पदरमोड करून त्याने भरवला भुकेल्यांना घास...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 29 May 2020

"तो' कुणी लोकप्रतिनिधी नाही, तो कुणी उद्योगपती वा धनदांडगा व्यावसायिकही नाही. त्याची सामाजिक संस्था नाही ना त्याच्या दिमतीला चमकेश समाजसेवकांची फौज; मात्र तरीही सध्याच्या कठीण परिस्थितीत शकडो भुकेल्यांसाठी तो आशेचा किरण बनला आहे.

ठाणेः "तो' कुणी लोकप्रतिनिधी नाही, तो कुणी उद्योगपती वा धनदांडगा व्यावसायिकही नाही. त्याची सामाजिक संस्था नाही ना त्याच्या दिमतीला चमकेश समाजसेवकांची फौज; मात्र तरीही सध्याच्या कठीण परिस्थितीत शकडो भुकेल्यांसाठी तो आशेचा किरण बनला आहे. मंदिराबाहेर हार विकून उपजीविका करणारा जेमतेम नववी पास हा युवक किरण अनिल पवार सध्या अनेकांचा अन्नदाता आहे. कुटुंबीय व मित्रपरिवाराच्या साह्याने पदरमोड करत 21 मार्चपासून 70 दिवस अव्याहतपणे किरण शेकडो पोटांची भूक भागवत आहे. विशेष म्हणजे त्याच्या घरगुती जेवणाची लज्जत चाखलेले काही पोलिसही त्याच्या या समाजसेवेचे तोंडभरून कौतुक करत आहेत.

मुंबईत का फोफावतोय कोरोना
 
ठाणे पश्‍चिमेकडील गावदेवी, केसकरवाडी येथे किरण आई-वडील, पत्नी आणि भावंडांसोबत राहतो. याच परिसरातील नौपाडा, गोखले रोडवरील प्राचीन हनुमान मंदिराबाहेर दर शनिवारी आणि पाचपाखाडी, गणेशवाडीस्थित तुळजाभवानी मंदिरात मंगळवार व शुक्रवारी तो हारविक्री करतो. सध्या संचारबंदीमुळे किरणच्या या व्यवसायावरही गदा आली आहे. कोरोना संकटामुळे बेघर, गरजूंची होणारी आबाळ पाहून किरणमधील समाजसेवक जागा झाला. त्या दिवशी आईच्या मदतीने किरणने 40 ते 50 जणांच्या भोजनाची मोफत व्यवस्था केली. दोघेही मायलेक सुमारे अडीचशे जणांना रोज दोन वेळच जेवण, सणासुदीला जेवणासोबत गोड पदार्थ मोफत देत आहेत. यात त्याला केसकरवाडीतील नागरिकांसह काही भाविक, डॉक्‍टर-वकील आणि हितचिंतकांनी मदतीचा हात दिला असून, जेवणासोबतच तो व सहकारी कपडे, मास्क, सॅनिटायझर वाटत आहेत. 

लॉकडाऊनमध्ये गरजू, बेघरांचे अश्रू पाहून मन हेलावले. हे अश्रू पुसण्यासाठी किंबहुना सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी मोकळ्या जागेत भटारखाना लावून हा छोटासा प्रयत्न केला. 
- किरण अनिल पवार, हार विक्रेता 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: thane#youth#help in people

टॉपिकस
Topic Tags: