esakal | #Lockdown2.0 : लॉकडाउनमुळे बऱ्याच देशात संसार मोडण्याच्या मार्गावर
sakal

बोलून बातमी शोधा

Divorse

जपानमध्ये घटस्फोट टाळण्यासाठी...
कोरोनामुळे जपानमध्येही नागरिकांना घरात थांबण्याचे आवाहन केलेले आहे. सतत एकत्र राहिल्याने पती-पत्नी एकमेकांची उणीदुणी दिसू लागल्याने घटस्‍फोटापर्यंत प्रकरणे पोचू लागली आहे. अशा निराशेने ग्रासलेल्या दांपत्याला घटस्फोटाआधी विचार करण्यासाठी शांतता लाभावी, कोणत्याही ताणाविना एकट्याला काम करता यावे किंवा एकमेकांना समजून घेण्यासाठी  जपानमधील ‘कोसोकु’ या स्‍टार्टअप कंपनीनेने सर्व सुविधांनी परिपूर्ण छोटे घर भाड्याने देण्याची योजना आखली आहे. यासाठी दिवसाला ४,४०० येन (४० डॉलर) भाडे आकारण्यात येणार आहे. तसेच ३० मिनिटे विनाशुल्क समुपदेशाची सोयही कंपनीने देऊ केली आहे.

  #Lockdown2.0 : लॉकडाउनमुळे बऱ्याच देशात संसार मोडण्याच्या मार्गावर

  sakal_logo
  By
  वृत्तसंस्था

  बीजिंग - कोरोनाव्हायरसमुळे जग जणू थांबले आहे आहे. लोक घरात बसून आहेत आणि एकापेक्षा जास्त लोक सतत एकत्र असले की ‘भांड्याला भांडे’ लागणारच. अशी अवस्था सध्या बहुतेक देशांमध्ये असून लॉकडाउनच्या काळात पती-पत्नींमधील भांडणांनी घटस्फोटापर्यंत मजल मारली असल्याचे चीन, जपान व अगदी अमेरिकेतही दिसून आले आहे. 

  बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

  चीनसह अनेक देशांत घटस्फोटासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज
  चीनमधील दक्षिण गुआंगडाँग प्रांतात राहणारी तिशीतील गृहिणी वु ही पती व दोन मुलांसह दोन महिने एकांतवासात होती. या काळात त्यांची अनेकदा भांडणे होत असत. नवरा घरात कमी पैसे देतो, टीव्ही, मोबाईल जास्त पाहतो, घरकामात मदत करीत नाही, मुलांची नीट काळजी घेत नाही, अशा अनेक तक्रारी तिने केल्या आहेत. माझा नवरा घरात अडथळा वाटत असून आम्ही घटस्फोट घ्यायचा निर्णय घेतल्याचे तिने सांगितले.

  अर्जांमध्ये वाढ
  चीनमध्ये घटस्फोटाची आकडेवारी वार्षिक पद्धतीने प्रसिद्ध केली जाते. मात्र लॉकडाउनच्या काळात म्हणजे मार्चमध्ये घटस्फोटासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज आल्याचे निरीक्षण चीनमधील प्रसारमाध्यमांनी नोंदविले आहे. पती-पत्नीला सक्तीने २४ तास घरात एकत्र राहावे लागण्याने कौटुंबिक हिंसाचाऱ्यांच्या घटनांमध्येही वाढ झाली. मध्य चीनमधील झिआन आणि सिचुआन प्रांतातील डाझोऊ या दोन्ही शहरांत मार्चच्या मध्यापर्यंत घटस्फोटासाठी विक्रमी संख्येने अर्ज आले. ‘हुनान प्रांतातील मिलुओमधील सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पाणी पिण्यासाठीही वेळ नव्हता, एवढ्या मोठ्या संख्येने जोडपी घटस्फोटासाठी आली होती,’ अशी माहिती शहर नोंदणी केंद्राचे संचालक झिआओयान यांनी दिली.

  गेल्या १५ वर्षांत चीनमधील घटस्फोटीत दांपत्यांची संख्या

  • १३,००,००० - २००३
  • ४५,००,००० - २०१८
  • ४१,५०,००० - २०१९

  अमेरिकेतील स्थिती

  • सक्तीच्या एकांतवासामुळे आणि आर्थिक तणावामुळे घटस्फोटासाठी विनंती अर्जात ५० टक्के वाढ
  • घटस्फोट घेण्यात श्रीमंत वर्गातील दांपत्यांचे प्रमाण जास्त
  • आर्थिक परिस्थिती बिकट होत असल्याने श्रीमंत जोडप्यांचा वेगळे होण्याचा विचार
  • घरात स्वतःसाठी पुरेसा वेळ मिळत नाही किंवा जोडीदाराकडून होणारी दडपशाही ही कारणे
  • लहान घर अथवा आलिशान बंगला असला तरी सतत एकत्र असल्याने वादात भर

  चीनमधील स्थिती...

  • लॉकडाउनच्या काळात घटस्फोटाच्या अर्जांत २५ टक्क्यांनी वाढ
  • दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ एकत्र राहिल्याने जोडीदारामध्ये एकमेकांविषयी द्वेषभावना
  • प्रौढांपेक्षा तरुण दापंत्यामध्ये घटस्फोटाचे प्रमाण जास्त
  • वुहानमध्ये फेब्रुवारीत कौटुंबिक हिंसाचाराच्या १६२ तक्रारी. गेल्या वर्षी याच कालावधीतील तक्रारींपेक्षा ४७ तक्रारी जास्त
  • लॉकडाउमुळे बाहेर पडू शकत नसल्याने घरात अत्याचार सहन करणाऱ्या महिलांची कुचंबणा