कोरोना आणि विकिपिडियाचा साह्यक 'स्वास्थ्य' गट

विजय नाईक
Tuesday, 14 April 2020

प्रसिद्ध माहितीस्रोत "विकिपिडिया"ने प्रत्येक भाषेतून चुकीच्या माहितीबाबत लोकांना सावध करण्याचे ठरविले आहे.

Coronavirus करोना विषाणूची लागण झाल्यावर काय होते, ती जगभर कोणकोणत्या देशात झाली आहे, रोज काय परिस्थिती आहे, किती लोकांना क्वारन्टाईन केले, किती मृत्यू, किती अत्यवस्थ, किती व कसे वाचले, याचे वर्णन मनाला अस्वस्थ करणारे असून, या अंधःकारातून माणसाची केव्हा सुटका होणार, याबाबत वेगवेगळे अंदाज वर्तविले जात असले, तरी त्यातून सध्या तरी सुटका नाही, असे दिसते. टीव्ही असो, अन्य प्रसारमाध्यमे असो, पोर्टस्ल असो, व्हॉट्‌सअप वा वृत्तपत्रे, त्यातून याविषयी माहितीचा अक्षरशः महापूर आला आहे. खरी, खोटी वा अतिशयोक्त माहिती कोणती, हे बऱ्याचदा शोधणे कठीण होते. प्रसिद्ध माहितीस्रोत "विकिपिडिया"ने प्रत्येक भाषेतून चुकीच्या माहितीबाबत लोकांना सावध करण्याचे ठरविले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जागतिक आरोग्य संघटनेने चुकीच्या माहितीबाबत " इन्फोडेमिक" (माहितीचा पूर) बाबत लोकांना वेळीच सावध केले आहे. ""आपल्याकडे येणारी माहिती पडताळून पाहाण्याची गरज आहे,"" असे संघटनेने म्हटले आहे. विकिपिडियाच्या संपादकांपुढे त्याचे मोठे आव्हान उभे आहे. कारण हे संपादक कोविद-19 बाबत क्षणाक्षणाला येणाऱ्या माहितीचे संकलन, छाननी, करण्याचे काम सतत करीत असतात. ती माहिती इंग्रजी व्यतिरिक्त दहा भारतीय भाषातून लोकांपुढे पाठविली जाते. माहितीमध्ये पूर्वग्रह नसावा, म्हणूनही विकिपिडिया काळजी घेत असून, जनतेपर्यंत केवळ विश्‍वासार्ह व अगदी ताजी माहिती मिळावी, यासाठी प्रयत्नशील आहे.

आणखी वाचा - युरोपचं काय चुकतंय?

विकिपिडियाचे व्हॉलेंटियर संपादक अभिषेक सूर्यवंशी म्हणतात,की करोनाच्या विषाणू व रोगाबाबत माहितीची छाननी करणे, हे मोठे काम असून ती अधिकाधिक भारतीय भाषातून मिळावी, यासाठी निरनिराळ्या विद्यापिठांतील भाषातज्ञ व विभागांची मदत घेतली जात आहे. विकिपिडियाने अलीकडे "स्वास्थ्य " हा गट स्थापन केला आहे. स्वास्थ्य हा शब्द सर्वसाधारणतः आरोग्याबाबत वापरला जातो. इंटरनेटवरील माहिती सर्वसाधारणतः इंग्रजीमध्ये असते. परंतु, या भयंकर रोगाबाबत लोकांना मातृभाषेतून मिळालेली माहिती अधिक उपयुक्त ठरू शकते.

"स्वास्थ्य" गटाला राष्ट्रीय आरोग्य विभाग व आरोग्य मंत्रालय, त्याचप्रमाणे अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी तसेच, स्वित्झरलॅंडस्थित जागतिक आरोग्य संघटनेचे साह्य मिळत आहे. तथापि, सूर्यवंशी यांना भारतातील निरनिराळी राज्ये व शहरातील स्थानीय संस्थांची भागीदारी हवी आहे, ज्याद्वारे माहिती थेट तळागाळापर्यत पोहोचविता येईल. या संस्थांच्या माहितीसाठी "स्वास्थ्य" गट विकिपिडियाच्या "विकी प्रॉजेक्‍ट मेडिसीन" शी संलग्न असून, या प्रकल्पात जगातील अनेक तज्ञ व डॉक्‍टर्स काम करीत आहेत. "विकि प्रॉजेक्‍ट मेडिसीन" या संकेत स्थळाने आजवर जगातील निरनिराळया भाषातून तब्बल 35 हजार लेख प्रसिद्ध केले असून, त्याचे काम सुमारे दीडशे तज्ञ पाहात आहेत.

