Coronavirus : पुण्यात या कारणामुळे होत आहे कोरोना रुग्णांची वाढ

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 April 2020

अनेक सोसायट्यांमध्ये नियमांचे पालन
सुरवातीचे रुग्ण सिंहगड रस्त्याच्या परिसरातील सोसायट्यांमध्ये आढळले. त्यानंतर कोरेगाव पार्कसारख्या उच्चभ्रू लोकवस्तीत होते. वारजे-कर्वेनगर, औंध-बाणेर, कोथरुड-बावधन या भागांमध्ये मोठ्या संख्येने सोसायट्या आहेत. तेथील रहिवाशी लॉकडाउनमध्ये आपापल्या घरात थांबले आहेत. घरातही सोशल डिस्टंसिंग पाळत आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या भागातील कोरोनाच्या निदानाचे प्रमाण कमी झाले आहे.

पुणे - शहरात सध्या कोरोनाचे निदान होणारे बहुसंख्य रुग्ण हे झोपडपट्ट्यांमधील आहेत. एकेका घरातील आठ-दहा रुग्णांचे निदान होत आहे, हाच पुण्यातील कोरोना उद्रेक नियंत्रित करण्यातील अडसर ठरला असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यातील पहिले कोरोनाचे रुग्ण ९ मार्चला पुण्यात आढळले. त्यानंतर ४६ दिवसांमध्ये पुण्यातील रुग्णसंख्येने एक हजाराचा आकडा गाठला. त्या पार्श्वभूमिवर रुग्ण आढळत असलेल्या लोकवस्तीमध्ये बदल होत आहे. सोसायटी ते झोपडपट्टी असा बदल झाल्याचे निरीक्षण सार्वजनिक आरोग्य विभागातील तज्ज्ञांनी नोंदविले. 

घरात आठ-आठ रुग्ण 
शहरांमध्ये आता जे रुग्ण आढळतात, त्यातील बहुतांश हे झोपडपट्ट्यांमध्ये रहाणारे आहेत. लॉकडाउनमुळे बाहेर जाता येत नसले तरीही एकेका घरात आठ ते दहा लोकं रहात असल्याने सोशल डिस्टन्सिंग व्यवस्थित पाळणे शक्‍य होत नाही. त्यामुळे कोरोनाचा फैलाव वाढत आहे. भवानी पेठ, येरवडा, ताडीवाला रोड, कोंढवा, पर्वती दर्शन या भागातील रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. एका घरातील आठ-आठ लोक पॉझिटीव्ह येत असल्याचे निरीक्षणंही यात टिपले आहे.

आव्हाने -

  • लोकसंख्येची घनता जास्त
  • जीवनमानाचा दर्जा कमी असणे
  • सामाजिक, आर्थिक स्थिती
  • शिक्षणाचा अभाव
  • सर्वेक्षणासाठी होणारा विरोध

उपाययोजना -

  • संसर्गाच्या संपर्काचा शोध घेणे यावर भर 
  • रोगनिदान चाचण्यांचे वेगाने वाढविण्यात येणारे प्रमाण 
  • कंन्टेटमेंट झोनची काटेकोर अंमलबजावणी
  • निर्जंतुकीकरण
  • झोपडपट्टीतील संशयितांना विलगिकरण करणे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to this the number of corona patients is increasing in Pune