Coronavirus : अडचणी वाढत असल्या तरी 'स्वच्छ'चे कचरा वेचक कार्यरत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

अडचणी वाढत असल्या तरी 'स्वच्छ'चे कचरा वेचक प्रामाणिकपणे काम करीत आहेत.

पुणे : अडचणी वाढत असल्या तरी 'स्वच्छ'चे कचरा वेचक प्रामाणिकपणे काम करीत आहेत, त्याला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन 'स्वच्छ'तर्फे करण्यात आले आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेल्या २ दिवसात, स्वच्छच्या 90% कचरावेचक व सर्व कर्मचारी यांनी कामावर हजेरी लावली आहे. नियमात वारंवार होणारे बदल आणि वेळोवेळी कमीजास्त प्रमाणात  लागू करून अखेर काल जाहीर  झालेली संपूर्ण टाळेबंदी यामुळे कचरा संकलनावर थोडाफार परिणाम झाला आहे. परंतु पुणे महानगरपालिका व स्वच्छ यावर पर्याय शोधण्याचे प्रयत्न करीत आहेत. 

ही परिस्थिती अभूतपूर्व आहे. या संकट व आपत्तीच्या काळात शांतता व संयम राखण्याचे आवाहन आम्ही पुणेकरांना करीत आहोत. जर कचरावेचक कामावर आले नसतील तर आमच्या ९७६५९९९५००  या मदतक्रमांकावर संपर्क साधा व आम्ही पर्यायी सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू. कृपया स्वच्छच्या कचरावेचकांना तुम्ही देत असलेल्या शुल्कात कोणतीही कपात करू नये, असे आवाहन 'स्वच्छ'तर्फे करण्यात आले आहे. 

कोरोनाशी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काही ठिकाणी पोलिसांनी कचरावेचकांना प्रवास करण्यास मनाई केली आहे.  तर काही प्रसंगांत त्यांच्यावर हल्ला करण्याची धमकी देखील पोलीसांनी दिली. “आम्ही टेम्पो घेऊन कचरा गोळा करायला जातो, पण आज खाजगी वाहनांवर बंदी असल्याने आम्हाला कचरा गोळा करता आला नाही,” असे कोथरूड भागात काम करणाऱ्या सुप्रिया भडकवाड यांनी सांगितले. त्यानंतर मात्र पुणे महानगरपालिकेने कचरा वेचकांना ती आवश्यक सेवा असल्याने, प्रवास करण्याकरिता अधिकृत परवानगी दिलेली आहे व त्यांच्या प्रवासाची सोय करण्याकरिता देखील प्रयत्न सूरु झाले आहेत. 

“संसर्गाच्या भीतीने काही इमारती व सोसायट्यांनी देखील आम्हाला ३१ मार्च पर्यंत कचरा उचलण्यास येऊ नये अशा सूचना दिल्या आहेत, तर काहींनी २-३ दिवसांतून एकदाच येण्यास सांगितले आहे,” असे औंधमध्ये काम करणाऱ्या पिंकी सोनावणे यांनी नमूद केले आहे.  

पुण्यातील  नागरिकांना 'स्वच्छ पुणे' च्या कचरावेचकांना कोणत्याही प्रकारची मदत देण्याची इच्छा असल्यास या  ९७६५९९९५०० मोबाईलवर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Garbage collectors are working sincerely