत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Infection is gaining momentum in Britain