Coronavirus : वैद्यकीय सज्जतेचा कस

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 April 2020

रुग्णालये ६६ टक्के भरली
महापालिकेची रुग्णालये आणि ससून रुग्णालय मिळून सरकारी व्यवस्थेतील ५०० खाटा सध्या उपचारांसाठी आहेत. त्यापैकी ३३० खाटांवर (६६ टक्के) रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातील सर्वाधिक ताण हा डॉ. नायडू आणि ससून रुग्णालयावर येत आहे. डॉ. नायडू रुग्णालयातील शंभर खाटांच्या क्षमतेपैकी ७५ खाटांवर (७५ टक्के) रुग्ण आहेत, तर ससून रुग्णालयात १५० पैकी १४० (९३ टक्के) खाटांवर रुग्ण आहेत. ससून रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्‍टर, अद्ययावत वैद्यकीय उपकरणे आणि प्रशिक्षित मनुष्यबळ या आधारावर कोरोनाच्या अत्यवस्थ रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात येते.

पुणे - कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण आणि या आजाराची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींवर उपचार करणाऱ्या सरकारी आरोग्य यंत्रणेवरील ताण सातत्याने वाढत आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी गेल्या महिनाभरात प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करून सरकारी आस्थापनांमधील रुग्ण दाखल करून घेण्याची क्षमता ३५० खाटांनी वाढविली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाचे राज्यातील पहिले रुग्ण पुण्यात आढळले, त्यावेळी महापालिकेच्या डॉ. नायडू संसर्गजन्य रुग्णालयातच फक्त उपचाराची सुविधा होती. शहरात गेल्या महिनाभरात कोरोनाच्या रुग्णसंख्येने तीनशेचा आकडा ओलांडला आहे. यापैकी कोरोनामुक्त होऊन काही रुग्णांना घरी सोडण्यात येत असले तरीही नव्याने संसर्गाचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचे दिसते. त्यामुळे महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयाची क्षमता कमी पडली.

त्यावर पर्याय म्हणून महापालिका प्रशासनाने सिंहगड रस्त्यावरील लायगुडे रुग्णालय, बोपोडीतील रुग्णालयाबरोबरच सणस मैदानातील इमारत आणि रक्षकनगर येथील सुविधांचा वापर रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी सुरू केला. त्याचवेळी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाच्या ससून रुग्णालयातही १५० खाटांचा नवीन कोरोना कक्ष सुरू करण्यात आला. सुरवातीच्या काळातील नायडू आणि लायगुडे रुग्णालयांमध्ये १५० खाटांची क्षमता होती. आता सरकारी व्यवस्थेतील खाटांची संख्या ५०० पर्यंत वाढली आहे.

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी ससून रुग्णालयात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, फ्लूच्या रुग्णांसाठी वेगळा बाह्य रुग्ण विभाग तयार केला आहे. त्यातून कोरोनाची लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांना उपचारासाठी दाखल केले जाते. तसेच, इतर रुग्णालयांमधून पाठविलेल्या अत्यवस्थ रुग्णांवरही उपचार केले जातात.
- डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय

आकडे बोलतात

  • 80 - निश्‍चित केलेली खासगी रुग्णालये
  • 8059 - रुग्णालयांतील खाटा
  • 914 - अतिदक्षता विभागातील खाटा
  • 489 - व्हेंटिलेटरची संख्या
  • महिनाभरात रुग्ण दाखल करून घेण्याची क्षमता पाचशेपर्यंत पोचली

खासगी रुग्णालयांची घेणार मदत
पुणे - कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन पुणे महापालिकेने पंधरा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या ८० खासगी रुग्णालयांची यादी तयार केली आहे. त्यामध्ये ढोलेपाटील क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सर्वाधिक रुग्णालये तर, कोंढवा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सर्वांत कमी रुग्णालये आहेत.

शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ३४३ वर पोचली आहे. ही संख्या आणखी वाढण्याची शक्‍यता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांकडून व्यक्त होत आहे. भविष्यात वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेता, कोणत्या खासगी रुग्णालयांची मदत घेता येईल, याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. त्यासाठी प्रत्येकी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रमुख खासगी रुग्णालयांची यादी तयार करण्यात आली आहे.

ही यादी तयार करताना संबंधित रुग्णालयामधील व्हेंटिलेटर आणि अतिदक्षता विभाग यांचीही माहिती घेण्यात आली आहे. यानुसार ढोलेपाटील क्षेत्रीय कार्यालयांतर्गत खासगी रुग्णालयांची संख्या सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ वारजे, धनकवडी आणि हडपसर या तीन क्षेत्रीय कार्यालयांतर्गत रुग्णालयांची संख्या जास्त आहे. कोंढवा, सिंहगड रस्ता, येरवडा आणि बिबवेवाडी या चार क्षेत्रीय कार्यालयांतर्गत खासगी रुग्णालयांची संख्या सर्वांत कमी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus Medical Preparedness