esakal | कोरोनाने बदलले शिष्टाचार
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-Effect

कोरोनाच्या विषाणूने जगातील अभिवादन व शिष्टचाराचं स्वरूप एकाएकी बदलून टाकलय. सोशल डिस्टंसिंग (सामाजिक अंतर) म्हणजे चेहऱ्यावर मास्क लावून एकमेकापासून किमान तीन ते सहा फूट अंतरावरून नमस्कार, चमत्कार करणे. कोरोनाच्या दिवसात भेट अतिशय सुरक्षित ठरू शकते ती भारतीय परंपरेने हात जोडून केलेल्या नमस्काराने. त्यातून सभ्यताही प्रतीत होते. ग्रामीण भागात राम,राम पाव्हणं, जय श्रीराम असेही म्हणण्याची प्रथा आहे.

कोरोनाने बदलले शिष्टाचार

sakal_logo
By
विजय नाईक

कोरोनाच्या विषाणूने जगातील अभिवादन व शिष्टचाराचं स्वरूप एकाएकी बदलून टाकलय. सोशल डिस्टंसिंग (सामाजिक अंतर) म्हणजे चेहऱ्यावर मास्क लावून एकमेकापासून किमान तीन ते सहा फूट अंतरावरून नमस्कार, चमत्कार करणे. कोरोनाच्या दिवसात भेट अतिशय सुरक्षित ठरू शकते ती भारतीय परंपरेने हात जोडून केलेल्या नमस्काराने. त्यातून सभ्यताही प्रतीत होते. ग्रामीण भागात राम,राम पाव्हणं, जय श्रीराम असेही म्हणण्याची प्रथा आहे. परंतु. भारतीय नमस्काराचे अनुसरण आता जग करताना दिसत आहे. हस्तांदोलन करताना दोन व्यक्तींच्या चेहऱ्यांचे अंतर एक ते दीड फूट असू शकते. परंतु,कोरोनाला ते मान्य नाही. कारण, एवढ्या अंतरावर कोरोनाचा विषाणू चटकन प्रवास करून दुसऱ्या व्यक्तीच्या शरिरात प्रवेश करू शकतो.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पाश्‍चात्य देशात हस्तांदोलनाशिवाय एकमेकाला अलिंगन देऊन, अथवा गालाला गाल लावून, घासून अथवा गालाचे चुंबन घेऊन एकनमेकांशी जवळीक दाखविण्याचा प्रयत्न असतो. अलिंगन दिल्यास त्यातून प्रेम प्रतीत होते. नेत्यांनी अलिंगन दिल्यास त्यांची चांगली दोस्ती आहे, असा अर्थ लावला जातो. किमान पाहणाऱ्याला तरी तसे वाटते. परदेश दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी दिलेल्या अनेक अलिंगनांवर बीबीसी ने फोटो फीचर केले होते. अलिंगन अथवा हस्तांदोलन करताना एकमेकाचे हात बराच वेळ हलवित राहाणे, या बॉडी लॅंग्वेजकडे पत्रकारांचे बारकाईने लक्ष असायचे. आता अलिंगन, हस्तांदोलन (शेकहॅंड) कोरोनाने इतिहासजमा केलेत. अभिवादनाच्या या प्रथांद्वारे नेते अथवा देश किती जवळ येणार, याचा अंदाज बांधला जात असे. आता ते ही संकेत मिळेनासे होणार. तथापि, छत्रपती शिवाजी महाराज व अफझलखान यांच्या काळात अलिंगनाला वेगळे ऐतिहासिक महत्व आले होते.

गुगलवर जाऊन अधिक माहिती घेतल्यास असे दिसते, की तिबेटमध्ये एकमेकाला जीभ दाखवून ओळख दाखविण्याची वा अभिवादन करण्याची प्रथा आहे. ती नवव्या शतकातील लांग दर्मा या क्रूर राज्याच्या जमान्यापासून पडली. त्याची जीभ काळी होती, अशी वदंता आहे. पण, आजही तिबेटीींक (साधू) अथवा सामान्य माणूस भेटताच जीभ दाखवितात. कुणी जीभ काढून पाहिल्यास तो वाकुल्या दाखवितोय. अथवा खिजवतोय, असा अर्थ लावला जातो. अपमान होण्याची शक्‍यता अधिक. तिबेटमध्ये तो सामान्य शिष्टाचार आहे. परंतु, या दिवसात मास्क तोंडावर असल्यास एकमेकांची जीभ दिसणार कशी? तेव्हा तिबेटी लोकांनाही पर्याय शोधावा लागेल.