आफ्रिकेत "इबोला" च्या साथीने थैमान घातले होते, तेव्हा "विकी प्रॉजेक्‍ट मेडिसीनने" त्याबाबतचे लेख तब्बल पन्नास भाषेतून वितरीत केले होते. ते करताना, माहितीतील सत्यता, अचुकता, विश्‍वासार्हता आदींना कुठेही धक्का बसणार नाही, याची काळजी घेतली होती. " द न्यू यॉर्क टाइम्स"ने त्यावेळी विकिपिडियाची इबोलाबाबत " विश्‍वसनीय स्त्रोत" म्हणून प्रशंसा केली होती. (विकिपिडिया वॉज क्‍लासिफाईड ऍज वन ऑफ द ट्रस्टेड सोर्ससेस फॉर इन्फर्मेशन अबाउट इबोला) "स्वास्थ्य" गटालाही "विकी प्रॉजेक्‍ट मेडिसीन" या प्रकल्पातील असंख्य तज्ञांचे साह्य उपलब्ध होणार आहे.

आणखी वाचा - शाहरूख खान पुन्हा मदतीला धावून आला!

करोनाबाबत इंग्रजी भाषेत विकीपिडियाने प्रसिद्ध केलेल्या लेखाला जानेवारी 2020 पासून आजवर 20 दशलक्ष "व्यूज" (मते) आले आहेत. "स्वास्थ्य" मधील तज्ञ याबाबतचा "विकिडाटा" अधिक समृद्ध करीत आहेत. इंटरनेट द्वारे ऍमेझॉन अलेक्‍सावरील उपलब्ध असलेल्या माहितीप्रमाणेच अनेक प्रश्‍नांची उत्तरे या माध्यमातून दिली जात आहेत. करोनाविषयी चुकीची माहीती काय आहे, याबाबतच्या लेखाचे भाषांतर अन्य भारतीय भाषातून करण्याचा विकिपिडियाचा इरादा आहे.

विकिमिडिया फौंडेशनचे प्रमुख टोबी नेग्रीन यांनी म्हटले आहे, की विकिपिडियातील करोनाबाबतची माहिती लाखो भारतीयांना त्यांच्या भाषेत मिळावी, म्हणून "स्वास्थ्य" गटाचे साह्य मोलाचे ठरणार आहे. विकिमिडियाच्या लक्ष्यांबाबत बोलताना ते म्हणाले, की 2030 पर्यंत नवी दिल्ली ते बर्लिन ते सॅनफ्रान्सिस्कोपर्यंत आरोग्य विषयक माहितीचा मुक्त संचार व्हावा, यासाठी आम्ही कार्यरत असून "स्वास्थ्य" गटाप्रमाणेच जगातील अन्य स्वयंसेवी संस्थाचे साह्य आम्हाला मिळेल, अशी आशा आहे. ""विकिपिडियाद्वारे स्वयंसेवी संपादकांच्या माध्यमातून जगातील सर्व गोष्टींची माहिती सामान्य माणसापर्यंत पोहोचविणे,"" हेच आमचे उद्दिष्ट होय.

आणखी वाचा - अमेरिका लॉकडाऊन हटवणार?

करोनाची लागण सुरू झाली त्याचवेळी जानेवारी 2020 मध्ये "स्वास्थ्य" गटाची स्थापना झाली. "स्वास्थ्य" याचे इंग्रजीत विस्तारीत नाव आहे, "स्पेशल विकिपिडिया अवेअरनेस स्कीम फॉर द हेल्थकेअर ऍफिलिएटस्‌". सूर्यवंशी म्हणतात, की आम्ही "स्वास्थ्य" गटाची स्थापना केली, त्याचवेळी कोविद-19 जगावर कोसळेल, याची पुसटशी कल्पनाही नव्हती. हा निव्वळ योगायोगच म्हणावा लागेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: veteran journalist vijay naik writes blog coronavirus wikipedia healthcare unit