गुढीपाडव्यावरही कोरोनाचे संकट गडद....

मिलिंद संगई
शुक्रवार, 20 मार्च 2020

संकटाचा परिणाम जसा मोठ्या दुकानदारांवर झाला आहे, तसाच तो रिक्षाचालकांपासून ते टपरी चालकांपर्यंत सर्वांवरच झाला आहे. लोकच घराबाहेर पडत नसल्याने अनेकांचे व्यवसाय ठप्प आहेत.

बारामती:  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जीवनाश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. बारामतीतील व्यापा-यांनी मात्र सामाजिक हिताचा विचार प्रथम या तत्त्वानुसार उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. येणा-या गुढीपाडव्यावरही कोरोनाचे संकट अधिक गडद होणार अशीच चिन्हे आहेत. 

इतर वेळेस होणारे बंद व्यापा-यांना मान्य नसतात, अनेकदा राजकीय कारणांसाठी व्यापा-यांना वेठीला धरले जाते. या वेळेस मात्र कोरोना व्हायरसचे संकट जगावर घोंघावत असल्याने काळजी घेण्यासाठी शासनाने हे पाऊल उचलले आहे, याची सर्वांनाच जाणीव आहे. त्या मुळे हे समाजहिताचेच काम असून गर्दी टाळण्यासाठी केलेल्या या उपाययोजनेला सर्वांनीच पाठिंबा दिला आहे. 

Coronavirus : भारतात आणखी एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू; बाधितांची संख्या...

गुढीपाडव्यावरही कोरोनाचे संकट.....
आज सुरु झालेला बंद पुढील आदेश येईपर्यंत पाळायचा आहे, याची  मानसिक तयारी सर्वांनीच केलेली आहे. व्यापा-यांना काळजी आहे ती गुढीपाडव्याची. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या या गुढीपाडव्यावरही आता कोरोनाचे संकट गडद होऊ पाहते आहे. 

वाहन विक्री व्यावसायिकांपुढेही आता चिंता वाढू लागली आहे, कारण बीएस 4 मानकांच्या गाड्यांची विक्री व नोंदणी 31 मार्चपूर्वी करण्याचे न्यायालयाचेच निर्देश असल्याने या गाड्या संपविण्याशिवाय विक्रेत्यांपुढे पर्यायच नाही. दुकानेच उघडली नाहीत तर विक्री कधी व कशी करायची याची चिंता त्यांना लागून राहिली आहे. सोनेचांदी, इलेक्ट्रॉनिक्स, वाहनविक्री, कापड विक्रेते, मिठाई, फुले या सह अनेक विक्रेत्यांना गुढीपाडव्याला चांगला व्यवसाय होतो. बंदच्या पार्श्वभूमीवर लोकच घराबाहेर पडले नाहीत तर काय करायचे ही चिंता सर्वांनाच आहे. असे असले तरी सर्वांच्या जीवनाची सुरक्षितता महत्वाची असे म्हणत व्यापा-यांनी या बाबत दोन तीन दिवसानंतर बघू आता तरी बंद ठेवू, अशी समंजस भूमिका घेतली आहे. 

मोठी बातमी - ३१ मार्चपर्यंत महाराष्ट्रातील ४ मोठी शहरं राहणार बंद - मुख्यमंत्री...

सर्वांवरच परिणाम....
या संकटाचा परिणाम जसा मोठ्या दुकानदारांवर झाला आहे, तसाच तो रिक्षाचालकांपासून ते टपरी चालकांपर्यंत सर्वांवरच झाला आहे. लोकच घराबाहेर पडत नसल्याने अनेकांचे व्यवसाय ठप्प आहेत. भेळ, पाणीपुरी, वडापावच्या गाड्यांपासून ते अगदी कुल्फी विकणा-यांपर्यंत सर्वांनाच याचा फटका बसला आहे. 

तीन दिवस दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी....
गुढीपाडव्याच्या तोंडावर व्यापा-यांनी माल दुकानात भरुन ठेवलेला असल्याने अनेक व्यापा-यांचे नुकसान होईल, या पार्श्वभूमीवर सोमवार, मंगळवार व बुधवार असे तीन दिवस दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्याची मागणी बारामती व्यापारी महासंघाने आज उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याकडे केली आहे. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona outbreak orders closure of all shops in Baramati