Coronavirus : कोरोनाचा फैलाव रोखण्यात तैवानचा आदर्श

पीटीआय
Wednesday, 8 April 2020

तैवानची तयारी

  • जनआरोग्याच्या संरक्षणार्थ साहित्यांची यादी व १२४ वस्तूंची निर्मिती 
  • अन्य देशांमध्ये उपायांची केवळ चर्चा असतानाच योजना व कृती कार्यक्रमांची अंमलबजावणी
  • चीनमधून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध
  • देशातील सागरी तळांवर नौका नांगरण्यास बंदी
  • घरात एकांतवासात राहण्याचा आदेश मोडल्यास कठोर शिक्षा
  • देशात मास्कचा पुरेसा साठा ठेवण्यासाठी निर्मिती वेगात
  • कोरोनाची चाचणी घरोघरी सुरु
  • विषाणूंबाबत खोटी माहिती पसरविण्यास शिक्षेची तरतूद
  • वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आजाराविषयी पारदर्शी व तत्काळ माहितीचे प्रसारण

हाँगकाँग - मध्य चीनमध्ये कोरोनाचा प्रसार वेगाने होऊ लागला तरी संपूर्ण जग आपल्याला धोका नाही, अशाच आविर्भावात होते. २५ जानेवारीला तैवानमध्ये कोरोनाचे चार रुग्ण आढळले अन या देशाने तातडीने पावले उचलत प्रतिबंधात्मक उपाय केल्याने आज तेथे कोरोनाला अटकाव करणे शक्य झाले आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तैवानप्रमाणेच ऑस्ट्रेलियातही चार रुग्ण आढळून आले होते. या दोन्ही देशांची लोकसंख्या सारखीच म्हणजे साधारण २ कोटी ४० लाख आहे. हे दोन्ही देश म्हजचे बेट आहेत.चीनशी  त्यांचे व्यापारी व वाहतूक संबंधही बळकट आहेत. पण २५ जानेवारीनंतर तैवानने कडक निर्बंध लागू केल्याने दहा दिवसांनंतर तेथील कोरोना बाधितांची संख्या ४०० पर्यंत मर्यादित राहिली तर ऑस्ट्रेलियात ती पाच हजारांवर पोचली.

‘सार्स’चा अनुभव 
‘सिव्हर ॲक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम’ (एसएआरएस- सार्स) या आजाराच्या साथीने २००३ मध्ये काही देशांना ग्रासले होते. हाँगकाँग, दक्षिण चीनप्रमाणे तैवानलाही याचा फटका बसला होता. त्या वेळी तैवानने दीड लाख नागरिकांचे विलगीकरण केले होते. तेथील मृतांची संख्या १८१ होती.  ‘सार्स’च्या अनुभवावरून तैवानने कोरोनाची लक्षणे दिसताच त्याकडे अन्य देशांपेक्षा गांभीर्याने लक्ष देत तातडीने उपाययोजना केल्या.

तैवानची आरोग्यसेवा जागतिक दर्जाची आहे. चीनमधील वुहानमध्ये कोरोनाचा प्रसार झाल्याचे वृत्त आल्यानंतर तैवानमधील ‘नॅशनल हेल्थ कमांड सेंटर’ (एनएचसीसी) जे ‘सार्स’च्या काळात उभे केले होते, त्या संस्थेच्या अधिकाऱ्यांनी याचा धोका ओळखून खबरदारी घेण्यास सुरवात केली, अशी माहिती ‘जनरल ऑफ द अमेरिकन मेडिकल असोसिएशन’ (जेएएमए) ने दिली आहे.

एक कोटी मास्कची निर्यात शक्य
कोरोनाचा फैलाव लक्षात घेता तैवानने देशात पुरेसे मास्क उपलब्ध व्हावेत म्हणून त्याच्या निर्यातीस बंदी घातली होती. मात्र आता अमेरिका, इटली, स्पेन आणि अन्य युरोपिय देश व ज्यांचे तैवानशी राजनैतिक संबंध आहेत, अशा छोट्या देशांना एक कोटी मास्कचा पुरवठा करण्याच्या स्थितीत तैवान आहे, असे सरकारने नुकतेच सांगितले आहे.

कोरोनाचा प्रसार जगभरात वेगाने होत असताना तो रोखण्यासाठी तैवानने उचलली पावले, त्यांच्या प्रभावी  उपाययोजना या अन्य देशांसाठी मार्गदर्शक आहेत.
- जेसन वँग, ‘जेएएमए’च्या अहवालाचे सहलेखक व तैवानचे डॉक्टर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Taiwans ideal in preventing Corona spread