कतार, येमेन, ओमान, संयुक्त अरब अमिरातेत एकेमेकांच्या नाकावर नाक घासून अरबी हॅलो करण्याची परंपरा आहे. एकमेकांच्या खांद्यांवर खांदे घासूनही अभिवादन करता येते. दोन्ही गोष्टी कोरोनाच्या काळात शक्‍य नाही. कारण, नाकांचा संबंध श्‍वासाशी असल्यामुळे कोरोनाच्या विषाणूला आयतेच दार उपलब्ध व्हायचे.

अर्जेंटिना चिली, पेरू, मेक्‍सिको, साव पावलो, व कोलंबियात फ्लाईंग किस म्हणजे, बोटांनी स्वतःच्या ओठांना स्पर्ष करून एकदा दुसऱ्याकडे पाहाणे व त्याने तसाच प्रतिसाद देणे होय. स्पेन, पोर्तुगाल, पॅरॅग्वे, इटली, फ्रान्स व क्वेबेक मध्ये दोन वेळा फ्लाईंग किस, तर रशिया व युक्रेनमध्ये तीन वेळा फ्लाईंग किस देतात. न्यूझिलॅंडमधील मूळचे माओरी लोक देशात डोक्‍यावर डोके व नाकं घासून (होंगी) अभिवादन करतात. तर काही देशात झिंबाबवे व मोझांबिक मध्ये एकमेकाकडे पाहून टाळ्या वाजवितात. मलेशियात छातीवर म्हणजे हृदयावर हात ठेवून अभिवादन केले जाते. जपान, कंबोडिया, लाओस, थायलॅंडमध्ये एकमेकांना दिसताच वाकून डोके नमवून ओळख दाखवितात. कसे करतात ते तेच जाणो. अन्य कुणी प्रयत्न केल्यास डोके एकमेकावर आपटण्याची शक्‍यता अधिक. या लोकांना आता किमान तीन ते चार फूट दूर राहून तसे अभिवादन करावे लागणार आहे.

कोणतेही अभिवादन असो, तोंडावर मास्क (टोपी अथवा आवरण) असल्याने चेहऱ्यावरचे भाव दिसणार, तेही अर्धवट. आधी मास्क याचा संबंध डॉक्‍टर्स, नर्सेस या समाजोपयोगी व दहशतवादी, चोर आदी समाजकंटकांशी लावला जात असे. मास्क म्हटला,की हॉलिवुडमधील प्रसिद्ध अभिनेते अंतोनिओ बांदेरास यांचा स्क ऑफ झोरो हा चित्रपट आठवतो. एरवी मास्क लावून चित्रपटातून लोकप्रिय झाले ते स्पायडरमॅन, बॅटमॅन व अंतरिक्षातून आलेला जेडाय.

इतिहासात राजे रजवाडे यांच्या दरबारात गेल्यास वाकून कुर्निसात करण्याची परंपरा होती. मराठ्यांच्या कारकिर्दीत राजापुढे कुणी आल्यास काही वेळ वाकून आदरपूर्वक हात वरखाली करून अभिवादन करण्याची प्रथा होती. नेपाळचे नरेश माजी बीरेंद्र अथवा त्यानंतर आलेले ग्यानेन्द्र यांना मंत्री त्यांच्या नारायणहाटी राजवाड्यात भेटण्यास जात, तेव्हा त्यांच्या पायाला हात लावून समोर काही पैसे टाकून अभिवादन होत असे. बीरेंद्र व त्यांच्या कुटुंबाला त्यांच्याच चिरंजीवाने गोळ्या घालून ठार केल्यानंतर ग्यानेंद्र यांच्या काळात चालू असलेली प्रथा कायमची मोडीत निघाली. उत्तर प्रदेशात नेत्याला पाय लागू म्हणत आजही अभिवादन केले जाते. अर्थात ही सरंजामी प्रथा झाली. कोरोनाच्या काळात हे सारे निषिद्ध होय.

बदलणाऱ्या शिष्टाचाराची दखल प्रसिद्ध नियतकालिक द इकॉनॉमिस्ट ने ही घेतली आहे. अलीकडे प्रसिद्ध झालेल्या एका लेखात म्हटले आहे, की काळ्या प्लेगची लागण रोखण्यासाठी 1439 मध्ये इंग्लंडचे पाचवे राजे हेन्री यांनी चुंबनावर बंदी घातली होती. चीनमध्ये आता हस्तांदोलनाऐवजी गॉंग शोऊ अभिनय करतात. याचा अर्थ एका हाताची मूठ खुल्या तळहातावर मारायची. आखाती देशात परंपरेप्रमाणे नाकावर नाक घासण्याऐवजी केवळ हात हलवून अभिवादन केले जात आहे. इटली व मध्ये गालांचे चुंबन घेण्याचे थांबले आहे.

2014 मध्ये वेल्समधील ऍबरिस्‌ट्‌विथ विद्यापिठातील डेव्हिड व्हिटवर्थ व सारा मेला या दोन जैवशास्त्र तज्ञांनी प्रसिद्ध केलेल्या शोधनिबंधामध्ये अभिवादनाच्या वेगवेगळ्या प्रकारातून साथीचे रोग कसे पसरतात, याचे तपशीलवार विश्‍लेषण केले होते. त्यांनी बॅक्‍टेरिया (कृमी) असलेला हॅंडग्लोवने प्लास्टिकचा हातमोजा) बॅक्‍टेरियारहित ग्लोवबरोबर हस्तांदोलन केले. त्यातून बॅक्‍टेरिया पसरला. त्याचप्रमाणे कोरोनाही पसरला. हाय फाय (हात उंचावून दुसऱ्याच्या हातावर टाळी वाजविण्यासारखे करणे, या कृतीपेक्षा हस्तांदोलनाने दुप्पट बॅक्‍टेरिया एकमेकाकडे जाऊ शकतो. शिवाय हस्तांदोलन किती वेळ, कसे करतो यावरही विषाणूच्या प्रसणाचा वेग अवलंबून असतो. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स भेटताना आता एल्बो बंम्प ( हाताच्या कोपरा दुसऱ्या तळहातावर मारायचा) करतात. एव्हिएन फ्लू व इबोला साथींच्या काळात असंख्य लोक असेच अभिवादन करायचे. चीनमध्ये आता वूहान शफल (हातांऐवजी दोन्ही पायांनी दुसऱ्याच्या पायांना स्पर्श करायचा) लोकप्रिय होत आहे. तर, इराणमध्ये पार्श्‍वभाग हलवून अभिवादन केले जात आहे.

हे सारे काही बदल होत असले, तरी साथींचे रोगतज्ञ एकाच गोष्टींवर वारंवार भर देत आहेत, ती म्हणजे, जागतिक आरोग्य संघटनेने सुचविल्याप्रमाणे दिवसातून किमान पाच वेळा (प्रत्येक वेळी किमान 20 सेकंद) साबणाने हात धुणे, हा उपाय उत्तम होय. कारण, 6 मार्चपर्यंत कोरोनाची लागण तब्बल 1 लाख लोकांना झाली होती व 3,400 लोक मरण पावले होते. संसर्ग झालेल्या वस्तूला हात लागला असेल, तर तो व्यवस्थित धुतल्याशिवाय चेहरा, डोळे, नाक यांना न लावणे, हा नियम पाळणे आवश्‍यक झाले आहे.

पण, हात धुण्यासाठी जगात सर्वत्र पाणी उपलब्ध नाही, असे जागतिक बॅंकेच्या पाहाणीवरून दिसून येते. सब-सहारन आफ्रिकेत (राष्ट्रसंघाच्या व्याख्येप्रमाणे आफ्रिकेतील एकूण 54 देशांपैकी अल्जेरिया, जिबुती, इजिप्त, लीबिया, मोरक्को,सोमालिया, सुदान व ट्युनिशिया वगळता 46 देश त्यात मोडतात) केवळ एक तृतीअंश लोकांना पाणी व साबण उपलब्ध आहे.

इथिओपियामध्ये 8 टक्के व रिपब्लिक ऑफ कॉंगोमध्ये केवळ 4 टक्के लोकांना ते उपलब्ध आहे. डेमॉक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो ( राजधानी किन्शासा) व रिपब्लिक ऑफ कॉंगो (राजधानी ब्राझिव्हिले) यांच्या मधोमध आफ्रिकेतील महाकाय कॉंगो नदी वाहाते. तरी पिण्याच्या पाण्याची वानवा आहे. कोरोना आफ्रिकेत पोहोचला आहे. त्यामुळे त्यातील देशांना विशेष खबरदारी घ्यावी लागेल. या खंडाची लोकसंख्या 1 अब्जापेक्षा अधिक आहे.

दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामफोसा यांनी याबाबत नुकताच गंभीर इशारा दिल्याचे लेखात म्हटले आहे. 19 एप्रिल रोजी आलेल्या वृत्तानुसार, आफ्रिकेतील 41 देशात केवळ 2000 व्हेंटिलेटर्स असून 10 देशात ते उपलब्ध नाहीत. राष्टसंघानुसार, 2017 मध्ये लायबेरियात 97 टक्के घरात शुद्ध पाणी व साबण उपलब्ध नाही. यावरून कोरोनाच्या दिवसात आफ्रिकेतील समस्या किती गंभीर स्वरूप धारण करू शकते, याची कल्पना यावी.