अनुभव सातासमुद्रापारचे... : भारतीय विद्यार्थी बनले स्वयंसेवक

मुक्ता मिलिंद ढेरे, जिनिव्हा
मुक्ता मिलिंद ढेरे, जिनिव्हा

निसर्ग सौंदर्यासाठी, पर्यटनासाठी आणि आरोग्यसंपन्न लोकांसाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या स्वित्झर्लंडमध्येही कोरोनाने नागरिकांमध्ये धाक बसवला आहे. येथे संसर्ग वाढत आहे.

शेजारच्या इटलीमध्ये मृतांची संख्या वाढू लागल्यावर स्वित्झर्लंडमध्येही काहीशी घबराट पसरली आहे. पर्यटक आणि विद्यार्थी यांनी सतत गजबजलेल्या या देशात ‘लॉकडाउन’मुळे कमालीची शांतता पसरली आहे. देशाच्या सीमा रोखल्या गेल्या आहेत. शाळा बंद आहेत. रस्ते ओस पडले आहेत. गल्ल्या सुनसान आहेत. पण त्याचबरोबर लोकांना मदतीची गरजही मोठ्या प्रमाणात लागत आहे. विशेषतः वैद्यकीय विलगीकरण आवश्यक झालेल्यांना विद्यार्थी स्वयंसेवक मदतीचा हात देत आहेत.

मी जिनिव्हा येथे स्टुडंट असोसिएशन ऑफ द ग्रॅज्युएट इन्स्टिट्युटची (जिसा) जनसंपर्क संचालिका आहे. जिनिव्हातील ग्रॅज्युएट इन्स्टिट्युटमध्ये इतिहास, आंतरराष्ट्रीय संबंध, समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांचा पदव्युत्तर अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने येतात. याच इन्स्टिट्युटमधे मी शिक्षणही घेत आहे. माझा आईबरोबरचा, प्राजक्ता ढेरे, संयुक्त कवितासंग्रहही नुकताच प्रकाशित झाला आहे. 

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात स्वित्झर्लंडमधील भारतीय विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून मदतीला उतरले आहेत. जनसंपर्क संचालिका असल्याने हे विद्यार्थी स्वयंसेवक करत असलेल्या कामाच्या समन्वयाची जबाबदारी माझ्यावर आहे. हादेखील एक वेगळाच अनुभव असून त्यातून बरेच काही शिकता येण्यासारखे आहे. गरजूंपर्यंत किराणा सामान व औषधे पोचवणे, मानसिक एकलेपण वाटणाऱ्यांचे मनोधैर्य वाढवणे अशी कामे आपले विद्यार्थी करीत आहेत. कोरोनाविरुद्ध लढाई सुरू झाल्यावर ‘जिसा’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आणि गरजूंच्या मदतीला ते धावून जात आहेत. शंभराहून अधिक भारतीय विद्यार्थ्यांचा या स्वयंसेवकांत समावेश आहे. 

जिनिव्हा व बर्न येथील भारतीय वकिलातीही या विद्यार्थ्यांना सहकार्य करीत आहेत. 
हे स्वयंसेवक विलगीकरण कक्षातील लोकांसाठी जेवण पुरवणे, किराणा सामान पोचवणे, औषधे व स्वच्छतेच्या वस्तू पुरवणे आदी कामे तर करीत आहेतच, पण जे मानसिकदृष्ट्या खचले आहेत त्यांना मानसिक आधार देण्याचे महत्त्वाचे काम करीत आहेत. आम्ही विद्यार्थी या जगातील जबाबदार नागरिकाचे वर्तन कसे असावे, हेच जणू सध्याच्या दिवसांत शिकत आहोत.
(शब्दांकन - संतोष शेणई)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com