पाकिस्तानातून अफगाणमध्ये लाखो लोकांचे स्थलांतर

टीम ई-सकाळ
Saturday, 11 April 2020

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पाकिस्तानी नागरिकांनी आणि तेथील स्थानिक सरकारने याचा चांगलाच धसका घेतला असून, जगभरात लॉकडाऊन असताना व सर्वच नागरिक सोशल डिस्टंसिंग पाळत असताना पाकिस्तानात याचा फज्जा उडाला.

नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पाकिस्तानी नागरिकांनी आणि तेथील स्थानिक सरकारने याचा चांगलाच धसका घेतला असून, जगभरात लॉकडाऊन असताना व सर्वच नागरिक सोशल डिस्टंसिंग पाळत असताना पाकिस्तानात याचा फज्जा उडाला असून, लाखो लोकांनी अफगाणिस्तानमध्ये स्थलांतरास सुरवात केली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पाकिस्तानने त्यांच्या शेजारील राष्ट्र अफगाणिस्तानची तोरखंब आणि चमन सीमा(बॉर्डर) सर्वांसाठी उघडली आहे. यामुळेच पाकिस्तानातून लाखो लोकांनी अफगाणिस्तानमध्ये स्थलांतर करण्यास सुरवात केली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जगभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असला तरी पाकिस्तानने याउलट पाऊल उचलेले आहे. या स्थलांतरामुळे कोरोनाचा संसर्ग अजून वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. 

या स्थलांतरित पाकिस्तानी नागरिकांची कोणतीही चाचणी करण्यात आली नसून त्यांना अफगाणिस्तानमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. संपूर्ण जग आधीच कोरोनाच्या संसर्गाने प्रभावित असताना या स्थलांतरामुळे लाखो लोकांना कोरोनाची लागण होऊ शकते.

तबलिगी कनेक्शन?

भारत आणि पाकिस्तान मध्ये तबलिगी जमाती कडून घेण्यात आलेल्या मरकजमधील कार्यक्रमामुळे कोरोना संसर्गाची अनेक प्रकरणे बाहेर आली होती. भारतासारखेच पाकिस्तानात सुद्धा कोरोनाने आता थैमान घालण्यास सुरवात केली आहे. तबलिगी जमातीच्या कार्यक्रमामुळे पाकिस्तानात सुद्धा कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याचे आता समोर आले आहे. आणि अशातच लाखो लोकांचे अफगाणमध्ये होणाऱ्या स्थलांतरात कोणाचीही चाचणी न करता त्यांना प्रवेश दिला जात असल्याने यात सुद्धा कोणी या मरकज प्रकरणातील आहे का हा संशय टाळता येऊ शकत नाही. त्यामुळे या स्थलांतराचा मोठा फटका या दोन्ही देशांना बसू शकतो.

काय म्हणाले इम्रान खान?

या सर्व प्रकरणावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आता स्पष्टीकरण दिले असून अफगाणिस्तानने केलेल्या विशेष विनंतीवरून या देशाच्या सीमा नागरिकांसाठी उघडण्यात आल्याचे त्यांनी म्हंटले आहे. या प्रकरणावर अफगाणिस्तानमधून अजून कोणतेही उत्तर आले नसले तरी त्यांच्यासाठी या प्रकरणाचा गंभीर परिणाम होऊ शकतो.

दोन्ही देशांत काय आहे कोरोनाची स्थिती?

जगभरात आता कोरोनाचा हाहाकार झाला असून आता कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांचा आकडा १७ लाखांवर पोहचला आहे तर यामध्ये एक लाखापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झालेला आहे. पाकिस्तानमध्ये सुद्धा आता हा आकडा वाढत चालला असून जवळपास ४७०० लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यातील ६६ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. अफगाणिस्तान मध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा ५२१ वर पोहचला असून यातील १५ लोकांचा मृत्यू झालेला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Peoples Migrated from Pakistan to Afghan