Coronavirus: गुड न्यूज! विषाणू रोखणारे रसायन सापडले 

वृत्तसंस्था
शनिवार, 21 मार्च 2020

रशियामध्ये प्राण्यांवर प्रयोग सुरू 
रशियामधील काही संशोधकांनी कोरोनाविरोधी लस तयार केली असून, सध्या सायबेरियामधील प्रयोगशाळेमध्ये या लसीची प्राण्यांवर चाचणी घेतली जात आहे, रशियाच्या आरोग्य विभागाकडूनच ही माहिती देण्यात आली. व्हेक्टर स्टेट व्हायरोलॉजी अँड बायोटेक्नोलॉजी सेंटरमधील संशोधकांनी सहा वेगवेगळ्या तांत्रिक मार्गांचा वापर करून चाचण्या घ्यायला सुरुवात केली आहे. 

न्यूयॉर्क : कोरोना विषाणूच्या संसर्गाने जगातील शास्त्रज्ञांसमोर मोठे आव्हान उभे केले असून, या विषाणूच्या प्रसाराच्या वेगाचा अंदाज आघाडीच्या संशोधकांनाही येईनासा झाला आहे. पण येथे महासंगणक अर्थात सुपर कॉम्प्युटर माणसाच्या मदतीला धावून आला आहे. आयबीएम या आघाडीच्या आयटी कंपनीने तयार केलेल्या संगणकाच्या माध्यमातून या विषाणूला रोखण्यासाठी नेमका कोणता रासायनिक घटक उपयोगी ठरू शकतो याचा शोध घेण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. 

पूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून हा महासंगणक विकसित करण्यात आला असून, मुख्य पेशींना होणारा या विषाणूचा संसर्ग शोधून काढण्यात त्याला यश आले आहे. या विषाणूचा सामना करू शकणारे ७७ रासायनिक घटक शोधून काढण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे, यामुळे या विषाणूवरील प्रभावी लस तयार करणे सोपे होणार आहे. 

रशियामध्ये प्राण्यांवर प्रयोग सुरू 
रशियामधील काही संशोधकांनी कोरोनाविरोधी लस तयार केली असून, सध्या सायबेरियामधील प्रयोगशाळेमध्ये या लसीची प्राण्यांवर चाचणी घेतली जात आहे, रशियाच्या आरोग्य विभागाकडूनच ही माहिती देण्यात आली. व्हेक्टर स्टेट व्हायरोलॉजी अँड बायोटेक्नोलॉजी सेंटरमधील संशोधकांनी सहा वेगवेगळ्या तांत्रिक मार्गांचा वापर करून चाचण्या घ्यायला सुरुवात केली आहे. 

संशोधकांनी तयार केले व्हेंटिलेटर 
ब्रिटिश संशोधकांनी या विषाणूच्या संसर्गाचा सामना करण्यासाठी एक वेगळे व्हेंटिलेटर तयार केले असून ते पुढील आठवड्यामध्ये ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या व्हेंटिलेटरच्या आतापर्यंतच्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत, असे आरोग्यमंत्री मॅट्ट हॅनकॉक यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे अमेरिकेनेही कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग दूर करण्यासाठी मलेरियावरील औषधाच्या वापरास मान्यता दिली आहे. हायड्रोक्सीक्लोरोक्विन असे या औषधाचे नावे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी या संदर्भातील घोषणा केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: worlds fastest supercomputer identified chemicals that could stop coronavirus