Coronavirus : राज्यात ५५ विशेष ‘कोविड-१९’ रुग्णालये - टोपे

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 19 April 2020

सहा वैद्यकीय महाविद्यालयांना तपासणी केंद्रांची मान्यता
कोव्हिड-१९ चा वाढता प्रसार लक्षात घेता स्थानिक पातळीवर चाचणी होण्याच्या दृष्टीने राज्यातील शासकीय, खासगी त्याचप्रमाणे अभिमत विद्यापीठांतर्गत येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोव्हिड-१९ तपासणी केंद्र स्थापन करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी घेतला आहे.

मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील 30 शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून घोषित केली आहेत. त्यानंतर आता आरोग्य विभागाकडून नव्याने आठ रुग्णालये; तर वैद्यकीय शिक्षण विभागाकडून 17 रुग्णालये अधिसूचित करण्यात आली आहेत. त्यामुळे अतिरिक्त 4355 खाटांची उपलब्धता झाली आहे. पूर्वी घोषित केलेल्या 30 रुग्णालयांतील 2305 खाटा आणि आताच्या 4355 खाटा अशा राज्यात एकूण 6660 खाटा कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी उपलब्ध आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दोन्ही विभागांनी काढलेल्या अधिसूचनांमुळे या रुग्णालयांना संशयित आणि कोरोना निदान झालेल्या रुग्णांना केंद्र आणि राज्य सरकारने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार करणे बंधनकारक असणार आहे. राज्य सरकारमार्फत कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये घोषित करण्यात आली असून, त्यासाठी आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालकांनी अधिसूचना काढली आहे, असेही आरोग्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. सरकारच्या अधिसूचनेनुसार विभागाच्या अखत्यारीतील 30 रुग्णालये विशेष उपचारासाठी घोषित केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 55 special covid-19 hospital in state rajesh tope