कोरोना निदानाच्या सर्वाधिक चाचण्या महाराष्ट्रात 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 April 2020

राज्यात कोरोना विषाणूंचा वेगाने फैलाव होत आहे. त्याच्या अचूक रोगनिदानासाठी प्रयोगशाळा हा सर्वांत महत्त्वाचा भाग. त्यामुळे या प्रयोगशाळांचे जाळे राज्यभर निर्माण करण्यावर राज्य सरकारने भर दिला आहे. 

पुणे - देशात कोरोना निदानाच्या सर्वाधिक प्रयोगशाळा चाचण्या महाराष्ट्रात होत आहेत. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्रयोगशाळा उभारण्यावर भर दिला असून, उद्रेक झालेल्या भागात चाचण्यांचे प्रमाण वाढण्याच्या दृष्टीने खासगी प्रयोगाशाळांचीही मदत घेण्यात आली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यात कोरोना विषाणूंचा वेगाने फैलाव होत आहे. त्याच्या अचूक रोगनिदानासाठी प्रयोगशाळा हा सर्वांत महत्त्वाचा भाग. त्यामुळे या प्रयोगशाळांचे जाळे राज्यभर निर्माण करण्यावर राज्य सरकारने भर दिला आहे. राज्यात 9 मार्चला कोरोनाचे पहिले दोन रुग्ण पुण्यात आढळले. त्या वेळी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही) ही एकमेव प्रयोगशाळा होती. गेल्या 43 दिवसांमध्ये 43 कोविड चाचणी प्रयोगाशाळा उभारण्यात आल्या. त्यापैकी 23 सरकारी असून, 20 खासगी आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

प्रयोगाशाळांचे जाळे  
देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. त्यातही मुंबई आणि पाठोपाठ पुण्यात या विषाणूंचा उद्रेक सर्वाधिक झाला आहे. त्यामुळे रोगनिदानाची व्यवस्था बळकट करणे हा कोरोना विरोधातील लढ्याचा पहिला टप्पा होता. यात प्रत्येक दिवशी एक या सरासरीने 43 प्रयोगशाळांचे जाळे निर्माण करण्यात आले. 

वैद्यकीय महाविद्यालये चाचणी केंद्र 
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये प्रधान्याने कोरोना चाचणीसाठी सक्षम करण्यात आली. लातूर, कोल्हापूर, नांदेड, अमरावती येथेही प्रयोगशाळांचे काम अंतिम टप्प्यात आहे. राज्यातील सर्व प्रयोगाशाळांमधून रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टीड पॉलिमरेज चेन रिऍक्श्न' (आरटी-पीसीआर) या पद्धतीने चाचणी केली जाते. 

No photo description available.

मुंबई-पुण्यावर सर्वाधिक लक्ष 
मुंबई-पुण्यात रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्याने तेथे प्रयोगाशाळा चाचण्या वाढविण्यात येत आहेत. मुंबईमध्ये सात सरकारी आणि दहा खासगी प्रयोगशाळा सुरू झाल्या आहेत. पुण्यात एनआयव्हीसह बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, लष्करी वैद्यकीय महाविद्यालय (एएफएमसी), नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्युट (नारी), नॅशनल सेंटर फाँर सेल सायन्स (एनसीसीएस) येथे चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत. या व्यतिरिक्त नऊ खासगी प्रयोगाशाळांना मान्यता देण्यात आली आहे. 

चाचण्या वाढविण्याचा उद्देश 
कोरोनाच्या रोगनिदान चाचण्या वाढविण्याचा उद्देश निश्चित करण्यात आला आहे. चाचण्या वाढल्यानंतर रोगनिदान होऊन रुग्णांवर तातडीने उपचार करता येतील. त्यामुळे त्या रुग्णापासून होणारा संसर्ग रोखण्यात यश येईल, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. 

प्रयोगशाळांचा विस्तार 
राज्यातील कोरोनाचा उद्रेकाचे प्रमाण कमी असलेल्या भागातही प्रयागशाळांचा विस्तार करण्यात येत आहे. पुढील काही दिवसांमध्ये 43 व्यतिरिक्त आणखी 32 प्रयोगाशाळा वाढविण्यात येणार आहेत. भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने (आयसीएमआर) या प्रयोगशाळांना कोरोना निदान चाचणीसाठी मान्यता दिली आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 

दृष्टीक्षेपात राज्यातील रोगनिदान चाचण्या 
एकूण चाचण्या : 75 हजार 838 
निगेटिव्ह : 94.46 टक्के 
पाँझिटीव्ह : 5.54 टक्के 
(ही माहिती 21 एप्रिल रोजी सकाळी दहापर्यंतची आहे.) 

सध्या रोज होणाऱ्या वैद्यकीय चाचण्या : चार ते पाच हजार 
भविष्यात वाढणारी क्षमता : सहा ते सात हजार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Most corona diagnosis tests in Maharashtra