Coronavirus : या देशाची वाटचाल आता कोरोनामुक्तीकडे; कशी ते वाचा?

पीटीआय
Thursday, 30 April 2020

अर्थव्यवस्था सुरु करतोय, याचा अर्थ असा नाही की सामाजिक जीवनाला परवानगी देत आहोत. सुदैवाने आपल्या देशात कम्युनिटी ट्रान्समिशनचा अधिक प्रसार झालेला नाही. म्हणूनच कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली आहे, असे आपण म्हणू शकतो. 
- जेसिंडा आर्देर्न, पंतप्रधान

गेल्या काही दिवसात बाधित रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. देशातून कोरोना हद्दपार होत असून आपण कोरोनामुक्त न्यूझीलंडचे ध्येय गाठले आहे. अर्थात कोरोनावर नियंत्रण मिळवले, याचा अर्थ असा नाही की नवीन रुग्ण सापडणार नाही. परंतु नवीन रुग्णांचे स्रोत समजत आहेत. 
- ॲश्‍ले ब्लूमफील्ड, महासंचालक, आरोग्य विभाग

ऑकलंड - अमेरिका आणि युरोपीय देशांत कोरोना संसर्गाने धुमाकूळ घातलेला असताना सर्वापासून दूर असलेला न्यूझीलंड देश आता कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत आहे. ३९ वर्षाच्या पंतप्रधान जेसिंडा आर्देर्न यांनी ‘गो हार्ड, गो अर्ली’ हे ब्रीदवाक्य समोर ठेऊन कोरोनाच्या फैलावाला वेळीच पायबंद घातला.

न्यूझीलंडमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण २७ फेब्रुवारीला सापडला. त्यानंतर दोन महिन्याच्या काळात न्यूझीलंड प्रशासनाने नागरिकांच्या सहकार्यने कोरोनावर चांगले नियंत्रण प्रस्थापित केले आहे. सुमारे ५० लाख लोकसंख्येच्या न्यूझीलंडमध्ये आजतागायत १४७२ जण बाधित असून १९ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन दिवसात न्यूझीलंडमध्ये बोटावर मोजण्याइतपत रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. पंतप्रधान जेसिंडा आर्देर्न यांनी कोरोनाविरुद्धची लढाई जिंकल्याचे म्हटले आहे. पण आणखी काही काळ सोशल डिस्टिन्सिंग पाळावे लागणार असल्याचे म्हटले आहे. या निकषाच्या आधारावर येत्या काही दिवसांत व्यापाराला परवानगी दिली जाणार आहे.

जमेची बाजू
    न्यूझीलंडचे भौगोलिक स्थान
    योग्यवेळी अचूक निर्णय
    पंतप्रधान जेसिंडा आर्देर्न यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि दमदार नेतृत्व
    आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांचे कमी प्रमाण

न्यूझीलंडचे कोरोना अपडेट
    २८ फेब्रु.ला पहिला रुग्ण 
    १४ मार्च रोजी सहा रुग्ण. दोन आठवडे क्वारंटाइनची सक्ती
    १९ मार्च रोजी परदेशी प्रवाशांना देशात बंदी, २५ रुग्ण सापडले
    २३ मार्च रोजी देशात लॉकडाउनची घोषणा

असा केला सामना
    सीमा सील केल्या
    परदेशातून आलेले दोन आठवडे क्वारंटाइन
    न्यूझीलंडच्या नागरिकांनाच परत येण्यास मुभा
    परदेशी नागरिकांना २० मार्चपासूनच बंदी घातली
    सोशल डिस्टिन्सिंगचे काटेकारपणे पालन
    नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात चाचण्या

आर्थिक आघाडीवर
    पंतप्रधान जेसिंडा आर्देर्न यांच्याकडून मंत्र्यांच्या वेतनात २० टक्के कपात. ही कपात सहा महिने राहणार
    दहा लाख कामगारांच्या वेतन सुरक्षिततेसाठी २.८ अब्ज डॉलरची तरतूद
    कोरोनाचा सामना करण्यासाठी दहा अब्ज डॉलरची तरतूद
    व्यवसाय कररचनेत बदल. रोकड उपलब्धता, गुंतवणुकीला चालना मिळावी, वर्क फ्रॉम होमला पाठिंबा राहवा यासाठी आरखडा.
    देशात नव्या उपक्रमासाठी ५० दशलक्ष डॉलरची तरतूद

न्यूझीलंडची उल्लेखनीय कामगिरी
    न्यूझीलंडने चाचण्यांचे प्रमाण वाढवले. ५० हजाराहून अधिक चाचण्या. न्यूझीलंडपेक्षा तेरापट अधिक लोकसंख्येच्या इंग्लंडमध्ये २ लाख चाचण्या. 
    २८ फेब्रुवारीला न्यूझीलंडमध्ये पहिला रुग्ण सापडला तर महिनाभरानंतर अमेरिकेत पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला. परंतु न्यूझीलंडचा मृत्यूदर नियंत्रणात राहिला आणि अमेरिकेचा कित्येक पटींने वाढत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New Zealand country is now on its way to coronafree