ती म्हणतीये, 'घराबाहेर पडू नका, माझ्यावर जी वेळ आलीये, ती तुमच्यावर...'

उमेश शेळके - सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 9 April 2020

परदेशवारी नाही की कोरोनाबाधिताच्या संपर्कात नाही. तरीदेखील अंगणवाडी सेविकेला संसर्ग झाला आणि तिची मृत्यूशी लढाई सुरू झाली.

पुणे - परदेशवारी नाही की कोरोनाबाधिताच्या संपर्कात नाही. तरीदेखील अंगणवाडी सेविकेला संसर्ग झाला आणि तिची मृत्यूशी लढाई सुरू झाली. अखेर तिने मृत्यूलाही हरविले आणि बुधवारी (ता. 8) दुपारी ती ठणठणीत होऊन घरी परतली. "माझ्यावर जी वेळ आली, ती तुमच्यावर येऊ देऊ नका. घराच्या बाहेर पडू नका,' असा संदेश तिने पुणेकरांना दिला आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या एकीकडे वाढत असताना, दुसरीकडे या जीवघेण्या विषाणूशी दोन हात करून घरी सुखरूप पोचलेल्या अनिता विकास गोरड यांची ही कहाणी. केवळ जिद्द, भारती हॉस्पिटलमधील डॉक्‍टर आणि परिचारिका यांनी घेतलेली जिवापाड घेतलेली काळजी यामुळे मृत्यूच्या दारातून परत आले, अशी भावना अनिता यांनी "सकाळ'कडे बोलून दाखविली. 

Coronavirus : लॉकडाऊनमध्येही तुम्हाला करता येणार परराज्यात प्रवास

सिंहगड रस्त्यावरील वडगाव येथे त्या एक मुलगा, मुलगी आणि पती समवेत राहतात. पानशेत येथील गोरडवस्तीमधील अंगणवाडीमध्ये सेविका म्हणून त्या नोकरीस आहेत. त्यामुळे दररोज त्यांना प्रवास करावा लागत होता. नऊ मार्च रोजी त्यांना त्रास होऊ लागल्याने त्या फॅमिली डॉक्‍टरकडे गेल्या. त्यांनी उपचार केल्यानंतर बरे वाटू लागल्याने पुन्हा कामावर जाण्यास सुरुवात केली. पुढे हा त्रास पुन्हा सुरू झाला. अखेर 15 तारखेला त्यांना सिंहगड रस्त्यावरील जगताप हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तपासणीअंती न्यूमोनिया झाला असल्याचे आढळून आले. 16 मार्च रोजी त्यांना भारती हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तेथे तातडीने उपचार सुरू झाले. तेथील तपासणीत कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान समोर आले आणि जीवनमरणाची लढाई सुरू झाली. ""पती आणि मुलांना क्वारंटाइन करण्यात आले. त्यामुळे माझ्याजवळ कोणीही नव्हते. दाखल झाल्यापासून व्हेंटिलेटरवर दहा दिवस होते. या कालावधीत भारती हॉस्पिटलचे डॉक्‍टर आणि परिचारिका यांनी माझी घरच्यासारखी काळजी घेतली. त्यातून मी बचावले. आज मी घरी आले. जवळपास पंधरा दिवसानंतर माझी आणि कुटुंबीयांची भेट झाली. याचे श्रेय केवळ मी डॉक्‍टरांना देईल,'' असेही त्यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Feeling of anganwadi sevika