वर्क फ्रॉम होमचा मंत्र ठरतोय सक्सेसफुल! ७४ टक्के सीएफओंचे मत

वृत्तसंस्था
Thursday, 9 April 2020

कंपन्यांचे म्हणणे

  • घरातून काम केल्याने कंपनींच्या खर्चात होते मोठी बचत
  • कार्यालये आणि वाहतुकीच्या खर्चात होते घट
  • लॉकडाउननंतरही हेच धोरण कायम ठेवण्याचा विचार
  • ट्विटर, गुगलमध्ये सध्या फक्त वर्क फ्रॉम होम
  • मायक्रोसॉफ्ट कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करण्याच्या सूचना
  • भविष्यातील नियुक्त्यांवेळी ठरणार कळीचा मुद्दा
  • नव्या कार्यसंस्कृतीनुसार धोरणेही बदलण्याची शक्य

न्यूयॉर्क - कोरोनाच्या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी जगभरात पावले उचलण्यात येत असून, त्याचा परिणाम कंपन्यांच्या कार्यशैलीवर अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात झालेला दिसतो आहे. ऑफिसात न येता घरातूनच काम करण्याची योजना अपेक्षेहून अधिक परिणामकारक ठरल्याचे ७४ टक्के मुख्य वित्तीय अधिकाऱ्यांचे (सीएफओ) मत आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

मायक्रोसॉफ्ट, गुगल, अॅमेझॉन सारख्या कंपन्याही वर्क फ्रॉम होमवर भर देताना दिसताहेत. ऑफिससाठीच्या खर्चात कपात करण्यासाठी वर्क फ्रॉम होमची संकल्पना कायमस्वरूपी लागू करण्याचाही त्यांचा विचार आहे. गार्टनरने केलेल्या ताज्या सर्वेक्षणातून ही माहिती पुढे आली आहे.

वर्क फ्रॉम होमलाच प्राधान्य देणार!
भविष्यात फक्त वर्क फ्रॉम होमसाठीच कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल, असे ८१ टक्के सीएफओंनी म्हटले आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांची निवड करतानाच लवचीक धोरणाचा अवलंब करण्यास आम्ही प्राधान्य देऊ असा दावाही या सीएफओंनी केला आहे. घरातून काम करण्याच्या पद्धतीमुळे कार्यालयीन इमारत आणि प्रवासावर होणाऱ्या खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते असे २० टक्के सीएफओंचे मत आहे. मात्र, वर्क फ्रॉम होमच्या धोरणाचा परिणाम कंपनीचे सातत्य आणि उत्पादन अशा दोन्ही महत्त्वाच्या बाबींवर होऊ शकते, असे ७१ टक्के सीएफओंना वाटते आहे. 

नव्या कार्यसंस्कृती
लॉकडाउनच्या काळातील वर्क फ्रॉम होमचा बदल फायदेशीर ठरला असल्याचे टेक्सास विद्यापीठातील संशोधकांनी म्हटले आहे. त्यांनी नमूद केले आहे की, २०१८मध्ये अशाच प्रकारे वर्क फ्रॉम होम पद्धतीचा अवलंब करण्यात आल्याने वीजेची बचत झाली होती, तसेच इंधनाच्या वापरातही घट झाली होती. त्याचे पर्यावरणावर सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून आले होते, असे त्या वेळी करण्यात आलेल्या संशोधनातून समोर आले होते. त्यामुळे वर्क फ्रॉम होमच्या संस्कृतीपासून धडा घेऊन नवी धोरणे तयार करण्याची आवश्यकता असल्याचे मत संशोधकांनी मांडले होते.

व्हर्च्युअल ऑफिसच्या दिशेने
व्हर्च्युअल ऑफिसच्या दिशेने जाण्यासाठी कोरोनाच्या संक्रमणाचा काळ मैलाचा दगड ठरू शकतो, असे सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ३१७ सीएफओंपैकी बहुतांश जणांचे मत आहे. सध्याचा लॉकडाउनचा कालावधी संपल्यानंतरही वर्क फ्रॉम होमचा पर्याय उपलब्ध करून देण्यावर काही कंपन्या विचार करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Successful becoming the plan of work from home 74 percent CFOs talking