Coronavirus : पुणे जिल्ह्यातील सर्वच वाहतूक ठप्प

पुणे रेल्वे स्थानक - जनता कर्फ्यूमुळे स्थानक प्रवाशांअभावी पूर्णपणे ओस पडले होते.
पुणे रेल्वे स्थानक - जनता कर्फ्यूमुळे स्थानक प्रवाशांअभावी पूर्णपणे ओस पडले होते.

एसटी, रेल्वे, महापालिका हद्दीतील पीएमपी सेवाही ३१ मार्चपर्यंत राहणार बंद 
पुणे - एसटी, रेल्वेची वाहतूक पूर्ण बंद; तर पीएमपीची तुरळक वाहतूक. विमानसेवाही मर्यादित स्वरूपात रविवारी सुरू राहिली. एरवी गर्दीने गजबजलेला द्रुतगती मार्गही थंडावला होता. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यामध्येही असेच चित्र होते. ‘जनता कर्फ्यू’च्या निमित्ताने रिक्षा, कॅबही आज दिवसभर बंद होती. दरम्यान, या सेवा सोमवारी (ता. २३) सुरू राहण्याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

एसटी सेवाही बंद 
एसटीच्या पुण्यातील स्वारगेट, पुणे स्टेशन आणि वाकडेवाडी (शिवाजीनगर) स्थानकांवरील वाहतूक ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहे. रविवारी ही वाहतूक बंद होती. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधून एसटीच्या दररोज चार हजार ५०० गाड्यांची होणारी वाहतूक आता थंडावली. सुमारे दोन लाख प्रवासी या गाड्यांमधून ये-जा करीत होते. पुणे जिल्ह्यातीलही वाहतूक पूर्णपणे बंद असेल, अशी माहिती एसटीच्या पुणे विभागाच्या नियंत्रक यामिनी जोशी यांनी दिली.

पीएमपीची वाहतूक अंशतः 
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील बस आता २३ ते ३१ मार्चदरम्यान बंद राहणार आहेत; तसेच रातराणी बससेवेचाही त्यात समावेश असेल. सोमवारपासून १० टक्के म्हणजेच १०० ते १५० बस वाहतूक करतील. त्या प्रामुख्याने अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सोडल्या जातील. त्या बसमध्ये ओळखपत्र बघूनच प्रवेश दिला जाईल. अन्य मार्गांवर किमान १० प्रवासी असेल, तरच बस सोडली जाईल, असे पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी सांगितले. रविवारी सुमारे २०० बसची व्यवस्था असली तरी, सुमारे १५० बस सोडण्यात आल्या. त्यातून सुमारे पाच हजार प्रवाशांनी वाहतूक केली अन्‌ उत्पन्नही सुमारे ९० हजार रुपये मिळाले. 

द्रुतगती मार्गही पडला ओस 
पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग एरवी वाहनांच्या गर्दीने ओसंडून वाहत असतो; परंतु रविवारचा जनता कर्फ्यू त्याला अपवाद ठरला. या मार्गावरून नेहमी सुमारे ४० हजार वाहनांची वाहतूक होते. आज मात्र फक्त चार हजार वाहनांनीच प्रवास केला. अत्यावश्‍यक असेल तरच नागरिकांनी द्रुतगती मार्गाचा वापर करावा, असे आवाहन महामार्ग विभागातील अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी केले आहे; तसेच राज्यात जमावबंदीचा आदेश असल्यामुळे कोणत्याही वाहनात पाचपेक्षा जास्त प्रवासी नसावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

विमानतळावर मर्यादित सेवा 
लोहगाव विमानतळावर १७२ ऐवजी रविवारी सुमारे ८० विमानांची वाहतूक झाली. त्यातही प्रवासी अत्यल्प होते. आंतरराष्ट्रीय उड्डाणे आता बंद झाली आहेत. इंडिगो, गोएअर यांनीही अनेक उड्डाणे स्थगित केली आहेत, अशी माहिती विमानतळाचे संचालक कुलदीपसिंग यांनी दिली. ३१ मार्चपर्यंत देशांतर्गत उड्डाणे मर्यादित स्वरूपात होतील, असेही त्यांनी सांगितले.  

रिक्षा, कॅबबद्दल साशंकता 
राज्य सरकारने जमावबंदी लागू केल्यामुळे रिक्षा, कॅब सोमवारी सुरू राहण्याबाबतही साशंकता व्यक्त होत आहे. या सेवा रविवारी बंद होत्या. घरातून नागरिकांनी बाहेर पडू नये, असे आवाहन केल्यामुळे सोमवारपासून ३१ मार्चपर्यंत रिक्षा, कॅबच्या वाहतुकीवर मर्यादा आल्या आहेत. 

महामार्गावरील वाहतूक थांबली 
पुणे-सोलापूर महामार्गावरील चौफुला चौक (ता. दौंड) रविवारी सकाळपासूनच ओस पडला. वाहनांच्या गर्दीने सदैव गजबजलेला पुणे-सातारा महामार्ग शांत असल्याचे दिसले. पुणे-नगर रस्त्यावरील कोरेगाव भीमा, सणसवाडी, पेरणे फाटा, लोणीकंद, केसनंद, वाघोली परिसरात जनता कर्फ्यूला १०० टक्के प्रतिसाद मिळाला. मुळशी तालुक्‍यातून कोकणात जाणाऱ्या रस्त्याने पूर्ण क्षमतेने मोकळा श्‍वास घेतला. तालुक्‍यातील रस्त्यांवर दिवसभरात कधीतरी एखादी ‘पीएमपी’ बस यायची, तीही रिकामी परत जायची. आळेफाटा (ता. जुन्नर) येथे पुणे-नाशिक महामार्ग व कल्याण-नगर महामार्ग एकत्र येत असूनही शुकशुकाट होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com