Coronavirus : अमेरिकेत ९/११ पेक्षा कोरोना घातक; मृतांची संख्या चार हजारावर

पीटीआय
बुधवार, 1 एप्रिल 2020

जगभरात
१)     इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह
२)     पाकिस्तानात कोरोनाच्या रुग्णांत वाढ ः दोन हजार
३)     श्रीलंकेत एकाच दिवशी सर्वाधिक रुग्ण
४)     ब्रिटनने भारतीय डॉक्‍टरांचा वर्क व्हिसा वाढविला
५)     न्यूयॉर्कमधील मृतांचा आकडा एक हजारावर
६)     दुसऱ्या महायुद्धानंतर कोरोनाचा सर्वांत मोठा धोका; संयुक्त राष्ट्रसंघ प्रमुख 
७)     दक्षिण आफ्रिकेतील भारतीय वंशाचे प्रसिद्ध विषाणू तज्ज्ञांचा मृत्यू

न्यूयॉर्क - ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडणाऱ्या अमेरिकी नागरिकांच्या संख्येपेक्षा कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या आज अधिक झाली. याप्रमाणे कोरोनाबाधित मृतांची संख्या आज ४ हजारावर पोचली. परिस्थिती अशीच कायम राहिली तरी सुमारे १ लाख ते २ लाख अमेरिकी नागरिकांचा मृत्यू होईल, असे आरोग्य विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जोन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या मते, बुधवारपर्यंत मृतांची संख्या ४ हजारावर पोचली असून देशातील सुमारे १ लाख ९० हजार नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. या आकडेवारीने ९/११ च्या हल्ल्यातील मृत्युमुखी पडलेल्या संख्येला मागे टाकले आहे. 

अल काईदाच्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे ३ हजार नागरिक ठार झाले होते. शिवाय या संख्येने चीनलाही मागे टाकले आहे. कोरोना संसर्गाचा केंद्रबिंदू ठरलेल्या चीनमध्ये ३,३१० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. जगभरात सुमारे ८ लाख ६० हजार नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून एकूण ४२ हजार नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. बाधित नागरिकांच्या संख्येत जगात अमेरिका, इटली, स्पेननंतर चीनचा क्रमांक लागतो. चीनमध्ये ८२ हजार २९४ जणांना बाधा झाली आहे.

न्यूयॉर्क राज्यात सर्वाधिक नोंद
अमेरिकेत कोरोनाबाधित रुग्ण मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण तीन दिवसात दुप्पट झाले आहे. मृतांची संख्या ४ हजार ७६ वर पोलची असून शनिवारी हीच संख्या २,०१० एवढी होती. यापैकी ४० टक्के मृत न्यूयॉर्क स्टेटमधील आहेत.

जयशंकर-पॉम्पिओ यांची फोनवरुन चर्चा
जगभरात कोरोनाचा फैलाव वाढत चालला असून त्याला रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. जगभरात ४२ हजाराहून अधिक नागरिक मृत्युमुखी पडले असून अमेरिकेतही कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. या पाश्‍र्वभूमीवर परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॅम्पिओ यांची फोनवरून चर्चा झाली. गेल्या काही आठवड्यातील ही फोनवरून झालेली दुसरी चर्चा होती. यापूर्वी चौदा मार्च रोजी जयशंकर आणि पॅम्पिओ यांनी चर्चा केली होती. चर्चेनंतर पॅम्पिओ यांनी ट्विट केले असून त्यात त्यांनी कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी परस्पर सहकार्य, औषधी साहित्य आणि उपकरणाचे उत्पादन वाढवणे आणि पुरवठ्याबाबत चर्चा केल्याचे सांगितले.

दुसऱ्या महायुद्धानंतरचे मोठे आव्हान
कोरोना व्हायरसमुळे जग संकटात सापडले असून दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर कोरोना व्हायरस हे सर्वात मोठे आव्हान असल्याचे संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस ॲन्टानिओ गुंतरेस यांनी म्हटले आहे. अलीकडच्या काळात एवढे मोठे संकट कधीही आले नव्हते, असेही त्यांनी म्हटले आहे. 

आगामी दोन आठवडे हा परीक्षेचा काळ
कोरोना व्हायरसच्या तीव्र प्रसारामुळे अमेरिका हादरली असून आगामी दोन आठवडे हा अमेरिकेसाठी परीक्षेचा काळ असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. टास्क फोर्सच्या सदस्या डेबोरा ब्रिक्स यांनी तीस एप्रिलपर्यंत सामाजिक अंतर राखूनही अमेरिकेतील मृतांची संख्या एक ते दोन लाखांच्या आसपास असेल, असे भाकीत केल्यानंतर ट्रम्प यांनी विधान केले आहे. ट्रम्प म्हणाले, की तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कोठे ना कोठे आशेचा किरण दिसेलच, परंतु तोपर्यंत पुढचे दोन आठवडे खूपच कष्टप्रद असतील.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: more than four thousand death in america by Coronavirus