‘पुलित्झर पुरस्कार’ पुढे ढकलला

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 एप्रिल 2020

कोरोनाच्या जागतिक साथीच्या या काळात लोकांची सेवा करणे हेच सध्या पत्रकारितेपुढील उद्दिष्ट आहे. अशा कठीण काळात साहित्य आणि कलेतून मानवाचे मनोबल उंचावण्याची हीच वेळ आहे.
- डॅना केनेडी, प्रशासक, पुलित्झर पुरस्कार

न्यूयॉर्क - उत्कृष्ट पत्रकारिता आणि साहित्यकृतीसाठी दिल्या जाणाऱ्या पुलित्झर पुरस्कार यंदा पुढे ढकलला आहे. पुलित्झर पुरस्कार मंडळाचे काही सदस्य कोरोनाव्हायरसच्या साथीचे वार्तांकन करण्यात व्यग्र असल्याने विजेत्यांची नावे नंतर जाहीर करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पत्रकारिता आणि साहित्यक्षेत्रातील पुरस्कारविजेत्यांची नावे २० एप्रिल रोजी जाहीर होतात. मात्र आता ४ मे पर्यंत घोषणा होणार नाही, असे मंडळाने मंगळवारी स्पष्ट केले. या मंडळाच्या सभासदांमध्ये अनेक पत्रकारांचा समावेश आहे, जे सध्या जगभरातील कोरोनाच्या वार्तांकनात गुंतलेले आहेत, असे पुलित्झर पुरस्काराच्या प्रशासक डॅना केनेडी यांनी सांगितले. २०२०ची नावे जाहीर करण्यासाठी वेळ मिळाल्याने अंतिम टप्प्यातील स्पर्धकांचे बारकाईने मूल्यांकन करणे शक्य होईल, असे त्या म्हणाल्या. पत्रकारितेसाठी पुलित्झर पुरस्कार प्रथम १९१७ मध्ये देण्यात आला. अमेरिकेत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार समजला जातो.

तारीख नंतर जाहीर होणार
पुलित्झर पुरस्कार वितरण सोहळा दरवर्षी मे महिन्यात कोलंबो विद्यापीठात पारंपरिक पद्धतीने साजरा होत असतो. पण यंदा नाव जाहीर करण्याची मुदत ४ मे पर्यंत पुढे ढकलल्याने हा सोहळाही नियोजित वेळेत होणार नाही. पुरस्कार वितरणाची तारीख नंतर जाहीर केली जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pulitzer Prize was postponed