Coronavirus : अमेरिकेत संभाव्य लसीची उंदरावर चाचणी

पीटीआय
Saturday, 4 April 2020

लस देण्याची नवी पद्धत
ही नवी लस देण्यासाठी संशोधकांनी एका नव्या पद्धतीचा अवलंब केला आहे. ही लस म्हणजे बोटाच्या टोकाइतक्या आकारातील पट्टी असून त्यावर चारशे अत्यंत सूक्ष्म सुया असतात. या सुयांच्या माध्यमातून प्रथिने शरीरात सोडली जातात. जखम झाल्यावर बँड-एड जसे लावतात, त्याचप्रमाणे ही लस दिली जाते. लस म्हणून वापरल्या जाणाऱ्या सूक्ष्म सुया या साखर आणि प्रथिनांपासूनच बनलेल्या असल्याने त्या त्वचेच्या आवरणात विरघळून जातात. हा अनुभव वेल्क्रो पट्टीसारखाच असेल आणि यामुळे रुग्णांना अजिबात दुखणार नाही, असा संशोधकांचा दावा आहे.

वॉशिंग्टन - अमेरिकेतील संशोधकांनी कोरोनाचा प्रभाव नष्ट करु शकणाऱ्या संभाव्य लसीचा शोध लावला असून या लसीची उंदरावर घेतलेली चाचणी यशस्वी ठरली आहे. ‘पीटकोव्हॅक’ (पीट्‌सबर्ग कोरोनाव्हायरस व्हॅक्सिन) असे या लसीचे नाव असून याद्वारे शरीरात कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या प्रतिजैविकांची निर्मिती करता येते. ही प्रतिजैविके विषाणूचा प्रभाव नष्ट करण्यास पुरेशी आहेत, असा संशोधकांचा दावा आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अमेरिकेतील पीट्‌सबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी याबाबत अभ्यास केला असून त्यांचे हे संशोधन ‘ईबायोमेडिसीन’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. या संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार, ‘पीटकोव्हॅक’ दिल्यानंतर दोन आठवड्यांमध्ये शरीरात प्रतिजैविकांची निर्मिती होते. ‘कोरोनाच्या वेगळ्या प्रकारच्या विषाणूंवर २००३ आणि २०१४ अभ्यास करण्यात आला होता. हे दोन्ही प्रकार सध्याच्या विषाणूशी जवळून संबंधित आहेत. 

या विषाणूंविरोधात प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी एका विशिष्ट प्रथिनाचा महत्त्वाचा वाटा असतो, हे आधीच्या अभ्यासावरून दिसून आले आहे. त्यामुळे या नव्या विषाणूशीही आपल्याला लढता येईल,’ असा विश्‍वास संशोधक अँड्रिया गॉम्बोटो यांनी व्यक्त केला आहे. या लसीचा परिणाम किती काळ राहील, याबाबत अद्याप अभ्यास सुरु आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Potential vaccine test on rat in america